'आवश्यक काम' बंद पाडले या आरोपाखाली सरकारने त्यांना अटक करता कामा नये. सरकारने अर्ज मागवावेत, किंवा म्युनिसिपालटीची गाडी फिरवून ज्याने ज्याने आपल्या घरातील मळपात्र पीप आणून ओतावे असे करावे. मूलग्राही पध्दतीनेच हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे.
परंतु हे सारे होईल तेव्हा होईल. तोवर काय? तोवर काय या समाजसेवकांना दूर राखणार? मी कोल्हापूरला भंगीबंधूंत गेलो आहे. त्यांची कलापथके आहेत. किती सुन्दर भजने ते करतात. पेटी, तबला वाजविणारे, स्वतः कविता करणारे, गाणारे भेटले. त्यांच्यातील चित्रकार भेटले. घरी स्वच्छता, अन्यत्रही. त्यांची आंगणे सावरलेली. भिंतीवर चित्रे पाहिली. ओंगळ काम करतात तरी स्वच्छ राहतात. त्यांना दूर नका ठेवू. येऊ दे त्यांना मंदिरात, येऊ दे विहिरीवर. त्यांना माणुसकी आहे. ते तुमच्याकडे येताना स्वच्छ होऊनच येतील. त्यांना समजते. जंजिर्याचा माझा मित्र राजा भंगी आंघोळ करून गंध लावून देवदर्शनास जातो. तुमच्या आमच्यापेक्षा अधिक भक्तीने नि स्वच्छतेने जातील. देवाजवळ सर्वांना वाव, सर्वांना ठाव, हिंदु धर्मीयांनो, कोटयवधि बंधू माणूसघाणेपणाने तुम्ही दवडलेत. मुसलमान झाले, ख्रिश्चन झाले, त्यातूनच पाकिस्ताने जन्मली. तरी अजून हे पाप पुरे नाही झाले? हिंदु बंधुभंगिनींनो, हिंदु धर्मांतील दिव्य मानवता प्रकट करा.
कोणी म्हणत असतात, ''हिंदु धर्म जगभर नेला पाहिजे तरच शांती येईल.'' तो काही तलवारीने किंवा मारामारीने न्यायचा नाही, हिंदुधर्मातील उदारता नि उदात्तता जगाला पटवून देऊन. परंतु आम्ही हिंदुधर्माचे भव्य फळ जे गांधी त्यांचा खून करून आनंद मानतो. कोटयवधी बंधूना दूर ठेवतो. ही का हिंदुधर्माची थोरवी? परकीयांचे जू तुम्ही फेकाल तेव्हां फेकाल. आधी तुम्हीच स्वकीयांच्यावर लादलेले अन्याय नष्ट करून स्वराज्याची पात्रता सिध्द करा. सार्या भारतातूनच ही अस्पृश्यता, सर्व पापजननी नष्ट होऊ दे. त्याच्यासाठी नकोत शास्त्रार्थ, नको युक्तिवाद! साध्या मानवतेचा सवाल आहे.
भारतातील मुलामुलींनी आता नवसंकल्प करावयाला हवेत. कागदावर घटना लिहून काय उपयोग? घटना हृदयात हवी. अस्पृश्यता निवारणाचा कायदा आहे. नुसते कायदे करून काम संपत नाही. माणसे सुधारायची आहेत. मानवतेच्या कायद्याचें आपण उपासक झाले पाहिजे.