दोघांचा बळी
त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते सारे पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जबाबदारी दोन प्रधानांवर सोपवली होती.
राजक्रांतीच्या वेळेस हया दोन प्रधानांना लोक देवाप्रमाणे मानीत त्यांच्या नावाचा जयजयकार केला जाई. किती त्यागी, किती थोर त्यांची देशभक्ती असे सारे म्हणत; परंतु आता पूर्वीप्रमाणे लोकांची श्रध्दा त्यांच्यावर राहिली नाही. समाजात काही मत्सरी लोकांनी त्या दोन प्रधानांच्या विरुध्द सारखी मोहीम सुरू केली. हे प्रधान स्वार्थी आहेत, मानासाठी हपापलेले आहेत, राजाला ह्यांनीच प्रवासासाठी पाठविले, ह्यांना सर्व सत्ता स्वत:च्या हाती घ्यावयाची आहे, कसली देशभक्ती नि कसले काय, अशा प्रकारचा विषारी प्रचार त्यांनी सुरू केला. सभांतून, वर्तमानपत्रांतून, खाजगी बैठकींतून एकच सूर ऐकू येऊ लागला.
लोक चंचल असतात. ते आज एखाद्याची पूजा करतील, उद्या त्याचीच कुतरओढ करतील. ते आज जयजयकार करतील, उद्या शिव्या-शाप देतील. आज उंचावर चढवतील, उद्या खाली ओढतील, आज फुलांचे हार घालतील, उद्या दगड मारतील. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. लोकांना जसे वळवावे तसे ते वळतात. अग्नीने सुंदर स्वयंपाक करता येतो, आगही लावता येते. लोकांना शांत ठेवता येते, त्यांना प्रक्षुब्धही करता येते. पाणी शांत असते, परंतु जोराचा वारा सुटला तर तेच पाणी प्रचंड लांटाचे रूप धारण करते. मोठमोठया बोटीही मग त्या लाटांसमोर टिकू शकत नाहीत. त्याप्रमाणे शांत राहाणारी जनता कोणी एखाद्या गोष्टीचा तुफानी प्रचार केला तर खवळते. ती मग आवरता येत नाही.
राजधानीतील लोक त्या दोन प्रधानांविरुध्द फारच बिथरले. एके दिवशी सायंकाळी विराट सभा झाली. द्वेषाची आग पाखडणारी भाषणे झाली. प्रधानांच्या घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. ‘मारुन टाका हे प्रधान; स्वार्थी बेटे; देशभक्त म्हणून मिरवतात; तुकडेतुकडे करा. आगा लावा त्यांच्या बंगल्यांना-’ असे ओरडत प्रक्षुब्ध जनता निघाली.
एक प्रधान घरात सापडला. दुसरा कोठे आहे? परंतु आहे त्याची तरी उडवा चटणी. जो प्रधान सापडला त्याला लोकांनी फराफरा ओढीत आणले. कोणी हात तोडला. कोणी पाय उडवला. हाल-हाल करुन त्या प्रधानाला मारण्यात आले. त्याचे डोके भाल्यावर रोवून ते मिरवण्यात आले. ‘देशद्रोहयांना असे शासन हवे. स्वार्थी लोकांना हे बक्षीस मिळते-’ असे गर्जत लोक गेले.
परंतु तो दुसरा प्रधान कोठे आहे? राजधानीतील काही विचारी माणसांनी एक पत्रक काढले. ‘एका प्रधानाचा लोकांनी सोक्षमोक्ष लावला. आता दुसर्याचा सूड घेण्यास ते अधीर झाले आहेत; परंतु हा खरा मार्ग नव्हे. प्रधानांची न्यायासनासमोर चौकशी होऊ दे. जर ते दोषी ठरले, त्यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले तर त्यांना होऊ दे शिक्षा. आता दुसर्या प्रधानास तरी न्यायासनासमोर उभे करा.’