परंतु अद्याप मन शांत होईना. जवळच असलेली आई भेटेना! अजून ते अहंकारशून्य झाले नव्हते. बाळासाहेबांच्या शरीरावर परिणाम झालाच. ते आजारी पडले. एके दिवशी ते कचेरीत घेरी येऊन पडले. सारे घाबरले. त्यांना मोटारीतून घरी नेण्यात आले, डॉक्टर त्यांना तपासून औषध देऊन गेले. बाळासाहेबांच्या अंगात तार भरला. ते अंथरुणाला खिळले. मालतीचा जीव खाली-वर होत होता.
“राधाबाई, मुलांना अगदी रडू देऊ नका. नरेशला मोठ्याने रडू देऊ नका. तुम्ही मुलांना घेऊन खाली बसा, म्हणजे वर त्रास होणार नाही. राधाबाई, त्यांना थोडीसुद्धा झोप लागत नाही. ते सारखे सचिंत असतात. ताप हटत नाही. करू तरी काय मी, राधाबाई!” मालती मुलीसारखी रडू लागली.
“रडू नका बाईसाहेब! सारे बरे होईल. देव दया करील. तुमचा मायाळू प्रेमळ स्वभाव, तुमची पुण्याई त्यांना बरे करील. तुम्हाला रोज रात्रीची जागरणे होतात. रात्री मी बसत जाऊ का तेथे? तुम्ही थोडी विश्रांती घेत जा. नाही तर तुम्हीही आजारी पडायच्या. मग मुलांचे हाल होतील. तुम्हाला आजारी पडून नाही चालणार. तुम्हाला आणि त्यांना अपमान नाही वाटला, तर मी रात्रीची बसत जाईन. मला तरी मेलीला झोप कुठे येते! आधीच वय झालेले. अन् बाईसाहेब, मलाही काळजी वाटते हो बाळासाहेबांची! मीसुद्धा बसते जप करीत आणि देवाला म्हणते, रामराया, बाळासाहेबांना गुण पाड. नरेशाचे वडील बरे कर. बाईसाहेब, बसू का रात्रीची तेथे? तुम्ही ‘हो’ म्हणाल तर बसेन. सांगाल तर औषध देईन, कमीजास्त झाले तर तुम्हाला उठवीन.” राधाबाई म्हणाल्या.
“बसा हं. तुम्ही परक्या थोड्याच आहा? आणि मला तरी प्रेमाचे दुसरे कोण आहे? तुम्ही मुलांचे किती मनापासून करता-” असे मालती म्हणाली व बाळासाहेबांकडे गेली. बाईसाहेब रडत होते. उशी ओली झाली होती. मालती सद्गदित होऊन म्हणाली. “हे काय असे? किती रडाल तरी! नका हो असे घडीघडी अश्रू ढाळू. भेटेल हो आई! बरे व्हा अन् मग आपण निघू शोधायला. आईला घेऊन येऊ. डोळे किती खोल गेले!” असे म्हणून मालतीने पदराने पतीचे डोळे पुसले, तो पुनः हुंदका आला. बाळासाहेब मोठमोठ्याने रडू लागले. मालती घाबरली. राधाबाई तेथे आल्या. मालती म्हणाली, “राधाबाई, एकसारखे रडताहेत हो! काय करू मी? तुम्हाला तरी काही उपाय माहीत आहे का? खंडू डॉक्टरांना तरी बोलावून आण रे! राधाबाई, तुम्ही तरी सांगा हो काही! पाहा, कसे मुलासारखे रडत आहेत ते!”
“बाळासाहेब, नका हो असे रडू. असे रडणे चांगले नाही. शांत पडून राहा. काळजी नका करू. देव लवकर आराम पाडील. तुम्ही चांगले शिकले-सवरलेले. मी काय सांगणार अडाणी? पुसा डोळे-असे पडून राहा.” राधाबाई सांगत होत्या. बाळासाहेब डोळे पुसून स्थिर दृष्टीने राधाबाईंकडे पाहात होते.
“ते उठू पाहात आहेत. ते पाहा-”
“हे काय! उठू नका, असे काय बघता? नका उठू. काय पाहिजे? पुस्तक का हवे? मी आणून देत्ये. डॉक्टरने सांगितले आहे, उठू नका, पडून राहा.” उठू पाहाणा-या पतीला मालतीने उठू दिले नाही. राधाबाई खाली निघून गेल्या. मोक्षाची वेळ आली होती. पण पुनःअहंकार- राहूने ग्रासले. अहंकाराचा समुळ नाश झाल्याशिवाय मातेची भेट नाही, मोक्ष नाही. दृष्टी प्रेमाने धुऊन निर्मळ झाल्याशिवाय जवळच असणारीही आई मिळणार नाही-जवळ येणार नाही.