‘दूर उभ्या राहा.’ सैतानाने आज्ञा केली.

‘आम्ही तुम्हाला आलिंगन देत होतो. तुम्हाला भेटत होतो. असे घाबरलेत काय?’ त्या डाकिणी विकट हसून म्हणाल्या.
‘हे पाहा. हे पाहुणे दमले आहेत. त्यांना एक पेलाभर ते पेय घेऊन या. जा.’ सैतान म्हणाला.

मधव सर्वत्र पाहात होता. कोणी भुते हिरकुटासारखी बारीक, परंतु उंचच उंच होती. पेटलेल्या उदबत्तीसारखी ती दिसत. डोळे लाल लाल. कोणी पिशाच्चे विष्ठा खात होती. तर कोणी चिखलात लोळत होती. कोणी नाचत होती, तर कोणी घोरत होती. माधवला वीट आला हे पाहून.

इतक्यात एक डाकीण पेयाचा पेला घेऊन आली. तो पेला मात्र सुंदर दिसत होता. जणू सूर्यकिरणांचा तो बनलेला होता. त्या स्वच्छ शुभ्र पेल्यात ते पेय फारच खुलत होते. ते पेय उसळत होते. सुवास सुटला होता.

‘घे हा पेला. पी. आणखी लागले तरी आणू.’ सैतान म्हणाला.

‘पिऊ? धोका तर नाही ना?’ माधवाने विचारले

‘मी तुझा सेवक आहे. मी कसा फसवीन? नि:शंकपणे पेला रिकामा कर.

मधुर सुंदर सर. देवांनाही हा दुष्प्राप्य आहे.’

माधवाने पेला हाती घेतला. भुते नाचू लागली. गाऊ लागली. भुतेरी वाद्ये वाजू लागली. पाहुण्यांचे स्वागत होत होते. माधव साशंक होता.

‘पी भल्या माणसा, पी. भित्रेपणा तुला शोभत नाही.?

‘मी भित्रा नाही. हा बघ पितो?

माधवाने पेला रिकामा केला. भुते निघून गेली. माधवाची चर्या आनंदी झाली. तो रंगेल दिसू लागला. जणू नाचरे फुलपाखरू.

‘सैताना, चल लौकर, कोठे तरी गंमतीच्या ठिकाणी ने.’ माधव म्हणाला.

‘मग डोळे मीट. मीट डोळे.’ सैतान हसून म्हणाला.

त्याने डोळे मिटले. कोठे तरी ते जात होते. ‘उघड डोळे.’ सैतान म्हणाला.

माधवाने डोळे उघडले. ते मर्त्यलोकींच्या एका शहरात उतरले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel