“अमीन, मी तुझ्या घरी येऊ? मला घरी बाबा रागे भरतील. तुझे बाबा तुझ्यावर कधी रागावत नाहीत. येऊ का तुझ्याकडे ?” शशीने किती पण करुण वाणीने विचारले !
“चल शशी, माझ्या घरी चल. अम्मा आपणाला खाऊ देईल. आपण खेळू, चल.” असे म्हणून अमीनने शशीचा हात आपल्या हातात घेतला. शशी अमीनच्या घरी आला. अमीनचा बाप दादू पिंजारी अजून घरी आला नव्हता.
“माँ, मेरा दोस्त आया है. आम दे ना ? दो-दो आम.”दोन दोन आंबे मिळाले; दोघांनी ते मटकावले. शशी व अमीन खेळू लागले. दुसरीही मुसलमानांची मुले जमली.
“बेटा अमीन, आज बीज है. चांद देखो बेटा,” अमीनच्या आईने सांगितले. शशी, अमीन व इतर मुले चांद पाहू लागली. शशीला चांद सर्वांच्या आधी दिसला.
“अमीन, तो पाहा कोर. अरे, तिकडे नव्हे. ती झाडाची फांदी आहे ना, तिच्या जरा वर. हां तेथेच. आहे ना ? कशी छान आहे, नाही ?” शशी नाचू लागला. सा-यांना चांद दिसला. शशी चांदोबाचे गाणे सांगू लागला:
ये रे ये रे चांदोबा, चांदोबा।
रानात आहे वाघोबा, वाघोबा।।
ये रे ये रे चांदोबा, चांदोबा।
बिळात आहे नागोबा, नागोबा।।
वरती चांद उगवला, उगवला।
आईने बाळाला निजविला, निजविला।।
चांदोबा हसतो गगनात, गगनात!
आईचा बाळ पाळण्यांत, पाळण्यात।।
चांदोबा बाप्पा भागला, भागला।
पाळण्यात बाळ निजला, निजला।।
शशीचे गाणे इतर मुलांना फार आवडते; शशी त्या मुसलमान मुलांस आवडला. “शशी, अशी गाणी तुला आणखी येतात का रे ? आम्हाला शिकवशील ? तू आमच्यात खेळायला ये, आण्ही काही वाईट नाही. तुला मारणार नाही.” आब्बालस म्हणाला.