मराठी माणसाच्या हक्कासाठी झगडणारे गुरुजी, सार्‍या  भारताच्या साहित्य, कला व जीवनाशी एकरूप होण्यासाठी तळमळत होते. एकात्म भारताची स्वप्ने त्यांना पडत होती. संकुचितता गुरुजींना मानवत नव्हती. चळवळींचा संस्कृतीशी जोडलेला संबंध. त्याचा हा परिचय.....

भाषावार प्रांतरचनेचे काँग्रेसचे ध्येय होते. स्वराज्य आल्यावर इंग्रजांनी केलेले कृत्रिम प्रांत मोडून भाषावार सुसंघटित प्रांत बनविणे कर्तव्यच होते. भारताची दृष्टी ठेवून असे प्रांत करणे यात हानीही नव्हती. ते ते प्रांत हालचाल करू लागले. कर्नाटकाने चळवळ सुरू केली. महाराष्ट्रही धीरगंभीर उभा राहिला. देशभर चर्चा सुरू झाली. देश स्वतंत्र झाल्यावर जातिद्वेष, धर्मद्वेष बळावले. अनेक संकटे. अशा वेळेस प्रांतांचे प्रश्न उभे करू नका? अशीही भाषा कानी येऊ लागली. फुटीर वृत्ती वाढेल अशीही शंका प्रदर्शित केली जाई. पुढे काँग्रेसने एक समिती नेमली. पंडित नेहरू, सरदार आणि पट्टाभि हे त्या समितीचे सदस्य. त्यांनी आपला अहवाल जाहीर केला. आजच इतर प्रांतांविषयी मी लिहीत नाही. महाराष्ट्राविषयीची वेदना मांडतो.

आंध्रचा आता प्रांत होणार. म्हैसूर विलीन व्हायला सिध्द झाले तर कर्नाटकाचा प्रांत उभा राहील. परंतु महाराष्ट्राची कुचंबणा आहे. आज दिल्लीला महराष्ट्राचे जणू वावडे आहे. महाराष्ट्राने अघोर पाप केले आहे. परंतु पापाची शिक्षा सर्व महाराष्ट्राला नको. पापाची क्षमा करा. महाराष्ट्राचे धिंडवडे थोरामोठयाने काढू नयेत. महाराष्ट्राचे चांगले आठवा. स्वातंत्र्यासाठी मागे तो तीनशे वर्षापूर्वी लढला. ५७ साली लढला. सारखा लढतच आहे. महाराष्ट्राने अपार त्याग ओतला आहे. थोर माणसे दिली आहेत. विधायक कार्यातही महाराष्ट्र मागे नाही. स्वच्छतेची दीक्षा सेनापतींनी दिली आहेत. अस्पृश्यता-निवारणाचे काम येथे कधीपासून होत आहे. राष्ट्रभाषेला हजारो विद्यार्थी बसतात. आज अप्पासाहेब, अण्णासाहेब, आचार्य भिसे इत्यादी थोर माणसे सेवेत रमली आहेत आणि महात्माजींच्या वधानंतर दुःख गिळून आश्रम सोडून पू. विनोबाजी सर्वत्र एकतेचा संदेश देत भारतभर सेवामय परिभ्रमण करीत आहेत. महाराष्ट्राचे पाप विसरा. थोरांनी अपराध क्षमावे. महात्माजींच्या पायाजवळ सत्य अहिंसेचे धडे ना घेतलेत? अपकारांची फेड उपकाराने करावी असे ना शिकलात? मग महाराष्ट्राला शासन का करता? महाराष्ट्राला प्रेम द्या. विश्वास द्या. महाराष्ट्राचे प्राण गुदमरवू नका.

महाराष्ट्राच्या एकीकरणाच्या आड मुंबईचा प्रश्न येतो. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. सर्व प्रकारचे लोक येथे आले. व्यापार वाढला. म्हणून का मुंबई दुसर्‍याची झाली? कुलाबा, ठाणे, जिल्हे सोडून मुंबईची गावदेवी पाच सहाशे वर्षांची जुनी. येथील दैवते, येथील वाडया, येथील भाऊचा धक्का सारे महाराष्ट्राचे. मुंबई महाराष्ट्रापासून अलग करणे पाप आहे. आमचा लचका का तोडता? तुमचा व्यापार का कमी होणार आहे? आज कमी होत नाही. उद्या का कमी होईल? संपत्ती श्रमातून निर्माण होते. महाराष्ट्रीयांनीच अपार श्रम केलेत. तुम्ही आमच्या घरी आलात आणि घरच बळकावून बसलात. महाराष्ट्राने कधीस कोणास नाही म्हटले नाही. गावोगाव गुजराथी, मारवाडी, दुकानदार, सावकार झाले तरी हेवा-दावा केला नाही. कांदा-भाकरी हे त्याचे राष्ट्रीय अन्न, परंतु म्हणून त्याला त्याच्या घरून हाकलणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel