गतकालात ज्ञान मिळविण्याची आमची दृष्टी संयोगीकरणाची होती. जेवढे मिळेल तेवढे ज्ञान मिळवून त्याचा समन्वय लावण्याची आमची वृत्ती होती, पण त्या दृष्टीने क्षेत्र हिंदुस्थानपुरतेच मर्यादित होते. हे क्षेत्र पुढेही तसेच मर्यादित राहिले व हळूहळू दृष्टी समन्वयाकडून विषयाचे पृथक्करण करण्याकडे विशेषत: वळू लागली. आता आम्हाला दृष्टीच्या संयोगीकरणवृत्तीवर विशेष भर दिला पाहिजे व आमच्या अभ्यासाचे क्षेत्र जगभर विस्तारविले पाहिजे. राष्ट्राचा काय किंवा व्यक्तीचा काय, बहुतेक सर्वांचाच प्रवास त्याच त्या विचारांचा व आचारांच्या अरुंद चाकोरीतून चाललेला असतो, त्यातून बाहेर पडायचे असले तर सर्वांनाच ही विशेषत: संयोगीकरण करीत राहण्याची दृष्टी आग्रहपूर्वक ठेवली पाहिजे. विज्ञानशास्त्रातले नवेनवे शोध व त्यांचा प्रत्यक्षात उपयोग करून घेण्याकरिता निघालेली नवी नवी साधने, त्यांच्यामुळे आपल्याला हे संयोगीकरण, हा ज्ञानसंचय शक्य झाला आहे खरा, पण आमच्या ज्ञानात घालण्याजोगी ही भर इतकी काही विपुल आहे की, तिची विपुलता ही एक अडचणच होऊन बसली आहे. काही ठराविक माणसे ठराविक कामात निपुण असावयाची, असे होता होता वैयक्तिक जीवनाचा संकोच होऊन व्यक्तीला एखाद्या विशिष्ट चाकोरीतून फिरावे लागत आहे. यांत्रिक कारखान्यातून बनणार्या एखाद्या संबंध वस्तूच्या बनावटीपैकी श्रमाचा असा भाग बहुधा अत्यंत थोडा असतो. ज्ञान किंवा कार्य यांपैकी वेगवेगळ्या विषयांतून त्या त्या विषयातले तज्ज्ञ असावेत अशी व्यवस्था पुढेही चालू ठेवणे प्राप्त आहे, पण मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचे एकीकरण करून त्या जीवनाचे संपूर्ण स्वरूप दृष्टीसमोर आणण्याच्या, व युगायुगातून मानववंशाने ह्या जीवनाचा जो साहसपूर्ण प्रवास चालवला त्याचाही समावेश त्या मानसचित्रात करण्याच्या मनोवृत्तीला उत्तेजन देणे हे पूर्वी कधी नव्हते इतके हल्लीच्या काळात महत्त्वाचे दिसते. असे मानसचित्र डोळ्यांपुढे उभे करताना त्यात भूतकालाचा व वर्तमानकालाचा समावेश झाला पाहिजे. आणि त्यातही सर्व देश व देशोदेशीचे लोक आले पाहिजेत. अशी मनोवृत्ती आली तर आपापल्या राष्ट्रीय इतिहासाचे व संस्कृतीचे महत्त्व तर कळेलच, पण शिवाय परकीयांची अधिक चांगल्या रीतीने गुणपरीक्षा करता येईल व देशेदेशींच्या लोकांची माहिती मिळून त्यांच्याशी सहकार्याने वागण्याची पात्रता आपल्या अंगी येईल. शिवाय, अशा रीतीने पाहण्याची दृष्टी लाभली तर सगळीकडे दिसणार्या आजकालच्या एककल्ली, लहरी, विक्षिप्त व्यक्तींच्या ऐवजी समतोल व्यक्तिमत्त्व लाभलेल्या माणसांचा भरणा समाजात अधिक करता येईल. ही मनोवृत्ती झाली तर प्लेटोने ज्यांना ''अखंड पसरलेल्या त्रिकालाचे, व अनंत चाललेल्या जीवनाचे, कुतूहल प्रसन्न चित्ताने पाहणारे प्रेक्षक'' म्हटले आहे तसे प्रेक्षक होणे आपल्याला शक्य आहे, आणि ते साधले तर आजपर्यंत मानवाने जी विविध बहुमोल संपत्ती गोळा करून जतन करून ठेवली आहे तिच्यातून आपल्या जीवनाला आधार मिळत राहील, त्या संपत्तीत आपल्याला आपल्या कष्टाची भर घालता येईल, व या संपत्तीतून भावी कालाकरिता काही नवेनवे निर्माण करून ठेवता येईल.
आधुनिक काळात इतकी वैज्ञानिक प्रगती झाली आहे, आंतरराष्ट्रीयत्वाचा उच्चार इतका वारंवार केला जातो आहे, तरी सुध्दा माणसामाणसात भेदभाव पाळण्याची वृत्ती दर्शविण्यार्या खोट्या वंशाभिमानासारख्या अनेक गोष्टी, पूर्वी कधीही नसतील इतक्या मोठ्या प्रमाणात निदान आज घटकेला आढळाव्या, हे एक मोठे आश्चर्य आहे व हे फार सूचकही आहे. ह्या सार्या आधुनिक प्रगतीला राष्ट्राराष्ट्रांत सुसंवाद आणता येत नसेल, माणसाच्या मनोवृत्तीत अंतर्यामीचा मेळ साधता येत नसेल तर ह्या सार्या प्रगतीत काहीतरी गोम राहून गेली असली पाहिजे. काहीही व कितीही म्हटले तरी प्राचीनांचे ज्ञान म्हणजे मानववंशाने वेळोवेळी घेतलेल्या विविध अनुभवांचा एक संचय एवढे तरी त्याचे स्वरूप आहे हे निश्चित; म्हणून त्या ज्ञानाविषयी थोडा नम्रभाव ठेवून व आपली वृत्ती समन्वय करण्याची ठेवून चाललो तर आपल्याला एका वेगळ्याच दृष्टीचा लाभ होण्याचा, जीवनाची अधिक सुसंगती लाभण्याचा संभव आहे. ज्वरबाधा झालेल्या माणसाच्या नाडीसारखे ज्यांचे जीवन धांदलीने धावते आहे, ज्यांची दृष्टी वर्तमानकालावरच खिळलेली आहे, मागचा सारा इतिहास जे जवळजवळ विसरून चालले आहेत अशा लोकांना तर अशी मनोवृत्ती विशेषच अवश्य आहे. परंतु हिंदुस्थानसारख्या देशातील लोकांच्या हिताच्या दृष्टीने वेगळीच मनोवृत्ती आवश्यक आहे, कारण आम्हा हिंदी लोकांभोवती भूतकालातलेच अती झाले आहे, हल्ली जगात काय चालले आहे इकडे आमचे मुळीच लक्ष नाही. धर्मामुळे संकुचित होत जाणारी सांप्रदायिक दृष्टी, अद्भुत्व अतींद्रिय विषयात कल्पना चालवीत बसण्याचे वेड, मनाला संयमाचे शिक्षण देता देता धार्मिक विधीतील अवडंबराच्या व गूढविद्येतील भावनाविवशतेच्या रूपाने लागलेले भलते वळण, या सर्वांची अडचण आमच्याभोवती वाढून, भोवतालचे जगच काय, स्वत: आम्ही कोण हेदेखील समजणे आम्हाला अवघड होऊन बसले आहे. ही सारी अडचण काढून टाकणे आम्हाला प्राप्त आहे. आम्हाला या चालू वर्तमानयुगाशी, ह्या जीवनाशी, ह्या जगाशी, अनंत विविधतेने भरलेल्या निसर्गाशी भिडून त्यांच्यावर आपली पकड घट्ट केली पाहिजे. काही हिंदू म्हणतात वेदांकडे परत चला, तर काही मुसलमानांना इस्लामी धर्मानुसार चालणार्या राज्यपध्दतीची स्वन्पे पडत आहेत. ही सारी मनोराज्ये व्यर्थ आहेत, वर्तमानातून भूतकालाकडे जाता येत नाही, हे इष्ट आहे असे वाटले तरी तोंड फिरवणे शक्य नाही. कालपुरूषाच्या राजमार्गावरची रहदारी एकाच दिशेने चालते, ती दिशा सोडता येत नाही.