देशाच्या अर्थव्यवस्थेत अशा तर्हेचे स्थित्यंतर घडून आले तर नफा मिळविण्याच्या उद्देशाने काम करण्याच्या तत्त्वावर मुख्यत्वे आधारलेली हल्लीच्या काळची संचयप्रवृत्त समाजव्यवस्था गडबडून जाईल. हा नफ्याचा उद्देश काही अंशी पुढेही समाजात प्रचलित राहील, पण काम करताना केवळ नफ्याकडेच दृष्टी राहणार नाही, आणि त्या प्रकाराला समाजात आज आहे तितका वावही राहणार नाही. सर्वसामान्य हिंदी मनुष्याला नफ्याचे विलोभन वाटत नाही असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही, पण एवढे मात्र खरे की, पाश्चात्त्य देशांत त्या वृत्तीची जी प्रशंसा केली जाते ती हिंदुस्थानात केली जात नाही. पुंजीपतीचा इतर लोक हेवा करतील, पण त्याच्याविषयी काही विशेष आदर किंवा कौतुक लोकांना वाटत नाही. चांगुलपणा, सुज्ञपणा या गुणांना हिंदुस्थानात अद्यापही मान दिला जातो व अशा स्त्रीपुरुषांचे कौतुक होते, विशेषत: सार्वजनिक हिताकरिता जे स्त्रीपुरुष स्वत:चे किंवा आपल्या वित्ताचे बलिदान करतात ते वंद्य व प्रशंसनीय गणले जातात. धनसंचयवृत्ती भारतीयांच्या दृष्टीला, तेथील सर्वसामान्य अडाणी जनतेला सुध्दा, कधीही माननीय वाटली नाही.
समाजस्वामित्व म्हटले की त्याबरोबरच, सर्व समाजाचे म्हणून कोणतेही कार्य पत्करणे व त्या कार्याच्या सिध्दीकरिता सर्वांनी मिळून सहकार्याने प्रयत्न चालवणे, हेही येते. प्राचीन भारतीयांच्या समाजव्यवस्थेसंबंधी ज्या कल्पना होत्या त्यांच्याशी ही समाजस्वामित्व, सामुदायिक संकल्प व सहकार्य, यांची कल्पना जुळती आहे, कारण त्या प्राचीन व्यवस्थेला आधार लोकांनी सामुदायिक सहकार्याने चालावे या तत्त्वाचाच होता. या सामुदायिक पध्दतीचा व विशेषत: त्यातील स्वायत्त ग्रामसंस्थेचा, ब्रिटिशांच्या राजवटीत जो र्हास झाला त्यामुळे हिंदी जनतेची फार मोठी हानी झाली आहे, आणि तीही पैशापेक्षा मनोरचनेच्या क्षेत्रात विशेष हानी झाली आहे. जुने गेले त्याच्या जागी जनतेला कार्यप्रवृत्त करू शकेल असे नवे काहीच आले नाही, त्यामुळे लोकांतला बाणेदारपणा, कार्याचा भार आपल्यावर आहे असे जाणून चालण्याची वृत्ती, सामुदायिक उद्दिष्टाकरिता एकमेकांशी सहकार्य करण्याची शक्ती, ह्या गुणांचा लोप झाला. ग्राम म्हणजे देशाचे स्वतंत्र सजीव अवयव हे ग्रामाचे रूप जाऊन खेडे म्हटले की मोडकळीला येत चाललेले एक ठिकाण, तेथे चिखलमातीच्या काही झोपड्या व कोठलीतरी कशीबशी चार माणसे असावयाची अशी कळा खेड्यांना आली. परंतु खेडेगाव या संस्थेचे अलग अलग असे तुकडे अद्यापही पडलेले नाहीत, कोणत्यातरी अदृश्य बंधनामुळे ते अजून एकमेकाला धरून आहेत. जुन्या आठवणी मधूनमधून निघतात. या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरांपासून काही लाभ करून घेऊन शेती व लाहनसहान उद्योगधंदे या व्यवसायात सामुदायिक व सहकारी पध्दतीने चालणार्या भागीदार्या करणे सहज सोपे होईल. अशा रीतीने एकेका गावातील सर्वांच्या सामुदायिक मालकीच्या, व सर्वांनी सहकार्य करून पिके घेण्याकरिता म्हणून राखून ठेवलेल्या, एखाद्या शेताची त्या सार्या गावचा निकट संबंध येऊ लागला तरी प्रत्येक वेगवेगळे गाव आर्थिक दृष्ट्या एक स्वयंपूर्ण घटक म्हणून मानणे यापुढे शक्य नाही. पण राज्यकारभाराच्या व लोकसभेकरिता प्रतिनिधी निवडण्याच्या कामी गाव हा एक घटक धरण्याला काहीच प्रत्यवाय नाही. असे एकएक गाव एक स्वयंशासित लोकसमूह या रूपाने त्याच्याहून राजकीय दृष्ट्या विस्तृत अशा राज्ययंत्रातील एक घटक म्हणून गणला जाऊन, आपापल्या गावकर्यांच्या मुख्य गरजा भागविण्याचे कार्य करीत राहील. निवडणुकी करण्याच्या कामी एकेक गाव हा घटक धरला तर त्यामुळे प्रांतीय व अखिल भारतीय निवडणुकीचे काम बरेच सोपे होईल, कारण त्यामुळे त्या निवडणुकीत प्रत्यक्ष मते देण्याला पात्र अशा मतदारांची संख्या कमी होईल. गावातील प्रत्येक सज्ञान स्त्री व पुरुष यांनी त्या गावापुरत्या निवडून दिलेल्या पोक्त गावकर्यांची ग्रामपंचायत ही गावाहून मोठ्या अशा ह्या प्रांतीय व अखिल भारतीय निवडणुकीतील एक मतदार म्हणून गणणे शक्य आहे. अशा रीतीने अप्रत्यक्ष मतदान झाले तर त्या पध्दतीत काही दोष कदाचित निघतील, पण हिंदुस्थानातील पार्श्वभूमीच्या दृष्टीने माझे असे निश्चित मत आहे की, प्रत्येक गाव हा एक घटक मानण्यात यावा. अशा रीतीने होणारे लोकमतनिदर्शन अधिक तंतोतंत व जबाबदारीची अधिक जाणीव ठेवून होईल.