‘करुणे, रडू नकोस. ये, इकडे ये, करुणे!’ पुन्हा शांत. ‘करुणा, केविलवाणी करुणा? अरेरे!’
पुन्हा शांत. शिरीष एका कुशीवरुन दुस-या कुशीवर वळला. घोरु लागला. हेमा विचार करीत होती. करुणा? कोण ही करुणा ? ईश्वराची का करुणा ? कोणाची करुणा ? करुणा का कोणाचे नाव आहे ? कोणा स्त्रीचे ? हेमा अस्वस्थ झाली.

दुस-या दिवशी फिरायला गेली असता दोघे त्या पूर्वीच्या वृक्षाखाली बसली.

‘हेमा, येथे तू लपली होतीस.’

‘आणि करुणा कोठे लपली आहे ?’

‘देवाजवळ.’

‘शिरीष, करुणा कोण ? तू काल झोपेत ‘करुणे, करुणे, ये, रडू नकोस,’ असे म्हणत होतास. ही कोण करुणा ? कोणाची ? काय पडले स्वप्न ? काय आहे हे सारे ?’

‘हेमा, असंबद्ध स्वप्नात का काही अर्थ असतो ? पडलेल्या पा-याचे कण जुळवणे कठीण, त्याप्रमाणे भंगलेल्या स्वप्नातून अर्थ काढणे कठीण.’

‘परंतु काही तरी अर्थ असतो. स्वप्न म्हणजे आपल्याच गतजीवनातील प्रसंगांचे चित्रण. आपल्याच दाबून ठेवलेल्या वृत्तीचे प्रगटीकरण. ज्या व्यक्तींना आपण बाहेर प्रगटपणे भेटू शकत नाही त्यांना स्वप्नात भेटतो. स्वप्न म्हणजे परिस्थितीवर विजय.’

‘हेमा, लहानपणीचे स्वप्न मी पाहात होतो. आमच्या गावात एक मुलगी होती. तिचे नाव करुणा. तिचे आईबाप लहानपणीच वारले. ती दुःखीकष्टी असे. एकदा ती रडत होती. तिचे अश्रू मी पुसले होते. तिला खाऊ दिला होता. पुन्हा एकदा ती अशीच रडत जात होती; मी तिला हाका मारल्या. ती आली नाही. मोठी अभिमानी होती ती, जरी परकी होती. किती वर्षांची आठवण! आपल्या जीवनाच्या तळाशी अनेक गोष्टी जाऊन बसलेल्या असतात.  कधी वादळ आले तर हा सर्व जीवनसागर बहुळला जातो. तळाशी बसलेले प्रकार वर येतात. वरचे प्रकार खाली जातात. मानवी जीवन म्हणजे चमत्कार आहे. हे मन म्हणजे महान विश्व आहे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel