निर्गत वजा घालून उरलेल्या आयात व्यापाराचे मूल्य व महायुध्दापूर्वी, सन १९३६-३८ या सालात, सरासरीचे ग्रेट ब्रिटनला द्यावे लागत होते त्याची रक्कम पौंडात शहायशी कोटी साठ लक्ष (८६,६०,००,०००) इतकी होती.  या इतर देशांना द्यावयाच्या ह्या मूल्याची फेड ग्रेट ब्रिटनने पुढे दिलेल्या विविध मार्गानी त्या कालात केली -
- निर्गत केलेल्या मालाचे मूल्य -            ४७८    दशलक्ष पौंड
- बाहेर देशात गुंतवलेल्या भांडवलाचे आलेले        २०३    दशलक्ष पौंड
उत्पन्न वळते केले ती रक्कम -
- समुद्रयानातून वाहतूक केली त्या धंद्यापासून    १०५    दशलक्ष पौंड
झालेले उत्पन्न -
- अर्थव्यवहारात केलेल्या नानाविध कामात          ४०    दशलक्ष पौंड
मिळाले -
- तोंडमिळवणीत आलेली तूट -              ४०    दशलक्ष पौंड
एकूण    ८६६    दशलक्ष पौंड

पूर्वी परदेशात गुंतवलेल्या भांडवलातून ग्रेट ब्रिटनला जे खूप मोठे उत्पन्न येत असे ते नाहीसे होऊन, हिंदुस्थान, इजिप्त, आर्जेंटाइन व इतर देशांतून ग्रेट ब्रिटनने जो माल उधारीने घेतला त्याचे मूल्य द्यावयाचे आहे त्याची रक्कम व ह्या देशाकडून जे अनेक प्रकारचे काम करवून घेतले त्याच्याबद्दल द्यावयाचे राहिलेले मूल्य म्हणून रक्कम, ह्या रकमांचे ह्या परदेशांना द्यावयाचे मोठे कर्ज (व शिवाय अमेरिकेकडून उधार-उसनवार म्हणून घेतलेल्या मालाचे व कामाचे कर्ज) हे ते तूर्त हिशेबात न धरता या एकूण कर्जाचा मोठा डोंगर यापुढे ग्रेट ब्रिटनच्या डोक्यावर राहणार आहे.   लॉर्ड केनेस ह्यांनी असा हिशेब केला आहे की, पौंडांच्या हिशेबाने फेडावयाच्या व सध्या तूर्त अडकवून ठेवलेल्या या साचलेल्या कर्जाची रक्कम एकूण ३००० दशलक्ष म्हणजे ३०० कोटी पौंड भरेल.  यावर दरसाल दरशेकडा पाच टक्के व्याज धरले तर नुसत्या व्याजापोटी दरसाल पंधरा कोटी पौंड होतात.  म्हणजे, या महायुध्दापूर्वीच्या काळातील सरासरी काढून ग्रेट ब्रिटेनच्या वार्षिक देण्याघेण्याचा आढावा पाहिला तर त्या हिशेबाने ग्रेट ब्रिटनवर दरवर्षी तीस कोटी पौंडांच्या पेक्षाही अधिक तूट सोसण्याचा प्रसंग येणार.  निर्गत व्यापारातून मिळणारे उत्पन्न व इतर देशांची नाना प्रकारची कामे करून त्याबद्दल मिळणारे उत्पन्न वाढवून ग्रेट ब्रिटनने ही तूट भरून काढली नाही तर तेथील लोकांच्या राहणीचे प्रमाण खूपच उतरेल.

युध्दोत्तरकालीन ब्रिटिशांच्या धोरणावर या सार्‍या विचारांचा प्रभाव विशेष पडलेला दिसतो, आणि आपल्याला जर स्वत:चे राहणीचे मान आहे तसेच ठेवून गृहस्थिती संभाळायची असेल तर अगदी निरुपाय म्हणून जे काही किरकोळ फरक करावे लागतील ते तेवढे करून आपले हे वसाहती साम्राज्य आहे तसेच पुढेही संभाळले पाहिजे असे त्यांना वाटते.  त्यांना स्वत:चा देश त्यांच्या वसाहती असलेले काही देश व काही इतर देश मिळून एक गट स्थापून त्या गटाचे प्रमुख कारभारी म्हणून त्यांनी आपले वर्चस्व चालवले तरच जगाच्या कारभारात त्यांना प्रमुख राहता येईल, असे केले तरच अमेरिकन संघ व रशियन संघ या दोन बलाढ्य सत्ताधीशांच्या प्रचंड साधनसंपत्तीशी राजकीय व आर्थिक क्षेत्रात बरोबरीचा तोल सांभाळण्याची आशा त्यांना बाळगता येईल.  अशी एकंदरीत वस्तुस्थिती असल्यामुळे ब्रिटिशांना आपले साम्राज्य चालू ठेवावेसे वाटते, जे हाती आहे त्यावरची पकड सोडू नयेसे वाटते, आपले वर्चस्व क्षेत्र वाढवीत राहावे, उदाहरणार्थ थायलंड (सयामदेश) वर आपले वजन पडावे, असे वाटते.  ह्याच हेतुने ब्रिटिशांनी आपले धोरण असे ठरविले आहे की, आपल्या सत्तेखालच्या देशाशी व पश्चिम युरोपातील काही लहानसहान राष्ट्रांशी असलेले आपले संबंध दृढतर करून त्यांना आपल्याशी एकजीव करावे.  फ्रान्स व हॉलंड या राष्ट्रांच्या ज्या वसाहती आहेत व जे देश त्यांच्या सत्तेखाली आहेत त्यांच्या विषयीचे त्या राष्ट्रांचे धोरणही ब्रिटिशांच्या धोरणाप्रमाणेच आहे.  वस्तुत: डच साम्राज्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या भोवती, त्यांच्या कक्षेत असणारी, एक छोटीशी ग्रहमालिका आहे, आणि ब्रिटिशांचे साम्राज्य राहिले नाही तर हे डच साम्राजही त्याबरोबर लय पावेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel