उत्तर : कम्युनिस्टांविषयी मला काही म्हणावयाचे नाही, परंतु हिंदी समाजवादी भारतीय संस्कृतीवर, गांधीजीच्या विचारांवर पोसलेले आहेत. महाराष्ट्रातील आचार्य जावडेकर केवळ मार्क्सवर पोसलेले आहेत असे श्री. शंकरराव देव म्हणू शकतील काय? आचार्य भागवतही समाजवादी तरफदारी करतात. त्यांची स्फूर्तीही मार्क्सपासून का? काशी विद्यापीठ चालवणारे आचार्य नरेन्द्र देव हे का भारतीय संस्कृती जाणत नाहीत? काँग्रेसमधील काही पुढार्‍यांनी ही फॅशन पाडली आहे की, समाजवादी पश्चिमेकडे पाहणारे, मार्क्सचे अनुयायी. समाजवादी मार्क्स आणि महात्माजी यांचा समन्वय करतात. स्वतः महात्माजी म्हणाले होते की, 'All communism is not bad' तेही चांगले असेल ते घ्यायला तयार होते. श्री महादेवभाईंनी एकदा लिहिले की, ''तुम्ही निवडणुकीत समाजवादी कार्यक्रम जनतेसमोर ठेवून निवडून आलात आणि मग तदनुरूप कायदे करू लागलात तर त्यात वाईट काय? पश्चिमेकडे  काही चांगले नाही की काय? रस्किन, स्टॉलस्टॉय, थोरो यांच्यापासून स्फूर्ती घेऊन गांधींजी नाही का उभे राहिले? त्यांनी का पश्चिमेवर बहिष्कार घातला होता.'' आपल्या प्रार्थनेत गीता, कुराण, बायबलादी सर्वांचा समावेश करणारा महात्मा जगातील इतरही मंगलदायी विचार घ्यायला तयार असे. श्री. लक्ष्मणशास्त्री मागे एकदा म्हणाले होते की, 'मार्क्स हा महान मानवतावादी होता.' आचार्य नरेंद्र देव परवा तेच म्हणाले. सारे जग जवळ येत आहे. अशा वेळेस अनेक विचारांचा समन्वय लागतो. आपण लोकशाही समाजवाद आणू इच्छितो. या शब्दात समन्वय आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य ठेवून समाजवाद आणणे. हुकूमशाही नको. ती नको असेल तर निर्मळ साधनांनी समाजवाद आणावयाला हवा. समाजवादी केवळ मार्क्सचे ठोकळेबाज अनुयायी नाहीत. त्यांनी गांधीपासून स्फूर्ती घेतली आहे. मार्क्सपासून घेतली आहे. पंडित जवाहरलालना मार्क्सपासून नाही का थोडीफार स्फूर्ती मिळाली? काही काँग्रेसचे लोक समाजवाद्यांना ‘दोन बापांचे’असे तुच्छतेने म्हणत असतात. मार्क्स व महात्माजी  दोघांनाही ते आपला तात मानतात, यांत चूक काय झाली? ही वस्तू उपहासाची नसून गौरवाची आहे. खरे म्हणजे आपला मानसिक नि बौध्दिक पिंड हजारो वर्षाच्या विचाराने बनलेला असतो. आपली बौध्दिक पितरे दोन नाहीत तर अनंत असतात. जवाहरलाल 'भारताचा शोध' या पुस्तकात म्हणतात, ''जीवन सोपे, सुटसुटीत नाही, ते अति गुंतागुंतीचे असते. दहा हजार वर्षाचा मानवाचा इतिहास आपणात असतो. सुप्तरूप असतो.'' जगात जेथे जेथे भव्य दिसेल ते घ्यावे. मग माझे शत बाप झाले तरी हरकत नाही. समाजवाद्यांना हिणवणार्‍यांची क्षुद्र वृत्ती व मनोहीनता मात्र दिसून येते. एक गांधीवादी तुरुंगात म्हणाले, ''समाजवादाला शिंग असते की शेपूट असते आम्हांला माहीत नाही.'' दुसर्‍यांच्या विचारांविषयी संपूर्णपणे बेफिकीर अज्ञान दाखवणे म्हणजे का गांधीवाद? गांधीवाद विशाल वस्तू आहे. दुनियेतील सारे माग्डल्य घेणारी ती वस्तू आहे. खिडक्या दारे बंद करणारी ती वस्तू नाही. (२६ मार्च, १९४९)

प्रश्न : तुमचे कम्युनिस्टाशी व कम्युनिस्टांशी संबंध ठेवणार्‍या  पक्षांशी पटत नाही. सर्वोदयवादी पक्षाशी तुमचे का पटत नाही.?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel