एके ठिकाणी फणसाचे गरे खाल्ले. आंबे तर सारखे खात होतो. धारवाडचे पायरीचे आंबे फार मधुर. आणि एके ठिकाणी मला बाळयाकाकांची आठवण आली. मी दापोलीस शिकायला होतो. ३५ वर्षे त्या गोष्टीला झाली. मे महिन्याची सुट्टी संपून आम्ही पुन्हा शाळेला आलेले असू. जवळच्या जालगावी बाळयाकाका राहात. मी आतेकडे असे. बाळयाकाकांचा व आतेकडच्यांचा फार घरोबा. ते नेहमी यायचे. गोड हसणे व गोड बोलणे. अति साधे. तो एक सदरा, अंगावर उपरणे, डोक्याला लालसर जुना रुमाल. आम्हां मुलांना म्हणायचे, ''अरे, आंबे-फणसे खायला या.'' आणि आम्ही रविवारी जात असू. त्या बाजूला रस्त्याला जंगल, वाघ येईल की काय भीती वाटायची. रात्रीच्या वेळेत अंधार असला तर वाघाला भीती वाटावी म्हणून लोक पेटवलेली चूड हातात घेऊन म्हणे जायचे. परंतु आतेचे यजमान आम्हांला म्हणायचे, ''कधी कधी वाघ हातांतल्या चुडीवर झडप घालून ती विझवतो.'' अशा गोष्टी ऐकलेल्या. आम्ही झपाझप जायचे आणि बाळयाकाकांच्या अंगणात किंवा माजघरात आंबे- फणस ओ येसतो खायचे. ते दिवस मला आठवतात. बाळयाकाकांचे, त्यांच्या घरचे ते प्रेमळ, उदार वातावरण आठवते. दोन तीन महिन्यांपूर्वी बाळयाकाका जवळ जवळ ८० वर्षांचे होऊन देवाघरी गेले. सुधा, त्यांचे थोर जीवन होते! लहानपणी ते मुंबईस होते. हॉटेलातही त्यांनी काम केले होते. पुढे त्यांना ३ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. ते संस्कृत शिकले. ते शास्त्री झाले. दापोली तालुक्यात त्यांच्यासारखा शास्त्री नव्हता. ते शेती करायचे. आपल्या मुलांनी कधीही सरकारची नोकरी करू नये असे त्यांना वाटे. आणि खरेच, पित्याची इच्छा मुलांनी पाळली. त्यांनी आपली मुले सरकारी शाळेत घातली नाहीत. लो. टिळकांच्या स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चळवळी सुरू झालेल्या. बाळयाकाकांच्या संसारात या गोष्टी होत्या. त्यांनी परदेशी वस्तू शक्यतो टाळली. मुलांना स्वावलंबी शिक्षण दिले, राष्ट्रीय शाळेत शिकविले. अग, फैजपूरला खेडयात काँग्रेस भरली. त्या वेळेस ते मुद्दाम आले होते. मी तेथे स्वयंसेवक होतो. मला ते मुद्दाम भेटले. मी त्यांच्या पाया पडलो. माझ्या डोळयांत पाणी आले. त्यांनी मला कोकणातून पोहे आणले होते. पोह्यांची ती पुरचुंडी मी हृदयाशी धरली. माझ्या गरीब कोकणातील श्रीमंत हृदयाची ती अमृतमय भेट होती. ते अलीकडे थकले होते. आणि मरणही किती धन्यतेचे! अंथरुणावर पडून वेद म्हणत होते. एक गंमत झाली. म्हणाले, ''मी गायीचा भक्त, परंतु आपल्याकडे सध्या एकही गाय नाही. गोठयात पूर्वी किती असायच्या.'' तर काय आश्चर्य! त्यांनीच एका शेतक-याला एक गाय दिली होती. ती गाय अकस्मात आली. अंगणातून ओटीवर आली व ओटीवरून माजघरात येऊन बाळयाकाकांच्या अंथरुणावर उभी राहिली. त्यांच्या प्रेमाने गोमाता धावून आली. वत्सासाठी तिला पान्हा फुटला! असे हो बाळयाकाका! आणि मरताना म्हणाला, ''मी मेल्यावर पिंडदाने वगैरे करू नका. आत्मा मुक्त होणार, देह सुटणार, तेथे कावळे कसले पिंडांना शिववता? मुक्त होणा-या आत्म्याला का पिंडाची इच्छा असते? आणि भटजीला गायबीय देऊ नका. गायीची कोणी काळजी घेत नाहीत काही नाही. सारे गायींना मारणारे. '' बाळयाकाका हे जुन्या पिढीतले शास्त्री. कोकणातील खेडयाचे राहणारे. परंतु आगरकरांसारखे हे विचार! 'कसली श्राध्दे नि पिंडदाने' असे म्हणणारे! मला ते सारे ऐकून बाळयाकाकांच्या जीवनाची अधिकच भव्यता वाटली! निर्भय, नि:स्पृह, स्वावलंबी, स्वाभिमानी, प्रेमळ, उदार, व्रती जीवन! अशी जीवने समाजाला आधार असतात. समाजाला आतून ओलावा देत असतात. बाळयाकाकांची मंदमधुर हसणारी मूर्ती माझ्या डोळयांसमोर आहे. मी त्यांना कधी विसरणार नाही. मी त्यांना, तुला हे लिहिताना, क्षणभर थांबून हात जोडले. प्रणाम! बाळयाकाका, तुम्हांला प्रणाम! फणसाप्रमाणे, आंब्याप्रमाणे तुम्ही रसाळ नि गोड!
धारवाडला 'वनिता-सेवा समाज' म्हणून एक संस्था आहे. १९२८ साली एका गतधवा सोवळया स्त्रीने स्वत:ची सारी इस्टेट देऊन ही संस्था सुरू केली. भागीरथीबाई त्यांचे नाव. दहाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले. जीवनाचे काय करायचे? स्त्रियांच्या सेवेला वाहून घ्यायचे मनात येई. स्वत:ची इस्टेट देता येईल का? वकील म्हणाले, 'नाही देता येणार!' तेव्हा एकाला दत्तक घेऊन त्याच्याकडून ही इस्टेट या संस्थेला बक्षीस म्हणून देवविली. हे दत्तक पुत्र वैद्य आहेत, निसर्गोपचाराचे भक्त! अनाथ स्त्रियांना आधार देणारी संस्था. मुलीचे जरा पाऊल चुकले तर सारा समाज कावकाव करतो. स्त्रियाच का केवळ अपराधी! पुरुष नाहीत? परंतु ते तर सुटतात. फळ मुलीला भोगावे लागते. कोण आधार देणार? आजही अपहृत स्त्रियांना हिंदू समाज परत घ्यायला तयार नसतो. गांधीजींनी किती तळमळीने लिहिले. आपण अनुदार आहोत. अशा अभागी भगिनींना आधार घ्यायला ही भगिनी उभी राहिली. अनेकांनी टीका केल्या. येथे आलेल्या मुलींचे पुन्हाही काही चुकले तरी त्यांना क्षमा करून घेतले जाते. आई का मुलाचा एकच अपरा क्षमा करते? वनिता सेवा समाज आईसारखा आहे. त्याचे दार नेहमी मोकळे राहील. येथे जवळ जवळ ४० मुली आज आहेत. सातवीपर्यंत शिक्षण मिळते. शिवण, हातमाग, भरणे, विणणे, नाना उद्योग शिकविले जातात. तेथे प्रसूतिसदन आहे. मुलींना नर्सिंगचे शिक्षण मिळते. काही मुली सूतिकेचे काम करू शकतात. सोप्या औषधांची त्यांना माहिती दिली जाते. लाठी वगैरे शारीरिक शिक्षण, संगीत याचेही शिक्षण आहे. सारे स्वावलंबन आहे. स्वत: दळतात, स्वयंपाक करतात, भांडी घासतात, झाडलोट करतात, फुले, फळभाज्या करतात. इमारती बांधताना स्वत: मातीच्या, विटांच्या टोपल्या मुली देत. भागीरथी बाई सांगत होत्या व मी उचंबळत होतो. मुलींनी सुंदर लाठी केली, सुंदर गीते म्हटली. तेथे एक लहान परित्यक्त मुलगी सांभाळण्यास आली आहे. दोन वर्षांची असेल. ती 'जयहिंद' म्हणाली. केवढी थोर सेवा येथे चालली आहे! भागीरथीबाई रोज भिक्षा मागून आणतात. महिन्याचा दोन हजार खर्च आहे. संस्थेच्या शाळेत नि उद्योग-वर्गात गावातीलही दोनशे मुली येतात. शिक्षक आहेत. त्यांना पगार द्यावा लागतो. सरकारची या सुंदर संस्थेला मदत नाही असे कळले. पंढरपूरच्या थोर संस्थेसही सरकारी मदत नाही म्हणतात. कायद्यात म्हणे बसत नाही! आग लावा त्या कायद्यांना. वाटेल ते वटहुकूम काढणाऱ्या सरकारला अनाथांना आधार देणा-या संस्थांना मदत देता येऊ नये?
श्री. भागीरथीबाई म्हणाल्या, ''येथील म्युनिसिपालटी ५ एकर जागा देणार होती. परंतु आता मिळेल का नाही कोण जाणे. त्या जागेचे प्लॉट पाडून म्हणे विकणार आहेत. आम्हांला का सत्याग्रह करावा लागेल?''अशा संस्थेला जागा मिळू नये? येथील कलेक्टरचा बंगला व कचेरी यासाठी म्हणे दोन अडीचशे एकर जागा आहे! आणि येथे पाच एकर मिळू नये? मिळेल, मिळेल. धारवाडचे नगरपिते का उदार नसतील?