सार्‍या जातीपाती समान माना म्हणून म्हटले तरी जिच्या नेसू चिंधी अशी कातकरीण-, स्वच्छ इरकली पातळ नेसलेल्या, वेणीफणी केलेल्या भगिनीजवळ कशी बसणार? तिला बसू कोण देणार? बिहारमध्ये चंपारण्यात गांधीजी गेले. कस्तुरबांना म्हणाले, ''भगिनींना स्वच्छता शिकव.'' एक भगिनी कस्तुरबांना म्हणाली, ''आंग धुतले तर नेसू काय?'' सामाजिक विषमता नष्ट करायलाहि आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे, कोणत्याही धर्माचा असो,-तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे, धर्मामुळे भेदभाव न करणे, या गोष्टी हव्यात. परंतु सोलापूर म्युनिसिपालिटीने बस सर्व्हिस ताब्यात घेऊन मुसलमान कामगार काढले. एका मुस्लिम आझाद सैनिकाने, जो त्यात नोकर होता त्याने जाहीर पत्रकाने प्रसिध्द केले. म्युनिसिपालिटीत कोणाचे बहुमत आहे? ती गोष्ट खरी असेल तर किती वाईट!

स्वराज्यातील चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहिंसक रीतीने सरकारला विरोध दाखविण्याची मोकळीक असणें. गांधीजी म्हणत ''I am the greatest democrat'' - मी सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. परंतु आज काय आहे? बिहारमध्ये समाजवादी पक्षाच्या अधिवेशनाला मंडपही घालण्याची परवानगी मिळणे कठीण होत आले. विदर्भात समाजवादी अधिवेशनास परवानगी नाकारण्यात आली. सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर येता-जाता समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक ना करते. त्यांच्या मार्गात अडचणी ना आणते परंतु ''बिजली नाचेल गगनात'' हे सुन्दर नृत्यगीत पाहून आमच्या एका अहिंसक सहिष्णु मंत्र्यांनी कपाळाला आठया घातल्या. सेवादलाचे गाणे कशाला असे म्हणाले. पू. विनाबाजींनी धुळयाला सेवादलाच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शविला व खेडयापाडयांतून जा असे सांगितले. परंतु सेवादलाचे गाणे कानी पडताच या लोकशाही मंत्र्यांना अब्रह्मण्यम् वाटले! एवढी असहिष्णुता सत्यअहिंसेशी, सर्वोदयाच्या ध्येयाशी सुसंगत आहे वाटते? सेवादलाला लेझिमचीही बंदी; येथवर यांची अहिंसा गेली आहे. सेवादलात काहीही आकर्षक असता कामा नये. म्हणजे मुल तिकडे जाणार नाहीत, ही दुष्ट भावना मुळाशी. बाबारे, केवळ कायद्याने जनतेचे हृदये का मिळत असतात? दुसर्‍या  पक्षाला विधायक सेवाहि करू द्यायची नाही, कारण त्याच्या कानावर सेवेचे भांडवल जमा व्हायचे! बेळगावचे समाजवादी तरुण कार्यकर्ते म्हणाले, ''आमच्या साक्षरता वर्गांना मंजुरी मिळत नाही; मग मदत कोठून मिळणार?'' उदाहरणे कोठवर सांगू? समाजवादी म्हणजे सरकारच्या द्दष्टीने, काँग्रेसच्या द्दष्टीने राष्ट्रद्रोही लोक, धन्य त्या काँग्रेसची.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel