इतके सीताआत्या बोलली व तिला असा काही खोकला उसळला की, तो काही केल्या राहिना. तिचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली! ते पाहून रामकृष्णाला वाईट वाटले. खोकला थांबल्यावर तो बहिणीला म्हणाला, “सीताताई, तू माहेरी चल महिनाभर, आईबाप मेले म्हणजे माहेर संपले असे म्हणतात; परंतु अजून आम्ही आहो ना तुला? निदान मी तरी आहे. माझी बायको चांगली आहे. मी गरीब झालो असलो तरी एवढे सुख मला आहे. चल माझ्याकडे. माझ्या घरी मीठभाकरीला काही कमी नाही. उचलून पैसे देणे आम्हाला जड जाते; परंतु देवदयेने ताकभाताला कमतरता नाही. येतेस का?”
सीताआत्या म्हणाली, “अरे, येईन मी. माझेच ना तुम्ही भाऊ? पण ते य़ेथे एकटेच ना? आणि जीव गेला तरी अशा गरिबीमुळे ते तुमच्याकडे येणार नाहीत. स्वाभिमानी आहेत ते. आमचे हे दोन जीव. त्यांना मी व मला ते. खरोखर हल्ली घरात कामसुद्धा तेच करतात. मला पाणी आणून देतात, भांडी घासवयास लागतात, बाहेरचा गोठाही झाडतात. मला होतच नाही काम तर करू काय? त्यांना सारे काम करताना पाहून, रामकृष्णा डोळे की नाही भरून येतात! पण डोळे पुसायला तरी कोण आहे? हे काय? अरे, तू का रडायला लागलास? वेडा कुठला! छे, रडू नकोस असा. पूस डोळे. अरे, तुम्ही असे अधूनमधून येता, चौकशी करता, तेवढेच बरे वाटते. हल्लीच्या काळात एवढे तरी कोण करणार आहे? हल्ली कोणी कोणाचा नाही. रामकृष्णा, मी येत नाही म्हणून वाईट नको वाटून घेऊ. अरे, मी पडली अशी दमेकरी. तुझ्याकडे येऊन कोठे खाकरा टाकला, थुंकी पडली तर ते तुझ्या बायकोला झाले म्हणून रोज उठून का आवडेल? आणि कोणालाही झाले म्हणून काय म्हणून आवडावे? म्हणून दूर आहे तीच बरी. दुस-याचे चार कामधंदे करता येतील तर दुस-याककडे जावे; परंतु आमचेच तर सारे आज दुस-यांना करावे लागणार. माझे लुगडेसुद्धा हल्ली रामकृष्णा, आपल्या नेसूच्या पंचाबरोबर तेच धुऊन आणतात! मी येथे आहे तीच बरी. येत जा अधूनमधून बहिणीकडे! तेवढेच पुरे-” सीताआत्याला पुनः दम लागला. इतका दम लागला की ती घाबरली.
सीताआत्याला मुलबाळ नव्हते. घरदारही उरले नव्हते; परंतु आता तिचा एक नवीन संसार सजला होता. सीताआत्याला तिच्या एका भावाने एक गाय दिली होती. दूध विकत तरी किती घेणार? दुधासाठी व सीताआत्याला थोडा विरंगुळा व्हावा म्हणून तिच्या भावाने ती गाय दिली होती. गाय मोठी गोजिरवाणी दिसे. तिचा रंग काळा होता. जणू काळी कपिलाच! फक्त तिच्या तोंडावर एक मोठा ठिपका होता. जणू आकाशातील चांदच! त्या मो-या गाईची आई होती. ती वेळेला कोकणचे चार-चार, पाच-पाच शेर दूध देत असे. मोरी गाय आईप्रमाणेच दुधाळ होती. कधी कुणाला मारीत नसे. नवीन मनुष्य आला तर प्रथम जरा बुजे; परंतु प्रेमळपणाने तिच्या अंगावर हात मारला, तिला खाजविले, की तिची तक्रार नसे. तिच्या कासेखाली केव्हाही बसा, ती कधी म्हणून पाय उचलायची नाही, द्यायचे तेवढे दूध ती निमूटपणे देत असे.
ती गाय व गाईचा वासरे हीच आता सीताआत्याची संपत्ती होती. ती वासरे म्हणजे सीताआत्याची मुलेबाळे. हाच तिचा संसार. मो-या गाईला नवीन वासरे झाले की, सीताआत्याचा आनंद गगनात मावत नसे. त्या लहानशा पडवीत वासरे बांधलेली असावयाची. त्या वासरांना आंजारावे-गोंजारावे, त्यांना हाका माराव्या, त्यांच्याशी गोष्टी बोलाव्या यातच सीताआत्याचा सारा आनंद होता, हेच तिचे सर्व सुख होते.