‘हा जो यशस्वी प्रयोग येथे आहे, तो कोणी केला? हे येथे एक गृहस्थ आहेत. त्यांचे नाव गब्रू. त्यांनी आपली मान विनयाने खाली घातली आहे. हे गब्रू म्हणतात की, ‘हा प्रयोग मी केला त्यांना जर शास्त्रीय माहिती विचारली तर ते म्हणतात, ‘मी प्रयोग केला आहे; माहिती मागून देईन.’ ही माझ्या डाव्या बाजूस सुंदर मुलगी बसली आहे. ती म्हणते, ‘हा प्रयोग मी केला.’ प्रयोग कसा-कसा केला त्याची माहिती तिने टिपून ठेवली आहे. ही पाहा तिची रोजनिशी. हिच्यात सारे आहे; परंतु हया मुलीला कोठून आले हे ज्ञान? ते ज्ञान तिला आता आणलेल्या हया थोर पुरूषाने दिले. हा पुरुष तुम्ही ओळखलात का ज्याला तुम्ही फाशी देणार होतेत, तोच हा महात्मा. तुरूंगातही ध्येयपूजा त्याने सोडली नाही. हयाच्यासंबधाने सारे कागदपत्र मी वाचले. हा थोर पुरुष निर्दोष आहेत. जे कागदपत्र हया कैद्याच्या घरी सापडले त्यात काय होते? देशासाठी त्या प्रधानांनी काय-काय केले, किती त्याग केला, किती आपत्ती सोसल्या, त्यांचा पुरावा होता; परंतू ‘ते कागद जाळून टाक. आमचा त्याग जगाला कळायला कशाला हवा? अज्ञात असू दे आमचा त्याग.’ अशी चिठ्ठी त्या प्रधानांनी आपल्या मित्राला पाठवली होती, परंतू हया मित्राने ते कागद जाळले नाहीत. असो. ते थोर प्रधान तर गेले; परंतु हा पुष्पसृष्टीत चमत्कार करणारा मित्र सुदैवाने वाचला. त्याने हे फूल फुलविले. त्याने हया मुलीकडून हा प्रयोग करविला. ही मुलगी तुरूंगाच्या अधिकार्याची. हया थोर पुरूषाने तिला लिहा-वाचायला शिकविले. फुले फुलवणार्या हया माळयाने हया मुलीची जीवनकळीही फुलविली. हया एक लाख रुपयांच्या बक्षिसांच्या लोभाने पलीकडे ते काळवंडलेले गृहस्थ आहेत त्यांनी पाप केले. त्यांनी ही कुंडी लांबविली. ह्या मुलीच्या बापाचा त्याने विश्वासघात केला. ज्या शृंखला ह्या थोर पुरूषाच्या पायांत होत्या, त्याच हया लफंग्याच्या पायांत घालून त्याला योग्य ती शिक्षा केली जाईल. परंतु आधी हा गोड समारंभ संपवू या. एक लाख रुपयाचें बक्षीस, या शास्त्रज्ञाला मी देतो. असेच देशाचे नाव ते वाढवोत. ध्येयाची ते अशीच पूजा करोत. कष्ट पडोत, आपत्ती येवोत, मरण समोर असो, तरी ध्येयाला कसे कवटाळावे ते त्यांनी दाखविले आहे. ते शास्त्रज्ञ आहेत. ते महात्मा आहेत. अशी माणसे म्हणजे पृथ्वीचे वैभव!
एक लाख रुपयांच्या बक्षिसाबरोबर दुसरेही एक बक्षीस मी हयांना देत आहे. ही मुलगी हयांना मी देत आहे. तुम्हा सर्वासमक्ष हयांचे लग्न मी लावतो. तुमचे आशीर्वाद हयांना द्या.
राजाने कळीचे हात फुलाच्या हातात दिले. दोघांनी राजाला वंदन केले. दोघांनी त्या विराट् जनतेला प्रणाम केला. सर्वांनी जयजयकार केला. टाळयांचा गजर झाला. वाद्ये वाजू लागली. बँड सुरू झाला. बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. फुलांची वृष्टी झाली. आनंदीआनंद झाला. समारंभ संपला. कळी व फुला राजाबरोबर गेली. राजाने त्यांना मेजवानी दिली. सारे शास्त्रज्ञ हजर होते. राजाने वधूवरांस मूल्यवान वस्त्रे व अलंकार हयांची भेट दिली. शास्त्रज्ञांचा निरोप घेऊन, राजाचा निरोप घेऊन कळी व फुला निघून गेली. त्या दोघांचा आनंद अवर्णनीय होता. त्या आनंदाचे कोण वर्णन करील?