जैवदहशतवाद हे असेच एक युद्धतंत्र आहे ज्यात सूक्ष्म जिवाणू, विषाणूंच्या मदतीने एखाद्या देशात रोग पसरवले जातात व प्राणहानी घडवून आणली जाते. आपल्याकडे सुरतमध्ये प्लेगची साथ आली त्यावेळी काही सुरक्षातज्ज्ञांनी तो अतिरेकी हल्ल्यांचा कट असल्याचा संशय व्यक्त केला होता, पण तसे कुठलेही पुरावे नाहीत. त्यानंतर दिल्लीतील डेंग्यूची साथ हा तसाच प्रकार होता असे म्हटले जात होते पण त्याचेही समर्थन करता येईल असे पुरावे नाहीत. चिकनगुन्या, बर्डफ्लू या रोगांच्या साथींबाबतही हा युद्धतंत्राचा भाग असल्याचे म्हटले जाते, पण विषाणू किंवा जिवाणू यांच्यावर कुठल्या देशाचा शिक्का असत नाही त्यामुळे त्यामागे कुणाची बदमाषी आहे हे समजणे अवघड असते.

भारतातही २००१ व त्यानंतरच्या काही काळात अँथ्रॅक्स हा रोग पसरवणारे जिवाणू पाकिटातून पावडरच्या माध्यमातून पाठवल्याची उदाहरणे मात्र वादातीत आहेत. बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूच्या कुप्यांमुळे हा रोग होतो. त्यात त्वचेवर चट्टे पडून आग होते व ते घातक ठरते. जैविक दहशतवादात इबोला हा विषाणू वापरला जातो त्यामुळे आठवडाभरात व्यक्तीचा मृत्यू होतो.

बोटय़ुलिनम विष हे एका जिवाणूपासून बनते. ते एक अब्जांश ग्रॅम एवढे घेतले तरी पक्षाघाताचा झटका येऊन माणूस लुळापांगळा होतो. टय़ुलरेमिया हा जिवाणू घातक असतो. न्यूमॉनिक प्लेगचा जिवाणूही हल्ल्यात वापरता येतो. जपानने काही माशा सोडून चीनमध्ये रोग पसरवले होते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया यांनीही हवेत जिवाणू सोडून रोगप्रसार घडवून आणला होता.

देवी हा रोग आता नष्ट झाला असला, तरी त्याचे नवीन विषाणू तयार करून शत्रूला गारद करण्याचे अतिरेक्यांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. यात ४० टक्के लोक आठवडाभरात मरतात शिवाय हा संसर्गजन्य रोग आहे. जिवाणू किंवा विषाणू शरीरात गेल्यानंतर त्यांची संख्या आपोआप वाढत जाते त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्राणहानी करता येते. फ्लूचे विषाणू पसरवणेही अवघड नाही.

अमेरिका, रशिया, चीन, उत्तर कोरिया, ईजिप्त, इराण, सीरिया, इस्रायल असे अनेक देश जैवयुद्धतंत्रात आघाडीवर आहेत. २००१ मध्ये अमेरिकेत अँथ्रॅक्सचे स्पोअर्स असलेली पाकिटे टपालाने पाठवली गेली. त्यामुळे पाच जण मरण पावले तर इतर अनेकांना संसर्ग झाला होता.

जपानमधील ओमशिनरी क्यू पंथीयांनी बोटय़ुलिनम विष व अँथ्रॅक्स यांचा वापर जैवदहशतीसाठी करण्याचे अनेक प्रयत्न केले. १९८४ मध्ये डल्लास, ओरेगॉन येथे अशाच एका पंथाच्या लोकांनी दहा हॉटेलमध्ये साल्मोनेला जीवाणू पसरवले होते त्यामुळे साडेसातशे लोकांना संसर्ग झाला होता.

जैविक दहशतवादी हल्ला झाला तर काय करावे याचाही विचार करणे आवश्यक आहे. एक तर यासाठी काही मूलभूत बाबींचे प्रशिक्षण हवे. पुरेसे अन्न, पाणी व औषधे हाताशी असणे गरजेचे असते. डॉक्टर्स व रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांक जवळ असावेत. डॉक्टर्सच्या सल्ल्यानेच अँटीबायोटिक्स घ्यावीत. वेळप्रसंगी मास्क वापरावे लागतात, पण त्यात आपण गुदमरणार नाही याची काळजी घ्यावी लागते. रासायनिक हल्ला झाला तर उंचावरच्या ठिकाणी जा. कारण रासायनिक पदार्थ हे दाट असल्याने हवेत ते खालच्या बाजूला राहतात. हवेत विषारी वायूचा वास आला किंवा तसा कधी संशय आला तरी तेथून खूप दूर जावे कालांतराने कुठलाही वायू हा विरळ होत जातो याला व्हीएक्स हा अपवाद आहे. घातक रसायनांचा संशय घेताना एकतर ती द्रव असू शकतात. त्यांना वास व चव नसते. अशुद्ध रूपात ते पिवळे द्रव असतात. काहींना मात्र फळांसारखा गोड वास असतो. त्यांच्यामुळे त्वचेची जळजळ सुरू होते.

नेहमी रेडिओसारख्या साधनांवरून अशा हल्ल्यांची माहिती दिली जाऊ शकते, सरकारी पातळीवर दिल्या जाणाऱ्या माहितीकडेही लक्ष असले पाहिजे. एक प्रकारे यात कॉमन सेन्स वापरावा लागतो. त्यामुळे जागरूकता व माहितीने परिपूर्ण असणे ही यापुढे काळाची गरज असणार आहे. नागरिकांनी डोळे उघडे ठेवून नीट बघितले नाही तर त्याचा फायदा मानवतेचे शत्रू घेत राहणार यात शंका नाही.

संग्रहित लेखं- प्रबोधन टीम.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel