एका मंत्र्याने त्याला ‘गोरिला’ म्हटले. तरीही लिंकन सारे सहन करीत होता. यादवी युद्ध फुटू पाहणा-या संस्थानांना एकत्र ठेवण्यासाठी होते. परंतु युद्ध सुरू झाल्यावर दोन वर्षांनी १८६३ च्या वर्षारंभाला गुलामगिरी नष्ट करण्याची लिंकनने घोषणा केली. यादवी युद्ध नैतिक भूमीवर गेले. जगाची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. महत्त्वाकांक्षी लिंकन मानवजातीचा कैवारी म्हणून तळपू लागला. त्याच्याभोवती तेजोवलय पसरले. पुढे युद्ध संपले. बंडखोर संस्थाने शरण आली. लिंकनचे ते ऐतिहासिक भाषण झाले, “झाले गेले विसरू या. सर्वांबद्दल मनात प्रेम ठेवून, कोणाचा हेवादावा न करता आपण नवा कारभार सुरू करू या.”
परंतु देवाची इच्छा निराळी
नवा कारभार सुरू होणार तो लिंकनला देवाघरचा निरोप आला. एका तरुणाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. कवी व्हिटमन् म्हणाला, “माझा सरदार, कोठे गेला माझा सरदार?” परंतु युद्धामुळे लिंकनबद्दल जे गैरसमज पसरले होते ते या मरणाने दूर झाले. लिंकन राष्ट्राचा पिता बनला. आपण चुकणारी मुले, असे सा-यांना वाटले. गांधीजी हिंदु-मुसलमानांना प्रेमाने नांदा सांगता सांगता मारले गेले. मानवजातीचे उद्धारक का अशाच मार्गाने जायचे? सॉक्रेटिसाला विष देण्यात आले. ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. लिंकनवर गोळ्या झाडण्यात आल्या, महात्माजींनाही असेच वीरमरण! लिंकन आणि गांधीजी ह्या दोघांची नेहमी तुलना करण्यात येते. दोघे वीर-पुरुष, दोघे मानवाबद्दल प्रेम बाळगणारे! लिंकनला शस्त्र घेऊन लढावे लागले. १० लाख माणसे यादवीत मेली. कोणी म्हणतात, लिंकन अध्यक्षपदासाठी उभा न राहता तर युद्ध टळले असते. कोणाला माहीत?
जनतेचे प्रेम
सर्वसामान्य जनतेचे त्याच्यावर प्रेम होते तो अध्यक्ष झाला, तेव्हा एक लहानपणची ओळखीची म्हातारी आजीबाई हातमोजे आणून म्हणाली, “अबे, हे घे. तुझ्या अध्यक्षस्थानी हे घेऊन जा. माझ्या हाताने कातलेल्या सुताचे मी हे विणले आहेत?” आणि लिंकनने ते प्रेमाने घेतले. सहा फूट चार इंच उंच असलेला हा वीरपुरुष विचाराने, भावनेनेही सर्वांहून उंच होता. महत्त्वाकांक्षा व उदात्तता यांचे तो मिश्रण होता. माती व प्रकाश, मर्त्यता व अमृतत्व यांचे मिश्रण म्हणजे त्याचे जीवन! परंतु त्या जीवनात अपूर्णता, दोष, अंधार आज दिसून न येता त्या जीवनातील धीरोदात्तता व मानवजातीबद्दलचे व्यापक प्रेम याच गोष्टी सर्वांच्या डोळ्यांसमोर येतात!