आपल्या सर्व व्यवहारांत एक प्रकारची नैतिक तळमळ हवी. स्वराज्य लोकशाही म्हणजे थट्टा नाही, ही एक गंभीर वस्तू आहे. आपल्याला जनतेचे कल्याण करावयाचे आहे. एखाद्या जातीचे, पंथाचे स्तोम नाही माजवावयाचे. सार्वजनिक नीती म्हणून वस्तू आहे. इंग्लंडमध्ये प्रधानालाही त्याने सार्वजनिक वाहतुकीचा नियम मोडला म्हणून दंड करण्यात आला. परंतु आपल्याकडे काय प्रकार आहे? स्वराज्यात आपणच कायद्याची प्रतिष्ठा मानली पाहिजे. हातून बेकायदा काही झाले तर दिलगीरी दाखवावी. शिक्षा-दंड झाला तर भोगावा. अन्याय्य कायदे असतील तर त्यांच्या विरुध्द आपण जनमत तयार करू शकतो. परंतु जे कायदे जनतेचे जीवन नीट चालावे म्हणूनच केलेले असतील ते मोडणे पाप आहे. ते मोडून त्यात प्रतिष्ठा मानणे म्हणजे तर महान पाप आहे. तो माझ्या पक्षाचा, तो माझ्या जातीचा, तो माझ्या धर्माचा, तो माझ्या प्रान्ताचा, तो माझ आप्त, तो माझा सखा, असले संबंध न्यायालयासमोर थोर वर्तनाने हे जनतेला शिकवावयाचे आहे. आपण अजून सर्व राष्ट्राची सर्व समाजाची, अशी द्दष्टी  घेऊ शकत नाही. परंतु जोवर ही येत नाही तोवर लोकशाही म्हणजे एक थट्टा होईल. आलेले स्वातंत्र्य, मिळालेले स्वराज्य जर टिकवावयाचे असेल, कार्य जर करावयाचे असेल तर संकुचितपणा, क्षुद्रता, स्वार्थ इत्यादी गोष्टी आपण दूर करावयास शिकले पाहिजे. काही तरी सार्वजनिक भान आपणास आले पाहिजे. स्वराज्याच्या महान साधनाने आपणास मानव फुलवावयाचे आहेत. संस्कृती समृध्द करावयाची आहे. त्यासाठी अखंड साधना हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व व्यवहारात आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ असे म्हणतात. याचा अर्थ उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने ''पुन्हा धर्माकडे'' म्हणून एक सुन्दर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने Betterism असा शब्द योजिला आहे. ''बेटरिझम'' म्हणजे माणसाने चांगला होईन, अधिक चांगला होईन-, हा ध्यास घेणे होय. चांगले कसे होता येईल? जीवन अधिक समृध्द, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल? 'मी आणि माझे' हे तुणतुणे दूर करून, दुसर्‍याच्या सुखदुःखाचा जेव्हा आपण विचार करू, सेवा करू, दुसर्‍याचे चांगले करू, सर्वांचे स्वागत करू, अधिक लोकांशी मिसळायला लागू, तेव्हा अधिक चांगले होण्याचा मार्ग लाभेल. भारतीय जनतेला हे शिकावयाचे आहे. येथे अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जातिप्रजाती, अनेक धर्म यांचा संगम आहे. अशा देशांत जर खरी संस्कृती वाढवावयाची असेल तर मिळते - जुळते घेऊनच वागावे लागेल. वैराचा अभाव आणि विषमता नसणे ही रामराज्याची दोन लक्षणे होत. हीच व्याख्या गांधीजींनी केली होती. पण त्यांनी पाहिले की स्वराज्याचे दर्शन झाले नाही. तोच, वैराचे शमन होणे दूरच राहिले, वैराची अशी काही आग पसरली आहे की तिची क्वचितच तुलना असेल, हे पाहून स्वाभाविकच गांधीजी दुःखी राहात. ज्या वस्तूंचे पालन गांधीजींच्या जिवंतपणी आपण केले नाही ते आता केले पाहिजे. स्वराज्याची ही दोन लक्षणे आपण पूर्णपणे सिध्द केली पाहिजेत. हिंदुस्थानात इतके विविध समाज राहात आहेत मित्रभावचा पाठ शिकण्यासाठी होत असे आपण समजावे. आपल्या उदार संस्कृतीचा हा बोध जर आपण घेतला तर वैरभावही नाहीसा होईल आणि विषमताही समाप्त होईल. वैरभाव व विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे.

महात्माजींचा प्रथम श्राध्ददिन भारतातच नव्हे तर जगात पाळला गेला. ते भारताच्या द्वारा जगाचीच सेवा करीत होते. कारण येथे सर्व धर्म, सर्व संस्कृती. भारत म्हणजे मानवजातीचे प्रतिक. गांधीजी जगाचे हृदय झाले होते. त्यांच्यावरच्या आघाताने सारे जग क्षणभर निर्जीव झाले होते. सार्‍या  जगाने त्यांना श्रध्दांजली वहावी हे समुचितच होय.

श्राध्द अति पवित्र व मंगल वस्तू आहे. कृतज्ञतेची ती मधुर खूण आहे. ज्यांचे आपण श्राध्द करतो त्याला आपण श्रध्दापूर्वक स्मरतो. श्रध्दा चमत्कार जननी आहे. यजुर्वेदात म्हटले आहे की, अ-देवाला श्रध्द देवत्व देते. जो अ-देव आहे, ज्याच्या जीवनात दिव्यता नाही, अशा माणसाला जर अमर श्रध्दा मिळाली तर, त्याचे जीवन ज्वलंत होते, ते दैवी होते. श्रध्दा ध्येयाकडे घेऊन जाते. ध्येयाचा ध्यास लावते. सारे जीवन धगधगीत, रसरशीत होते. मग अन्य काही सुचत नाही, रुचत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel