मालती म्हणाली, मकॉलेसाहेबाला मिल्टनचे ‘पॅराडाइज लॉस्ट’ पाट येत असे, म्हणून आपण त्याचे कौतुक करतो. साहेब करतो तेवढे चांगले, आपले लोक करतात ते सारे वाईट का! जे सुंदर आहे आणि जे पवित्र आहे, ते पाठ करण्यात एक प्रकारचा दिव्य आनंद असतो. मी परवा ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी वाचले की ज्यांनी आपल्या मुखात ब्रह्मशाळा उघडली आहे त्यांनी वाङमयतप केले. किती सुंदर वर्णन!

“मालती ब्राह्मणाचे केवढे उपकार! हजारो वर्षे त्यांनी ज्ञान पाठ करून जिव्हाग्री जिवंत ठेविले. कोणी वेद पाठ करून ठेविले, कोणी शास्त्रे पाठ करून ठेविल. कोणी काव्ये पाठ करून ठेविली! प्राचीन संस्कृती, प्राचीन विचार, सारे सांभाळून ठेविले. स्मरणशक्ती व पाठशक्ती सतेज राहाव्या म्हणून त्यांनी आपली राहणी सात्विक निःशुद्ध ठेविली, आहारविहार नियमित केले, जीवनात संयम राखिला, विलासलोलुपता कमी केली.”

“मालती माझे वडील पहाटे उठून वेदमंत्र म्हणत. ते ऐकणे किती गोड, गंभीर न् तेजस्वी वाटे! वेदांतील भाषा काही काही ठिकाणी किती ओजस्वी आहे, किती भावनोत्कट आहे! रुद्र, त्रिसुपर्ण वगैरे मंत्र किती उदात्त आहेत! ब्राह्मणांचा उपहास करतात, परंतु त्यांनीच हे ज्ञानभांडार जतन करून ठेविले. ज्या संस्कृतीमुळे भारताला मान वर करून राहता येते, ती उपनिषदे, रामायण-महाभारत, ती वेदान्तव्याकरणमीमांसादी शास्त्रे, सारी त्यांनीच सुरक्षित ठोवली. त्यांसाठी त्यांनी इतर धंदे सोडले, वैभव वमनवत् मानिले. ब्राह्मणाचे दोषही असतील. परंतु त्या संस्कृतिसंरक्षकांचे कृतज्ञतापूर्वक आभार नको का मानावयाला! मालती! असे हे चालतेबोलते वेद, हे चालतेबोलते ज्ञानकोश हिंदुस्थानातील खेड्यापाड्यांतून पूर्वी असत. अजूनही असतील. कोणी मॅक्सुमुल्लर येऊन त्यांचे पाय धरील आणि मग त्यांची किंमत आम्हाला कळेल! मालती, मालती, मी काय सांगू!” असे म्हणून बाळासाहेब एकदम रडू लागले.

“काय झाले! असे काय करता! सांग ना, काय झाले ते!” मालती प्रेमाने संबोधू लागली.

मालती, माझे बाबाही असेच वेदोनारायण होते. तेही असेच, त्या तैलंगी ब्राह्मणाप्रमाणेच सर्वत्र हिंडत. माझ्या शिक्षणासाठी हिंडत हो! त्यांचे असेच ठायी ठायी अपमान झाले असतील, असेच श्रीमंतांच्या नोकरांनी त्यांना घालवून दिले असेल, अशाच शिव्या दिल्या असतील, अशीच कुत्री भुंकली असतील! परंतु आपला बाळ शिकावा म्हणून मुकाट्याने त्यांनी सारे सहन केले असेल. असेच पायांनी ते गावोगाव भटकत! मला त्यांनी शिकविले, परंतु मी त्यांना हाकलून दिले, त्यांना ओळखही दिली नाही! माझ्या शिपायाने या आपल्या अंगणातून त्यांना हाकललेले मी गच्चीतून  पाहिले! बाबांनी माझ्याकडे न् मी बाबांकडे पाहिले. मी काही बोललो नाही! तुला आठवतो का तो दिवस! आपण नरेशबरोबर खेळत होतो. खाली एक घोड्याची गाडी आली होती आणि एक ब्राह्मण “माझा बाळ राहतो का येथे!” म्हणून विचारीत होता. मालती, ते माझे थोर वडील होते. ती थोर श्रुतिमाऊली होती. ती श्रुतिमाऊली मी घालविली. ती कामधेनू मी हाकलून दिली! मी साहेब बनलेला. पित्याच्या पाया पडण्याची, त्याला घरात घेण्याची मला लाज वाटली! मालती, इंग्लडमध्ये असताना इजिप्तवरचे एक पुस्तक मी वाचले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel