त्या दिवशी उजाडत ढब्बूसाहेब फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले. शिपायाने कोठडी उघडली. साहेब आत शिरले. ते खोलीत पाहू लागले. तेथे मडक्यात तो वेल वाढत होता. संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले.
‘हा कसला वेल? हा वेल वाढवून खिडकीतून खाली सोडायचा असेल. त्या दोराच्या साहाय्याने पळून जायचे असेल. होय ना? मोठे बिलंदर बोवा तुम्ही क्रान्तिकारक. कोठे काय कराल त्याचा नेम नाही. कोठून आणलेस हे मडके? कोठून आणलीस माती?’
‘मडके मला मिळाले होते. माती मी मागितली. हा साधा फुलवेल आहे. हयाने मी कसा पळणार? खिडकीला भलेभक्कम गज आहेत. साहेब, काहीच्या काही शंका घेऊ नका. तुरूंगातील एवढा तरी माझा आनंद नाहीसा नका करु. हा वेल वाढविणे, त्याची पाने पाहाणे हयात माझा वेळ जातो.’
‘तुरुंग का सुखासाठी असतात, आनंद देण्यासाठी असतात? तुम्हाला त्रास व्हावा, कंटाळा यावा हयासाठी तुरूंग असतात. ते काही नाही. शिपाई,? फोडा ते मडके, तोडा तो वेल. खबरदार कोणी माती वगैरे पुन्हा द्याल तर. हे क्रान्तिकारक मोठे पाताळयंत्री असतात. मोठे कारस्थानी. बघता काय? फोडा ते मडके.’
‘नका फोडू. माझा सारा आनंद, माझा प्रयोग, नका नष्ट करू.
‘प्रयोग? अरे लबाडा! पळण्याचा प्रयोग होय ना? फोडा, तुकडे करा त्या मडक्याचे. त्या वेलाचेही तुकडे करा.’
शिपायांनी ते मडके फोडले. तो बेल कुस्करुन फेकून देण्यात आला. फुला कष्टाने ते सारे पाहात होता. साहेब अजून खोलीत पाहात होते. त्यांचे लक्ष एकदम वर गेले. तो तेथे पाखरांचे घरटे.
‘पाखरांचे घरटे येथे कशाला? तुम्ही पक्षी पाळाल व त्यांच्याबरोबर निरोप पाठवाल. त्यांच्या गळयात चिठ्ठी बांधाल व धाडाल. हे नाही उपयोगी. शिपाई, पाडा, ते घरटे पाडा.’
‘त्यात मादीने अंडी घातली आहेत. ती येईल व टाहो फोडील. नका पाडू ते घरटे. अंडयांतून चिव चिव करीत पिले बाहेर येतील. नका, नका फोडू ती अंडी. नका मारू उद्याचे आनंदी जीव.’
‘शिपाई, बघता काय? ओढा काठीने ते घरटे.’
ते घरटे पाडण्यात आले. ती सुंदर अंडी खाली पडून फुटली. फुलाला पाहावेना. त्यांने डोळे मिटून घेतले.
‘पुन्हा तुझ्या खोलीत पक्षी दिसला किंवा घरटे दिसले तर अंधारकोठडीत तुला ठेवीन. याद राख-’ असे म्हणून ढब्बूसाहेब निघून गेले.