शशी : बाबा, त्या तुटलेल्या ता-याने तुम्हाला येऊन सांगितले, होय ना ? बाबा, मी नाही हो पैसे घेतले ! मी येथेच निजतो. गाईने माझे अंग चाटले. वासराजवळ कशी ऊब आली आहे ! आई, मी येथेच निजू का ?

आई : बाळ, चल हो घरात, तू नाही घेतलेस पैसे. उठ, बाळ.

शशीला ते वात्सल्याचे शब्द ऐकून हुंदका आला. तो प्रेमाने गहिवरून म्हणाला, “आई, मी तुला आवडतो ना ? माझ्यावर नाही ना रागावणार? मी वाईट नाही ना ? पैसे नाही गं खाल्ले मी आई !” असे म्हणून शशी आईच्या ओच्याला धरून रडू लागला.
“पुरे झाले रडणे. आता घरात चल.” हरदयाळ म्हणाले. शशी घरात गेला. आईने बळेच त्याला खायला दिले. शशी झोपी गेला. त्याच्या स्वप्नात अमीन आला होता. परंतु अमीनने काय सांगितले ते त्याला सकाळी आठवले नाही.

सकाळ झाली शशी अंघोळ करून व देवाच्या पाया पडून शाळेत जावयास निघाला. बापाने त्याच्याजवळ मास्तरांना देण्यासाठी चिठ्ठी दिली. शशीच्या अंगावर माराचे वळ अजून दिसत होते. तो अजूनही सुकल्यासारखा, कोमेजल्यासारखा दिसत होता. सकाळच्या वेळी फुले फुलली होती, परंतु शशीचे मुखकमल म्लानच दिसत होते ! सूर्य़ उगवला व शशी निस्तेज झाला ! बापाचा राग गेला म्हणून थोडा आनंद त्याला झाला होता, परंतु तो आनंदही खिन्न होता. शशी शाळेत गेला, परंतु अमीन अद्याप आला नव्हता.

घंटा झाली मास्तर आले, शाळा सुरू झाली. अमीन आला नव्हता. म्हणून शशीला हुरहूर लागली. शशीने फी व चिठ्ठी मास्तरांजवळ दिली. मास्तरांनी चिठ्ठी वाचून ते म्हणाले, “पाहिलेत, त्या अमीननेच याचे पैसे चोरले. तरीच अजून आला नाही. चोर ! येऊ दे; त्याचे नावच शाळेतून कमी करतो.”

शशी एकदम उठून म्हणाला, “कोण म्हणते अमीनने पैसे घेतले ? मी तुम्हाला दिले होते फीचे पैसे. तुम्ही नाही म्हणाला, म्हणून बाबांनी हे पैसे दिले. अमीन काही चोर नाही माझा !”

मास्तर : मग मी चोर का रे ? ही तुझ्या बापाची चिठ्ठी बघ. अमीनच्या बापानेच तुझ्या बापाकडे येऊन सारे सांगितले. शिरजोर मगरूर पोरगा ! बस खाली.

अमीन उशिराने शाळेत आला. तो आल्याबरोबर मुले कुजबुजू लागली. अमीनला हसू लागली. मास्तर एकदम ओरडून म्हणाले, “माझ्या शाळेत चोरटी व खोटी बोलणारी मुले नकोत तुमच्यामुळे एखादे वेळेस माझ्या मानेला फास लागायचा ! नोकरी जायची अन् पोटावर पाय यायचा ! नीघ, क्षणभरही उभा राहू नकोस.”

अमीन : पण मास्तर मी खरी चोरी केली नाही. ते सारे खोटे शशीसाठी मी कबूल केले.

मास्तर : मला काही एक ऐकावयाचे नाही. मी तुझे नाव कमी करत आहे. जा. का मुलांकडून घालवून देऊ ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel