सृष्टीच्या निर्मळ सान्निध्यात असावे. विशाल सौंदर्य पहावे, शहरातील सौंदर्य म्हणजे कापलेले व छाटलेले. शहरातील बागा बघा. झाडांना आकाशाला भेटण्याची परवानगी दिली नाही. त्या झाडांना नाना प्रकारचे आकार देतील, छाटतील, कापतील. परंतु घनदाट जंगलात जा. तेथील सौंदर्यात अनंतता असते, भव्यता असते. ते सौंदर्य स्तब्ध करते, गंभीर करते.

रात्री दहा वाजता आकाशात पाहिलेत तर डोक्यावर आश्विनी नक्षत्र सध्या दिसेल. नांगराच्या आकाराचे एकीकडे दोन तेजस्वी तारे व टोकाला एक तारा सुरेख दिसतो. आणि पहाटे उठून पहाल तर कृतिका, आर्द्रा मावळल्या असतील. मृगही त्याच बेतात दिसतील. पुनर्वसु नक्षत्राचे दोन तेजस्वी तारे दिसतील. आणि ते चित्रा नक्षत्र वर बघा, किती सुंदर. खरोखर चित्रासारखे. नक्षत्रे पाहण्यात खरोखर मौज असते. तुम्ही बोर्डीला पहाटे प्रार्थनेला जात असाल, चंद्रवरती असतो. भरती येऊन गेलेली असते. ओलसर वाळवंटावर चंद्राचा प्रकाश पडून सारे चांदीसारखे वाटत असे. जावे नी चांदी भरून आणावी, परंतु देवाघरचे हे चांदीसोने दुरुन बघावयाचे असते. अमेरिकेतील थोरो म्हणत असे, ''माझे सोने देवाच्या बँकेत असते. सकाळी नि सायंकाळी ती बँक उघडते.'' सायंकाळी पश्चिमेकडे आकाशात सोन्याची द्वारका शोभत असते.

रात्री आकाशात बघा. गुरू-शुक्राची जोडी मध्यंतरी किती छान दिसते. अजूनही दिसते. प्रथम गुरू वर होता. शुक्र खाली होता. मग शुक्र वर चढला, गुरू त्याच्या चरणांशी बसला. शुक्र म्हणजे प्रेमाच्या तारा. पाश्चात्य वाङमयात शुक्राचा तारा म्हणजे प्रेमाचा मानतारा. गुरू म्हणजे ज्ञानाचा तारा. प्रथम गुरू म्हणजे ज्ञानाचा तारा वर चमकत होता, परंतु ज्ञानाने शेवटी प्रेमाला प्रणाम केला. माझ्याहून तू थोर आहेस असे प्रांजलपणे कबूल करून गुरू शुक्राच्या पायाशी बसला. प्रेमामध्ये हृदय आणि बुध्दी दोहोंचे गुण आहेत. प्रेम समजूनही घेते. प्रेमाची किल्ली हातात घेऊन जाऊ, तर दुसर्‍याची हृदयकपाटे खुली होतात. पायी झिरपण पृथ्वीच्या पोटात जाते. दगड तेथेच दाणकन पडतो. तुकाराम महाराज म्हणतात,

तुका म्हणे पाणी
पाताळपणे तळाखणी


आकाशात कालपासून ढगांनी भरलेले आहे. दोन चार दिवस चांगले ऊन पडले. परंतु ऊन खूप पडल्यावर पाऊस येतो म्हणतात. येऊ दे.

येरे येरे पावसा
तुला देईन पैसा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel