बाळ एरव्ही कसाही असला तरी पहिल्या प्रतीचा बुद्धिमान होता. परीक्षेत तो प्रत्येक वर्गात पहिला येई. मेट्रिकच्या परिक्षेत तो पहिला येईल, असे सारे म्हणत. बाळ संध्या-स्तोत्रे विसरून गेला. परंतु त्याला इंग्रजी कविता किती येत! किती उतारे तो पाठ म्हणे. उत्कृष्ट इंग्रजी तो बोले व उत्कृष्ट इंग्रजी तो लिही.
बाळाची वार्षिक परिक्षा सुरू झाली म्हणजे गोविंदभटजी जेथे असतील तेथे देवावर अभिषेक सुरू करीत. अकरा ते सहा वाजेपर्यंत ते आवर्तने करीत बसत. संबंध दिवस उपवास! मग सायंकाळी ते उपवास सोडीत. बाळ पहिल्या नंबरचा पासही होई. आपला मुलगा पुढे कोणी तरी मोठा सरकारी अधिकारी होईल, असे गोविंदभटजींस वाटे.
सुट्टीत बाळ घरी आला म्हणजे त्याच्या आवडीचा भाज्या राधाबाई करावयाच्या. चवळ्या घालून केलेली फणसाच्या कुइरीची भाजी, वालाची डाळ, कोरड्या डाळिंब्या-सारे काही त्या करीत. बाळाची शर्ट-धोतरं त्याच धूत. एके दिवशी बाळाचा शर्ट काही चांगला धुतला गेला नाही. बाळ रागावला, रुसला नि आईला म्हणाला, “आई! हा सदरा कसा ग अंगात घालू? हे डाग तर जस्सेच्या तस्सेच आहेत. माझा शर्ट म्हणजे बाबांची घामट बाराबंदी नव्हे!”
आई म्हणाली, “बाळ, घरात साबण नव्हता. इवलीशी झीण होती ती फासली. चार रिठे चोळले. साबणाला पैसे कोठे आहेत, बाळ? आता येतील घरी, मग आणू हां साबण.”
“बाबा केव्हा येणार देव जाणे अजून महिना लागेल त्यांना आणि इतके दिवस असले कपडे घालू? मला इंग्रजी शाळेत कशाला ग घातलेस?” बाळ रागाने बोलला.
मॅट्रिकच्या परीक्षेत बाळ पहिला आला. राधाबाईंनी गावभर गूळ वाटला. शाळेच्याही वतीने बाळाचा सत्कार करण्यात आला. बाळाला मोठी स्कॉलरशिप मिळाली. त्याला पारितोषिकेही बरीच मिळाली. बाळ आता कॉलेजात जाणार होता, कॉलेजच्या छात्रालयात राहणार होता. म्हणून राधाबाईंना सारखे वाईट वाटत होते, एकुलता एक मुलगा! हुशार, होतकरू, सद्गुणी व सुंदर. तो दूर जावा असे कोणत्या आईला वाटेल?
परंतु आईचे रडणे बाळाला आवडत नसे. एके दिवशी तो आईला म्हणाला, “हे गं काय आई, तू सारखी रडतेस? मला किती आनंद आहे! मी खूप शिकेन, विलायतेत जाईन, कलेक्टर होईन. आई! आता मी कॉलेजात जाईन. तेथे खूप मजा असते. तू रडू नकोस. मी सदैव घरी असावे असे का तुला वाटते? मी भटजी होऊ? ‘घृतं च मे, मधु च मे’ असे करू? दर्भ, पळीपंचपात्री, मुकटा घेऊन का हिंडू? मला इंग्रजी शिकविलेत, आता मी घरी कसा राहू?”