प्रमोद शर्माचा जन्म १९४४ साली भारतात झाला. २ वर्षांचा असताना त्याने आईला सांगितले की तिला त्याच्यासाठी जेवण बनवण्याची गरज नाही, त्याची पत्नी मोरादाबादला आहे आणि तीच त्याच्यासाठी जेवण बनवेल. मोरादाबाद त्याच्या बिसोली गावापासून १४५ किलोमीटर दूर होते. ३ - ४ वर्षांचा असताना प्रमोदने "मोहन ब्रदर्स" नावाच्या दुकानाचा उल्लेख केला जिथे तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत बिस्किटे आणि पाणी विकायचा. त्याने खेळताना छोटी दुकानं बनवली आणि आपल्या कुटुंबियांना पाणी आणि मातीची बिस्किटे दिली. तो एका समृद्ध व्यापारी परिवारातला होता, आणि आपल्या नवीन परिवाराच्या गरिबीमुळे त्रस्त झाला होता. त्याने आपल्या आई-वडिलांना दही खायला मनाई केली होती. तो स्वतःही दह्याला शिवत नसे. त्याने सांगितलं की मागील जन्मात तो दही खाल्ल्यामुळे फार आजारी पडला होता. त्याला अंघोळ आवडत नसे कारण तो सांगायचा की मागील जन्मी त्याचा मृत्यू बाथटब मध्ये झाला होता.
त्याच्या कुटुंबाने वचन दिलं की तो लिहा - वाचायला शिकल्यावर ते त्याला मोरादाबादला घेऊन जातील. नंतर माहिती मिळाली की तिथे "मेहरा" नावाचा परिवार होता जो "मोहन ब्रदर्स" नावाचं सोडा आणि बिस्किटांच दुकानं चालवायचा. १९४३ मध्ये व्यवस्थापक पर्मानानंद मेहरा यांचा दही खाण्यामुळे आणि पोटाच्या विकाराने मृत्यू झाला होता. पर्मानानंद इलाज म्हणून औषधी स्नान करायचे आणि मृत्युपूर्वी थोडा वेळ त्यांना अंघोळ घालण्यात आली होती.