“मी आता येथेच राहणार आहे अमीनकडे. नाही का रे अमीन ?” शशीने विचारले.
“मग तर मजाच !” सारे म्हणाले.
बाहेर आता अंधार पडू लागला. इतर मुले घरी गेली. अमीनची आई शशीला म्हणाली, “बेटा अभी घरकू जा. तेरे मा-बाप तेरे वास्ते फिकरमें रहेंगे. जा बच्चा.”
शशीला आईची आठवण झाली. आपली आई वाट पाहात असेल, इतर मुलांजवळ आपली चौकशी करीत असेल-सारे त्याच्या मनात आले. परंतु बाबा ? ते बाबांचे मारावयासाठी उगारलेले हात, रागाने लाल झालेले डोळे, मोठे झालेले नाक-ते डोळ्यांसमोर उभे राहिले. घरी जावयाची त्याला भीती वाटू लागली. तो अमीनच्या आईस म्हणाला, “अमीनच्या आई, मी तुमच्याकडे राहिलो तर नाही का चालणार ? अमीन व मी एके ठिकाणी राहू, मला निराळे अंथरुण नको. अमीनचे अंथरुण आम्हा दोघांना पुरेल.”
शशीचे गोड शब्द एकून आम्माला वाईट वाटले.
इतक्यात अमीनचा बाप दादू पिंजारी घरी आला. अमीनने बापाच्या खांद्यावरील पिंजण्याची तात वाजविली. दादू लडिवाळपणे म्हणाला, “बेटा,अरे टूट जायेगी तात !” अमीनची आई पुढे झाली. तिने दादूजवळची पिंजणी घेतली व खुंटीवर ठेवून दिली. दादू शशीकडे पाहून म्हणाला, “हा रे कोण, अमीन ?” अमीन म्हणाला, “यह मेरा दोस्त है, शशी. अम्माने आम दिये.” दादू म्हणाला, “शशी बाळ, आता घरी जा. बाहेर रात्र झाली. तुझे आईबाप तुझी वाट पाहत असतील.” शशी म्हणाला, “मला तुमच्याकडे नाही राहू देणार ? घरी मला बाबा मारतील ! अमीनला पेन्सिल दिली होती, तर बाबा रागे भरले. ती पेन्सिल आज मोडली. बाबा म्हणाले होते, ‘घेऊन ये पेन्सिल.’ अमिनने आणि मी दोघांनी एकेक तुकडा घेतला. ते तुकडे पाहून बाबा रागावतील. मी नाही घरी जात.” दादू पिंजारी म्हणाला, “मी तुला वाटेत नवीन पेन्सिल घेऊन देतो चल. तुझ्या वडिलांना पण सांगेन घाबरू नकोस.”
शशीला घेऊन दादू निघाला. कागद लावलेली एक रंगीत पेन्सिल त्याने शशीला घेऊन दिली. शशीला आनंद झाला. शशीचे घर आले. त्याची आई त्याची सारखी वाट पाहत होती. हरदयाळ शशीला शोधावयास बाहेर गेले होते. दादूची व त्यांची वाटेत चुकामुक झाली.
शशी एकदम आईजवळ गेला व म्हणाला, “आई, बाबा मारणार नाहीत ना गं ? तू सांगशील ना त्यांना ?” आई म्हणाली, “अरे, पण इतका वेळ होतास तरी कोठे? शाळा सुटली की नीट घरी यावयाचे ते सोडून कोठे गेला होतास भटकायला ? किती वेळ शोधते आहे ! चौकशी केली. ते तुला बघायला गेले आहेत. आल्यावर रागावतील. ते का माझे ऐकणार आहेत ?”
“मी त्यांना समजावून सांगेन. मी थोडा वेळ थांबतो, येथे बसतो. तुमचा मुलगा मोठा गोड आहे. तो सा-यांना आवडेल.” दादू शशीचे कौतुक करीत म्हणाला.