आईच्या गोड ओव्या शशी ऐकत होता व परम सुखात पोहत होता. तो मनात म्हणत होता, “मी बरा होईन, मग गोवारी होईन, गाई चारीन, रानात जाईन. मोराच्या पिसांचा मुकुट करीन, गळ्यात वनमाळा घालीन. मी लहानसा गोपालकृष्णच होईन- हो गोपालकृष्णच होईन मी ! बाबा आता रागावणार नाहीत. आईही रागावणार नाही. छोटा गोपालकृष्ण होईन मी-” असा विचार करता करता शशीचा डोळा लागला. तिकडे मधूही झोपला.
अमीनला शशी आल्याची वार्ता कळली. शशीची आठवण त्याला शंभरदा येत असे. कधी कधी अमीन त्या पिंज-यातील पाखराजवळ जाई व त्याला विचारी, “केव्हा रे येईल शशी ? तुला येते का त्याची आठवण ? तुला सोडू का ? जाशील का शशीकडे उडून ? त्याची बातमी आणशील ? हा खाऊ चोचीत धरून त्याला नेऊन देशील ?” अमीनचे ते बोलणे ऐकून पाखरू नाचे. पंख फडफडवी.
अमीन दादूला म्हणाला, “बाबा, शशी आजारी आहे. तुम्ही माझ्यासाठी छान कापसाची चांगली नवीन गादी जी परवा केली, ती द्या ना शशीला नेऊन ! शशीला ती माझी गादी आवडेल. ती मऊमऊ नवीन गादी.”
दादूच्या डोळ्यांतून पाणी आले. तो मुलाचे अंतरंग ओळखीत होता. त्याने नवीन गादी गुंडाळून घेतली व तो शशीकडे आला. दादू हरदयाळांना म्हणाला, “हरदयाळ, शशीला ही गादी घ्या. या गादीवर अजूनपर्यंत कोणी निजले नाही. ही कोरी आहे, उंची कापसाची आहे. अमीन सारखा माझ्या पाठीस लागला होता की, ही गादी शशीला द्या; म्हणून आज घेऊन आलो आहे. प्रेमाच्या देणगीचा अपमान करू नका.”
शशीच्या वडीलांना नाही म्हणवेना. गादी ठेवून दादू निघून गेला. हरदयाळ शशीला म्हणाले, “शशी, तुझ्यासाठी अमीनने स्वतःची गादी पाठविली आहे. ही गादी तुझ्याखाली घालतो.” ती मऊमऊ सुंदर गादी शशीखाली घालण्यात आली. शशीला किती आनंद झाला होता ! त्या मऊमऊ कापसासारखेच अमीनचे हृदय होते. ती गादी नव्हती; त्या गादीत अमीनने आपले प्रेम भरून पाठविले होते ! ते अमीनचे हृदय शशीच्या हृदयाशी मिळण्यासाठी आले होते. शशीने बापास विचारले, “बाबा, अमीन का नाही आला ? तो रागावला माझ्यावर ? का तुम्ही त्याला रागे भरला ? बाबा, अमीनवर रागावू नका हो ! मास्तरांनी मारले तर एक अमीन तेवढा माझ्यासाठी रडत असे. अमीनला बोलवाल ना, बाबा ?”
हरदयाळ म्हणाले, “तू बरा हो, मग येईल हो अमीन.”