हिटलरच्या सेवा सार्या युरोप खंडभर सर्वत्र दणदणत चालल्या, त्यांना परदेश पादाक्रांत करून जिंकून घेण्याच्या नाझी आसुरी लालसेपेक्षा काही वेगळे, त्याहून काही अधिकच कारण होते. नव्या शक्ती उदयाला आल्या होत्या, व त्यांनी युरोपातील लहान लहान राज्ये वेगवेगळी स्वतंत्र्य राहण्याची राज्यपध्दती मोडून टाकण्याचे कार्य चालविले होले. हिटलरच्या सेना आता तितक्याच झपाट्याने माघार घेताहेत, किंवा त्यांचा पुरा नाश होतो आहे, पण अनेक राष्ट्रांचे मिळून मोठेमोठे राष्ट्रसंघ करण्याची कल्पना नाश पावली नाही, ती माघारही घेत नाही, ती त्या राष्ट्राराष्ट्रातून पसरून राहिली आहे. जुन्या काळातील एखाद्या दृष्ट्या मुनीने ईश्वरी संदेश आपल्या अमोघ वाणीने जगाला सांगताना त्याला जो आवेश येई त्या आवेशाने मि.एच.जी.वेल्स् हे आज कैक वर्षे जगाला सांगत आले आहेत की, आज अखिल मानवजाती एक युग ओलांडून दुसर्या नव्या युगापर्यत येऊन पोचली आहे. या संपलेल्या युगात मानवी व्यवहार फुटीरपणे चालत आला, राजकीय क्षेत्रात वेगवेगळी स्वतंत्र राज्ये आपल्या जागी स्वतंत्र रीतीने राज्यव्यवहार चालवीत होती, आर्थिक क्षेत्रात नफ्यावर दृष्टी ठेवून एकमेकाशी स्पर्धा चालविणार्या वेगवेगळ्या अनियंत्रित औद्योगिक संघटना अर्थव्यवहार चालवीत होत्या. वेल्स असे सांगतात की, राज्यव्यवहारात प्रत्येक वेगवेगळ्या राष्ट्राने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व चालवावे, अर्थव्यवहारात वेगवेगळ्या घटकांनी एकमेकांशी सहकार्य न करता आपापले स्वतंत्र नवे नवे उद्योग आरंभावे ही आतापर्यंतची मानवी व्यवहाराची पध्दत हाच जगाला लागलेला एक रोग आहे. प्रत्येक राष्ट्राचे वेगळे स्वतंत्र राज्य ही पध्दत सोडणे आता आपल्याला भाग झाले आहे. आता मानवी व्यवहाराचे असे एखादे समष्टिरूप शोधून काढले पाहिजे की, त्यात कोणाचीही अध:पात होऊ नये, दुसर्याचे अंकित दास होण्याचा प्रसंग कोणावर येऊ नये. कोणताही दिव्य संदेश सांगणार्याची त्याच्या समकालीन पिढीत उपेक्षाच होते, कधी कधी तर त्याला लोक दगड मारतात. मि.वेल्स व त्यांच्याच सारखे इतर अनेक ज्ञानवंत यांनी मानवजातीवर येणार्या संकटांची ही अशी आगाऊ सूचना दिली आहे, पण त्या सर्वांची गत हीच, त्यांनी कितीही जीव तोडून सांगितले तरी आज ज्यांच्या हाती त्याबद्दलचे अधिकार आहेत त्यांच्यापुरते तरी ते अरण्यरूदनच ठरते आहे, हे तर खरेच. पण त्यावरून कालाचा अनिवार्य ओघ कोणीकडे चालला आहे त्याच्या निदान खाणाखुणा तरी मानवजातीला दिसतात. आपल्याला ह्या कालप्रवृत्तीची गती वाढवता येईल किंवा तिला आडवे होऊन ती मंदही करता येईल किंवा असेही होईल की, ज्यांच्या हाती सत्ता आहे ते तितके आंधळेच झाले असले तर ह्या कालप्रवृत्तीच्या मूर्तिमंत रूपाचे त्यांना दर्शन घडवायला आणखी एखादा आतापर्यंत झाले त्याहूनही मोठा असा उत्पात घडून यावा लागेल.
काही गतकालीन घटना व त्या काळातले तात्विक विचार यांच्या निमित्ताने निघालेल्या परंतु प्रस्तुत काळाच्या दृष्टीने जवळ जवळ अर्थशून्य बनलेल्या घोषणा व ठरीव शब्दरचना यांचे जगात सगळीकडेच आहे त्याप्रमाणे हिंदुस्थानातही लोकांना फार वेड आहे. ह्या घोषणा व ही ठरीव वाक्ये यांचे मुख्य कार्य हे की, लोकांची विचारक्रिया तर्कशुध्द रीतीने होणे थांबते, पुढे काय केले पाहिजे ते आजची परिस्थिती पाहून निर्विकार मनाने ठरवणे त्यांना अशक्य होऊन बसते. हिंदुस्थानातील लोकांची आणखी एक मन:प्रवृत्ती अशी की, ज्या त्या गोष्टींचा तात्विक विचार चालवायचा, व कसली तरी अस्पष्ट ध्येये बाळगावयाची, हे तात्विक विचार, ही ध्येये आपापल्या परीने चांगलीच असतात, त्यांच्यामुळे लोकांच्या मनोभावना जाग्या होतात हे खरे, पण त्यामुळे विचाराला अनेक फाटे फुटून बुध्दीचा गोंधळ होतो, व कल्पनेच्या जगातच मन वावरत असते. अलीकडे काही वर्षे व्याख्यानांतून व लेखांतून देशाच्या भवितव्याविषयी, व विशेषत: देश अखंड राहावा का फाळणी व्हावी याविषयी, खूपच ऊहापोह चाललेला आहे. पण पाकिस्तानच्या पुरस्कर्त्यांनी या सार्या चर्चेत आपल्या मते पाकिस्तान याचा अर्थ काय आहे ते निश्चित सांगण्याचे व देशाची फाळणी केली तर तिचे परिणाम काय होतात त्याचा विचार करण्याचे अगदी कटाक्षाने नाकारले आहे. ते ही सारी चर्चा केवळ भावनेच्या पातळीवरून चालवतात, आणि त्यांना विरोध करणार्यांतील अनेक लोक तसेच करतात, आणि ती भावनेची पातळी म्हणजे केवळ एक कल्पनासृष्टी आपल्याला काय पाहिजे ते नक्की नसलेली काही तरी एक इच्छा असते, ह्या भावनेची प्रेरणा ज्या लाभाच्या आशेने झालेली असते तो लाभही काल्पनिकच. अशा प्रकारे या प्रश्नाकडे पाहण्याची उभयतांचीही दृष्टी भावनेने व कल्पनेने भारलेली असल्यामुळे ते परस्परांविरुध्द चालतात. दोघांनाही सामान्य असे काहीच उरत नाही. याचा परिणाम असा की 'पाकिस्तान' व 'अखंड हिंदुस्थान' या घोषणांचा सारखा यथेच्छ उपयोग चाललेला असतो. दोन्ही बाजू त्या घोषणा एकमेकावर उधळत असतात. कोणत्याही विशिष्ट लोकसमूहाच्या भावना, त्या समूहाच्या अंतरंगी कळून वळून किंवा न कळता लागलेली ओढ ह्यांनाही महत्त्व आहे, व त्यांची काही व्यवस्था लावली पाहिजे, त्यांचे समाधान झाले पाहिजे हे स्पष्ट आहे. परंतु खर्याखर्या गोष्टी व वास्तविक सत्य असेल ती परिस्थिती या प्रत्यक्षातल्या वस्तू त्यांच्याकडे नुसती डोळेझाक करून किंवा भावनेचा पातळ लेप चढवून पार नाहीशा करता येत नाहीत, भलत्या वेळी भलत्या प्रकारे डोके बाहेर काढून आपले अस्तित्व जाणवून देण्याची त्यांना चमत्कारिक सवय आहे. तेव्हा एखाद्या विषयात नुसत्या भावना हिशेबी धरून, किंवा त्या भावना अति उत्कट झालेल्या असल्यामुळे त्यांना सर्वांत अधिक महत्त्व आलेले असताना, जर त्या विषयासंबंधी अखेरचे निर्णय ठरवले तर ते चुकीचे असण्याचा संभव असतो व त्यामुळे पुढे त्यातून मोठ्या हानिकारक घटना निघण्याचा प्रसंग येतो.