रामभाऊंना एक मुलगा होता. त्याचे नाव गोपाळ. असेल वर्षा-सव्वा वर्षांचा. मोठा चपळ व खेळकर. क्षणभर घरात टिकावयाचा नाही. गावातील पाटलाने गोपाळला बाळलेणे करून दिले. परंतु रामभाऊ म्हणाले, 'ब्राम्हणाला सोन्या-चांदीचे, हिरे-मोत्याचे दागिने शोभत नाहीत. ज्ञानाचा व शीलाचा दागिना त्याने मिळवावा व घालावा. त्यानेच त्याला शोभा.' रामभाऊंनी ते बाळलेणे स्वीकारले नाही.
थोर मनाचे रामभाऊ आजारी पडले. शाळा बंद राहू लागली. रामभाऊंचा ताप निघेना. घाम येईना. लक्षणे बरी दिसत ना. सीताबाई सचिंत दिसू लागल्या. त्या देवाला आळवीत होत्या. पतीची सेवा करीत होत्या. एके दिवशी तर त्यांना रडू आले. रामभाऊंनी त्यांना जवळ बोलावले व ते म्हणाले, 'मला काही तुला सांगायचं आहे, ते नीट ऐक.' पतीचे डोके मांडीवर घेऊन सीताबाई बसल्या. रामभाऊ म्हणाले,
'हे बघ, मरण कोणाला टाळता येत नाही. त्याचं दु:ख कशाला? तुला मी गीता वाचून दाखवतो, त्यात नाही का सांगितलं? तुझे अश्रू पाहून मला वाईट वाटतं. गोपाळ आहे. त्याला तू वाढव, लहानाचा मोठा कर, देव सर्वांना आहेच. तो पोपटाला रंग देतो, मोराला पिसारा देतो, कोकिळेला गळा देतो. त्याला सार्यांची काळजी. तू वाईट नको वाटून घेऊ. मी मरणार हयात शंका नाही. आज-उद्या. दोन दिवसांचा मी सोबती आहे. मला सारं कळून चुकल आहे. बोलावणं आलं आहे. गेलं पाहिजे, नाही का? तू शांत व समाधानी राहिलीस तर मी सुखानं मरेन; परंतु तू रडू लागलीस तर मला मरताना शांत कसं राहाता येईल? माझी शांती तुझ्या हाती. मला मांडी दिलीस, आता मला शांतीही दे. पूस तुझे डोळे. ते ओले नको होऊ देऊ. रडणं हा देवाचा अपमान आहे. त्याच्या आमंत्रणाचा तो अपमान आहे. त्याच्या इच्छेला आपण राजी, आपण तयार असलं पाहिजे, नाही का?'
सीताबाई ऐकत होत्या. राम-सीतेचाच जणू तो जोडा होता. त्यांनी आपले डोळे पुसले. त्या दिवसापासून त्यांच्या डोळयांना पाणी आले नाही. त्या गंभीर व शांत होत्या. रामभाऊ त्यांना म्हणत, 'तुझं व्यंकटेशस्तोत्र म्हण. ऐकू दे मला. का सखूचं गाणं म्हणतेस? सखूचं गाणं तुझं आवडतं. म्हण तेच.' सीताबाई म्हणत व रामभाऊ ऐकत.
असे आजारीपणाचे दिवस चालले. एके दिवशी रामभाऊंनी राम म्हटला. सीताबाई एकटया राहिल्या. गोपाळ लहान होता. त्याला पोटाशी धरून त्या रडल्या; परंतु पतीचे शब्द आठवून त्या पुन्हा शांत झाल्या. पतीचा आत्मा आपल्याभोवती असेल. हे अश्रू पाहून त्या आत्म्याला शांती मिळणार नाही असे मनात येऊन त्या लगेच अश्रू पुशीत.