नाशिकला एका पंड्याच्या घरी गोविंदभटजी उतरले. त्यांनी गंगेचे स्नान केले, रामाचे दर्शन घेतले. पंचवटी पाहिली, सीतागुंफा पाहिली, शंकराचार्याचे देऊळ पाहिले. गोविंदभटजींना आता आशा राहिली नव्हती. दुस-याच दिवशी संध्या करताना, गायत्रीमंत्र म्हणताना ते पडले. पडले ते पडलेच ! ते रामचरणी जाऊन जडले ! राधाबाई निराधार झाल्या. पती गेला ! पुत्र असून दुरावला !

राधाबाई आता सोवळ्या झाल्या. नाशिकला सारे विधी झाले. आता राधाबाई कोठे जाणार ? नाशिकला कोणाकडे स्वयंपाक वगैरे करावयास त्या जाऊ लागल्या. एके दिवशी एका स्वयंपाकीणबाईची व राधाबाईंची गाठ पडली. ती बाई मूळची नाशिकची, परंतु उमरावतीस स्वयंपाक करावयास राहात असे. राधाबाईंचे व तिचे पुष्कळ बोलणे झाले. राधाबाईंनी तिच्याबरोबर उमरावतीस जाण्याचे ठरविले. मुलाच्या घरी आई म्हणून नाही तर स्वयंपाकीणबाई किंवा मोलकरीण म्हणून तरी एखादे वेळेला जाता येईल, अशी वत्सल आशा राधाबाईंच्या मनात होती.

राधाबाई त्या बाईबरोबर उमरावतीस आल्या; काम करावयास वगैरे जाऊ लागल्या.
बाळासाहेबांची पत्नी मालती पुनः बाळंत होणार होती. तिचे दिवस भरत आले होते. त्यांच्याकडे एक स्वयंपाकीणबाई होतीच. परंतु दुसरी एक बाई त्यांना पाहिजे होती-अंगाला लावायला, मुलाला न्हाऊ-माखू घालावयाला, इतर काही वरचे काम करावयाला पाहिजे होती. मालतीबाईंनी आपल्या स्वयंपाकीणबाईंस एखादी ब्राह्मणाची पोक्तशी बाई मिळते का पाहा, म्हणून सांगितले. या स्वयंपाकीणबाईची व राधाबाई जिच्याबरोबर आल्या होत्या, त्या बाईंची ओळख होती. राधाबाई संधीची वाटच पाहात होत्या. त्यांना विचारताच त्यांनी संमती दिली. अपार आनंद झाला त्यांना.

मुलांच्या बंगल्यात, राधाबाई मोलकरीण म्हणून जाणार होत्या ! मातृहृदयास वात्सल्याचे भरते आले होते ! राधाबाईंना तेथेच राहावयाचे होते, तेथेच जेवावयाचे होते. रात्रंदिवस बाळाच्याच घरात त्या आता राहणार होत्या. त्यांना तेथे एक खोली देण्यात आली होती.

बाईसाहेब सुखरूपणे बाळंत झाल्या. दुसरा मुलगा झाला, नक्षत्रासारखा होता. राधाबाई मालतीच्या अंगास लावू लागल्या. किती प्रेमाने त्या तेल वगैरे लावीत ! जसा मातेचा हात ! त्या काढत पाणी आंघोळीला देत, व मालतीच्या पाठीला साबण लावीत, तिची पाठ घाशीत. मालती जसे सांगेल तसे त्या करीत. मालतीच्या लहान मुलाला राधाबाईंच न्हाऊमाखू घालीत. नातू मांडीवर घेताना राधाबाईंच्या डोळ्यांत प्रेमाश्रू येत. मुलाची हगेलीमुतेली त्याच धूत. पहिला मुलगा नरेश, त्यालाही त्याच साबण वगैरे लावून आंघोळ घालीत, कपडे घालीत.

बाळंतिणीसाठी डिंकाचे व आळिवाचे लाडू करावयाचे होते. राधाबाईंनी आळीव निवडले, नारळ खोवले, डिंक कुटला. वृद्ध होत जाणा-या राधाबाईस आपल्या सुनेची सेवा करताना अपार आनंद होत होता, त्यांनी आपला मुलगा बाळ-बाळासाहेब यालाही पाहिले. “कसा राडबिंडा दिसतो माझा बाळ !” असे त्या मनात म्हणाल्या, बाळासाहेबांनी राधाबाईस पाहिले. ते म्हणाले, “या का नवीन बाई ?” स्वयंपाकीणबाई म्हणाली, “होय.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel