पूर्वजांनी काय खावे, काय प्यावे याचे शास्त्र बनविले होते. अमुक निषिध्द म्हणून खाऊ नये, अमुक चांगले आहे म्हणून खावे, असे त्यांनी नियम केले होते. त्यांचे नियम नवीन शास्त्रीय प्रकाशात तपासले पाहिजेत. नवीन संशोधन केले पाहिजे. निषिध्द का ? केवळ लाल रंग दिसतो म्हणून का ? मसुरीची डाळ रक्त शुध्द करणारी, बध्दकोष्ठ दूर करणारी आहे. मग का न खावी ? केवळ भावना की काय ? कांदा निषिध्द का ? चातुर्मास्यात कांदा-वांगे का खाऊ नये ? कांद्यात फॉस्फरस आहे. कांदा शक्तिवर्धक आहे. परंतु केवळ बौध्दिक श्रम करणा-यांस तो अपायकारक असेल. शेतात श्रमणा-या शेतक-यांस तो हितकर असेल. हे आहाराचे नियम सर्व शोधले पाहिजेत. शास्त्रीय आहार बनविला पाहिजे. त्याचा प्रसार केला पाहिजे. टोमॅटो, बटाटा, बीट वगैरे नवीन पदार्थ आले आहेत. त्यांचेही परीक्षण झाले पाहिजे. पुण्याला वीस-पंचवीस वर्षांपूर्वी लाल टोमॅटो निषिध्द मानीत. परंतु टोमॅटो प्रकृतीस फार चांगला असे आता कळू लागले आहे.

आले व लिंबू यांचे भारतीय आहारात फार माहात्म्य आहे. आले व लिंबू म्हणजे साठ चटण्या व साठ कोशिंबिरी ! आल्याचा तुकडा व लिंबाची फोड असली म्हणजे सर्व काही आले. आले-लिंबू हे आरोग्याला फार हितकर आहे. लिंबाच्या रसाने केसही पचेल अशी जुनी म्हण आहे.

आहारविहारावर तर आरोग्य अवलंबून आहे. विहार म्हणजे व्यायाम, खेळ; योग्य विहार व योग्य आहार यांची जर जोड असेल, तर शरीर सुंदर व सतेज राहील. उदंड सेवा करता येईल.

आजारी पडणे म्हणजे पाप आहे असे वाटले पाहिजे. बर्नार्ड शॉ तर एका ठिकाणी म्हणतो की, 'कोणी आजारी पडला तर त्याला मी तुरुंगात पाठवीन.' सृष्टिनियमाप्रमाणे वागला नसेल, व्यायाम घेतला नसेल; प्रमाण ठेवले नसेल, वेळेवर झोपला नसेल, वेळेवर जेवला नसेल, म्हणून आजारीपण आले. आजारीपण म्हणजे निसर्गाची शिक्षा आहे. आपण आजारी पडल्यामुळे आपली समाजसेवा तर अंतरतेच, परंतु आपल्या शुश्रूषेसाठी दुस-याचाही वेळ मोडतो. घरात चिंता पसरते. आरोग्य म्हणजे आनंद आहे. आजारीपण म्हणजे दु:ख आहे.

निरोगी शरीर सुंदर दिसते. रोगट-फिक्कट शरीर कितीही सजवले तरी ते विद्रुप दिसते. पीळदार शरीराला फाटका कपडाही शोभून दिसतो. आरोग्य म्हणजे सौंदर्य. तुम्हांला सौंदर्य पाहिजे असेल तर निरोगी रहा. व्यायाम करा. शरीरश्रम करा. शरीराला ऊन, पाऊस, वारा लागू दे. तो सृष्टीचा स्पर्श तजेला देईल.

सकाळ-सायंकाळ गावाबाहेर असलेल्या महादेवाला जावे, अशी परंपरा आहे. त्यात बाहेरची हवा लागावी, क्षणभर संसाराच्या बाहेर मन जावे, मोकळे वाटावे, हाच हेतू असे. पाय मोकळे होतात, मन मोकळे होते, विशाल आकाश दिसते. हिरवी झाडे दिसतात. वाहणारी नदी दिसते. मन रमते, प्रसन्न होते. देवाला, तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या, यात व्यायामाचाच हेतू होता. शरीरास आरोग्य व मनासही आरोग्य.

भारतीय संस्कृतीत व मुसलमानी संस्कृतीत धर्माशी आरोग्याशी सांगड घातली आहे. नमाज पढावयाच्या वेळेस मुसलमान भाई बसतो, उठतो, वाकतो. शरीराच्या निरनिराळ्या हालचालींत आरोग्याची तत्त्वे गोवलेली आहेत. दिवसातून पाच वेळा नमाज पढावयाचा. पाच वेळा शरीरास हा नियमित व्यायाम होतो. शरीरास आरोग्य व प्रार्थनेमुळे मनासही आरोग्य. नमस्कार, प्रदक्षिणा वगैरे गोष्टींत भारतीय संस्कृतीने असाच मेळ घातला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel