फाळणीचा विचार देशातील आर्थिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने केला तर असे स्पष्ट दिसते की, सबंध हिंदुस्थान देश मिळून एक बलाढ्य व बव्हंशी स्वयंपूर्ण घटक होतो. कोणत्याही प्रकारे या संबंध देशाचे तुकडे पाडू म्हटले तर देशाचे बल अर्थातच कमी होणार व त्यातील कोणत्याही भागात दुसर्या भागावर अवलंबून राहणे प्राप्त होणार. बहुसंख्य हिंदू प्रदेश एकीकडे व बहुसंख्य मुसलमानी प्रदेश दुसरीकडे असे विभाग पाडले तर हिंदू विभागात देशातील खनिज साधनसंपत्ती व औद्योगीकरण झालेले प्रांत यांचा बहुतेक सारा वाटा येतो. अशा दृष्टीने पाहिले तर या हिंदू विभागाची देशाच्या फाळणीमुळे फारशी मोठी हानी होणार नाही. त्याच्या उलट मुसलमानी विभागात मात्र देशातले आर्थिक दृष्ट्या मागे राहिलेले व तुटीचा कारभार चालणारे प्रांत येतील व त्या विभागाला बाहेरून इतरांकडून पुष्कळस साहाय्य घेतल्याखेरीज आपले अस्तित्व टिकवणेसुध्दा अशक्य होईल. या विवेचनातून एक विचित्र परंतु वास्तविक सत्य निघते ते हे की, देशाची फाळणी अट्टाहासाने करून मागणारांनाच त्या फाळणीपासून होणारी हानी अधिक भोवणार. फाळणीचा होणारा असा हा परिणाम त्यांच्या थोडाबहुत लक्षात आल्यामुळे फाळणी मागणारांच्या वतीने आता अशी मागणी होऊ लागली आहे की, आर्थिक दृष्ट्या दोन्ही विभाग सारखे होतील अशा रीतीने देशाची वाटणी करण्यात यावी. कसल्याही परिस्थितीत अशा प्रकारे देशाची वाटणी करणे शक्य आहे की नाही हे मला माहीत नाही, पण त्या प्रकारात फारसे तथ्य नाही असे मला वाटते. अशा प्रकारे वाटणी करू गेले तर काहीही केले तरी ज्या प्रदेशात हिंदूंची व शिखांची बहुसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे असे मुसलमानेतर प्रदेश तेथील लोकांच्या इच्छेविरूध्द, मूळ हिंदुस्थानापासून अलग होणार्या विभागात जबरदस्तीने कोंबावे लागतील, आणि स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाची प्रत्यक्ष व्यवहारात अम्मलबजावणी करण्याचा ही तर्हा म्हणजे एक मोठा विचित्र नमुना ठरेल. यावरून मला एक गोष्ट आठवते ती अशी की, एका माणसाने आपल्या आईला व बापाचा खून केला, व त्याबद्दल त्याच्यावर खटला होऊन त्याचा न्याय चालला तेव्हा आईबाप नसलेल्या मजसारख्या पोरक्या अनाथ मुलावर दया करा असे तो न्यायाधीशाला विनवून सांगू लागला.
फाळणीच्या या ऊहापोहात आणखी असलाच एक विक्षिप्तपणा पाहायला सापडतो. फाळणी करून मागणारे स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचा उदो उदो चालवतात, पण प्रत्यक्षात तो निर्णय ठरवायला सार्वत्रिक मतदानाची पध्दत मात्र त्यांना अमान्य आहे, त्यातून ही पध्दत घ्यायचीच झाली तर त्या प्रदेशातल्या केवळ मुसलमानांनीच काय ते मतदान करून हा निर्णय ठरवावा असे त्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ शेवटी असा होतो की, एकंदर लोकसंख्येपैकी मुसलमान शेकडा ५४ किंवा कमीच प्रमाण असलेल्या बंगाल किंवा पंजाब या प्रांतांतून असा स्वयंनिर्णय करण्याकरिता मते घ्यायचे ठरलेच, तर या शेकडा ५४ लोकांनीच काय ते मत देऊन बाकीच्या शेकडा ४६ किंवा अधिकच प्रमाण असलेल्या लोकांना काय म्हणणे आहे ते सांगण्याची त्यांना संधीही न देता, त्यांचे पुढे काय व्हायचे ते ठरवावयाचे म्हणजे अखेर असेही संभव आहे की, एकंदर लोकसंख्येपैकी शेकडा २८ लोकांच्या हातून बाकीच्या शेकडा ७२ लोकांच्या कपाळी पुढे काय यायचे ते ठरणार.
हे असले सिध्दत लोकांपुढे मांडणे किंवा ते प्रतिपक्षाला मान्य होतील अशी अपेक्षा ठेवणे, कोणत्याही समंजस माणसाला करवते तरी कसे, हे समजणे कठीण आहे. असे मतदान करण्याचा प्रश्न ज्या प्रांताबद्दल संभवतो त्या प्रांतातले कितीकसे मुसलमान हिंदुस्थान देशाची फाळणी करावी असे मत देतील हे मला माहीत नाही, व प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत कोणालाही सांगता येणे शक्य नाही. माझी आपली अशी कल्पना आहे की, तेथील पुष्कळच मुसलमान, कदाचित बहुसंख्येनेही फाळणीविरूध्द मत देतील. पुष्कळशा इस्लामी संघटना फाळणीच्याविरूध्द आहेत. प्रत्येक मुसलमानेतर, मग तो हिंदू, शीख, ख्रिश्चन किंवा पार्शी कोणीही असो, फाळणीच्या विरुध्द आहे. ज्या प्रांतात मुसलमान अत्यंत अल्पसंख्य आहेत, देशाची फाळणी कोणत्याही तत्त्वावर झाली तरी जे प्रांत हिंदुस्थानातून अलग होणे शक्य नाही, अशा प्रांतातच मुख्यत: ही फाळणीला अनुकूल अशी भावना वाढली आहे. ज्या प्रांतातून मुसलमानांचे बहुमत आहे तेथील मुसलमानांत या भावनेचा प्रभाव कमी आहे, आणि तसे असणे कमी आहे, आणि तसे असणे स्वाभाविक आहे. कारण तेथे त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धमक आहे, त्यांना इतर जमातींचे भय बाळगण्याचे कारण नाही. शेकडा ९५ टक्के मुसलमान असलेल्या वायव्य सीमा प्रांतात देशाच्या फाळणीची भावना सर्वांत कमी प्रमाणात आहे. तेथील पठाण जात्या शूर आहेत, त्यांना स्वत:चा भरवसा आहे, इतरांची धास्ती घेण्याची मनोविकृती त्यांच्यात नाही. एकूण विचित्र प्रकार असा की, देशाची फाळणी करण्याची मुस्लिम लीगची मागणी ज्या प्रांतातून मुसलमान अल्पसंख्य आहेत, ज्या प्रांताच्या स्थितीत फाळणीमुळे काही पालट व्हावयाचा नाही, त्या प्रांतात जितकी उत्साहाने उचलून धरली जाते त्या मानाने जे प्रांत अलग करावे अशी मागणी आहे तेथे त्या मागणीला फारच कमी पाठिंबा आहे. तथापि हे मात्र खरे की, फाळणीचे परिणाम काय होतील याचा फारसा विचार न करता केवळ भावनाविवश होऊन फाळणीची ही कल्पना प्रिय वाटणार्या मुसलमानांची संख्या बरीच मोठी आहे. वस्तुस्थिती अशी की ही फाळणीची कल्पना निदान आतापर्यंत तरी मोघम स्वरूपातच मांडली गेली आहे, व ती स्पष्ट करा अशी मागणी अनेकवार केली गेली असूनही तिचे स्वरूप निश्चित करण्याचा प्रयत्न अद्याप करण्यात आलेला नाही.