‘आई आई, हा बघ मोत्यांचा हार. माझ्या खोलीत होता. कोणी टाकला, कोठून आला? मी घेऊ का तो? हा बघ मी गळयात घातला आहे. छान दिसतो, नाही? माझ्या गळयात ना दूड ना एकदाणी. ओका & ओका दिसे गळा, नाही? आता कसा दिसतो बघ, बघ ना आई. तू हातात घेऊन बघ पुष्कळ असेल किंमत, नाही?’ मुलगी आनंदाने सांगत होती.
आईने तो कंठा हातात घेतला. नीट पाहून ती म्हणाली,’ आपल्याला नको ग बाई हा कंठा. गरिबांना असले दागिने काय कामाचे? कोणी चोरीचा आळही घ्यायचे. आपण हा हार रामाच्या देवळात नेऊन देऊ. रामाला होईल. देवाच्या गळयात शोभेल.’
‘देवाच्या गळयात तरी तो राहील का? रामाचे दागिने वेश्यांच्या अंगावर गेले, तसा हा हारही जाईल. रामाचा मालक नावाचा रामाचा मालक. जे रामाला दिले जाते, रामापुढे ठेवले जाते, ते त्याच्या प्रियकरणीकडे जाते. त्यापेक्षा माझ्या गळयात असला म्हणून काय बिघडले?’
‘तुला कळत नाही. आपण चोरीची वस्तू कशी वापरायची? जी वस्तू आपली नाही ती वापरणे म्हणजे चोरी. आपण रामाला नेऊन देऊ. तो पुजारी मालक काहीही करो. त्याचे पाप त्याला.’
‘परंतु त्याच्या पापाला आपण उत्तेजन देतो. आपणाला माहीत असून त्याच्या हातात संपत्ती देणे म्हणजे आपणही पापी.’
‘तू फारच बोलायला शिकलीस. तुझी आई साधी-भोळी आहे. आपण श्रध्देने करावे. आपल्यापुरते पाहावे. जा, ती धुणी धूवून आण. तुला काम नको. नटायला मात्र हवे. राणीच्या पोटी का आली नाहीस? माझ्यासारखीच्या पोटी आलीस. आता कर काम. रडायला काय झाले?’
ती मुलगी आपल्या खोलीत आली. ती रडत बसली. इतक्यात सैतान व माधव तिच्या खिडकीपाशी आले. सैतानानो आणखी एक हार माधवाच्या हाती दिला. त्याने तो खिडकीतून आत फेकला. त्या मुलीने तो हार पाहिला. तिने तो हातात घेतला. तिने गळयात घातला. पुन्हा तिने आरशात पाहिले.
‘किती छान दिसतो मला! कोणाजवळ आहेत असे हार? हा हार आता आईला नाही दाखवणार. लपवून ठेवीन. किती सुंदर हार! कोणाजवळ आहेत असे हार, कोणाजवळ आहे इतकी संपत्ती? कोण फेकते हे हार हया खिडकीतून?’ ती मुलगी स्वत:शी बोलत होती.
‘माझ्याजवळ आहेत असे हार. मी फेकले ते. तुझ्यासाठी मी प्राणही फेकीन. मग हारांचे काय? तू माझ्यावर रागावून गेलीस; परंतु पुन्हा मागे वळू पाहिले होतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझी हो. तुला सोन्यामोत्यांनी मढवीन. तुला सुखी करीन. खरेच -’ माधव भावनावंश होऊन बोलत होता.