गदगला एक भीष्माच्या पादुकांचे स्थान आहे. तेथे एक तलाव आहे. परंतु पाणी नव्हते. भीष्म दक्षिणेत कधी आले होते कोणास ठाऊक! परंतु प्रत्येक ठिकाणच्या लोकांना भारतातील सा-या पूज्य व्यक्ती केव्हा तरी आपल्याही प्रदेशात येऊन गेल्या होत्या, असे दाखवावेसे वाटते. येथे त्रिकुटेश्वर म्हणून प्रसिध्द जुने मंदिर आहे. आपल्याकडे जशी दगडावर दगड रचून केलेली हेमाडपंती देवळे आहेत तशीच ही. परंतु फार मोठी. जखणाचार्यांनी ही शिल्पपध्दती रूढ केली म्हणतात. मंदिर लांबरुंद खूप आहे, परंतु त्या मानाने उंची नाही. दगडांवर नक्षी आहे. रामायणातील वगैरे दृश्य आहेत. संसारातील व निसर्गातील नाना दृश्ये खोदली आहेत. मृदंग वाजत आहे, नृत्य चालत आहे,- अशी दृश्ये आहेत. मोर, माकडे, खोदली आहेत. त्रिकुटेश्वराच्या भोवतालचे आवार खूप मोठे आहे. परंतु येथे रमणीय असे वाटत नाही, सारे शून्य वाटते. वीर नारायणाचे मंदिर उंच आहे. हे दाक्षिणात्य मंदिरांच्या धर्तीचे. दोन गोपुरे आहेत. मंदिरावर ठायी ठायी अपार नक्षी. शेकडो छोटी गोपुरे दगडातून दाखविली आहेत.
या वीर नारायणाच्या मंदिरातील एका खांबाजवळ बसून कुमार व्यास नावाच्या कन्नड कवीने आपले कन्नड भारत रचिले. ज्या खांबावर ज्ञानेश्वर कोळशाने ओव्या लिहीत, तो जसा नगर जिल्ह्यात दाखविला जातो, तसा हा कुमार व्यासाचा खांब. या कवीने स्वत:ला कुमार व्यास ही पदवी घेतली होती.
एका लेखकाने म्हटले आहे, ''कुमार व्यास महाभारत लिहू लागले की कलियुगाचे द्वापार युग होते.'' हे महाभारत फार सुंदर आहे म्हणतात.
गदग शहराची व्युत्पत्ती या बाजूला गजग्यांची म्हणजे सागरगोट्यांची झाडे फार होती, त्यावरून गदग नाव पडले अशी लावतात. गजगा हा शब्द कन्नड भाषेतूनच मराठीत आला असेल! कोणी निराळीही उपपत्ती लावतात.
धारवाड, गदग, हुबळी इकडे अरविंदांचा संप्रदाय वाढत आहे. महाकवी बेंद्रे हे अरविंदपंथीच. हुबळी येथे अरविंदमंडळ आहे. कन्नड भाषेत अरविंद- वाङ्मय आणण्याची योजना करीत आहेत. गदगचे डॉ. आनंदराव उमचिगी फार सज्जन गृहस्थ. त्यांच्या घरी लहान मुले मँटिसरी पध्दतीने शिकतात. आईच मुलांना शिकविते. आनंदराव अरविंदांचे अनुयायी. आनंदरावांचे आजोबा पुष्कळ वर्षांपूर्वी मोडीत 'सत्यवृत्त' नावाचे वृत्तपत्र चालवीत. शिळाप्रेसवर छापीत. आनंदरावांच्या घरी तसेच डॉक्टर चाफेकरांच्या घरी चांगलाच ग्रंथसंग्रह आढळला.
सहज बसल्यावर अनेक गोष्टी निघत. तू भूगोलात म्हैसूर संस्थानातील 'श्रवणबेलगोला' येथील गोमटेश्वराच्या प्रचंड पुतळ्याविषयी वाचले असशील. गोमटा म्हणजे सुंदर. कोकणी भाषेत हा शब्द नेहमी वापरतात. आपण फक्त 'गोरागोमटा' या शब्दप्रयोगात ठेवला आहे. गोमटेश्वर म्हणजे सुंदर ईश्वर. ५७ फूट उंच असा हा पाषाणमय पुतळा आहे. अंगावर साप, वेली वगैरे दाखविल्या आहेत. गोमटेश्वर म्हणजे जैन तीर्थकर, महान साधू. तो तपश्चर्या करीत आहे, व तप करता करता अंगावर वेली वाढल्या तरी तो तपस्पेतच तन्मय होता. हे सारे त्या पुतळ्याच्या अंगावरील वेली वगैरेंनी दर्शविले आहे. दर बारा वर्षांनी गोमटेश्वराला दुधाचा महाभिषेक होतो. पहिली घागर कोणी ओतायची? म्हैसूर सरकार चढाओढ लावते. ज्याचे जास्त पैसे त्याची पहिली घागर. मला वाटते ४० किंवा ४१ साली मागे जेव्हा हा द्वादश- वार्षिक अभिषेक झाला होता, तेव्हा इंदूरचे श्री हुकुमचन्द शेठ यांनी २ लक्ष रुपये देऊन पहिली घागर ओतली! दुस-या घागरीला असेच काही रुपये. असे नंबर लावतात. म्हैसूर सरकारला उत्पन्न होते. सरकार व्यवस्थाही सुंदर ठेवते.