विकतच दुखणं घेणारे लोक आपल्या देशात २०-२२ कोटी आहेत, अन त्या दुखण्यावर ते वर्षाला तब्बल ३० हजार कोटी रुपये खर्च करतात, तरीही त्यातले आठ लाख लोक दर वर्षी मृत्यूला कवटाळून कमीत कमी ५० लाख लोकांना दुःखाच्या महासागरात लोटतात. धन्य ते लोक ज्यांना ईश्वराने दिलेल्या सोन्यासारख्या जीवाचं महत्वच कळत नाही.
"ओपन किलर " अजमल कसाबला फाशी देण्यासाठी एकमुखाने आवाज बुलंद करणारे आपण ताशी ९१ बळी घेणाऱ्या " सायलेंट किलर " गुटखा उत्पादकाबद्दल साधी चीडही का व्यक्त करत नाही ? इंडिअन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या कर्क रोग आणि इतर संबंधित आजारांमुळे दरवर्षी सुमारे आठ लाख किंवा दिवसाकाठी २१९० म्हणजेच तासाला ९१ मृत्यू ओढवतात. .भारतातील काही ज्येष्ठ कर्करोग तज्ञांच्या मते आज आपल्या देशात १५ ते १६ कोटी पुरुष आणि ७ ते ८ कोटी महिला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात आणि त्यामुळे उदभवणार्या रोगांच्या उपचारावर होणारा वार्षिक खर्च ३० हजार कोटी रुपये आहे.
गुटख्याने तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वाना व्यापले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकारच्या गुटख्यावर आणि पान मसाल्यावर बंदी घातली आहे, ज्यामुळे गुटख्याचे उत्पादन, सेवन आणि साठा या तिन्ही गोष्टीसाठी सहा महिने ते ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. बघूया त्यामुळे तरी काही फरक पडतो का. खरं तर गुटखा असो कि सिगारेट, ज्या वस्तूंच्या उत्पादनामुळे आणि सेवनामुळे समाजाच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे, त्यांची निर्मिती करणारे कारखानेच जमीन दोस्त करायला हवेत. तो सुवर्ण दिन लवकर येवो, हीच अपेक्षा.
सौजन्य - सकाळ.