पेकिंगशी बोलणी
सन्यत्सेन १९३४ मध्ये पेकिंगच्या उत्तर सरकारशी बोलणी करायला गेले. परंतु ते आजारी पडले. ते बरे झआले नाहीत. १९२५ च्या १३ मार्चला हा चीनचा राष्ट्रपिता पेकिंग येथे मरण पावला. तेथील मंदिरात त्याचे आवशेष ठेवण्यात आले होते. १९२८ मध्ये ते नानकिंग येथे आणण्यात आले व भव्य समाधी बांधण्यात आली.
एक थोर विभूती
सन्यत्सेन एक महनीय विभूती होते. त्यांच्या त्यागाला सीमा नव्हती. त्यांच्या मुखावर असे काही तेज होते की, सारे ओढले जात. जगभर त्यांच्यामागे मारेकरी होते, परंतु चिनी जनतेने त्यांना सांभाळले. सा-या जगातून लोक मदत पाठवीत. चीनमध्ये राष्ट्रीयतेची ज्वाला त्यांनी पेटविली. पुष्कळ वेळा ते निराश होत. काय करावे ते त्यांना सुचत नसे. तरीपण एक व्यापक राष्ट्रीय जागृती त्यांनी या विशाल देशात केली. ते असतानाच कोमिंटांगमध्ये मतभेद होऊ लागले. त्यांच्या मरणानंतर ते विकोपास गेले व त्यांतून चाललेली यादवी अजूनही चीनला रडवीत आहे. सन्यत्सेन यांची पत्नी कम्युनिस्टांच्याच बाजूची राहिली. ती एक पवित्र ज्वाला जणू होती.
‘सॅन मिन् चुई- जनतेची तीन तत्त्वे’ या नावाचा सन्यत्सेननी एक ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांचे विचार आहेत. मरणाआधी त्यांनी देशासाठी जे मृत्युपत्र लिहिले, त्यात ते लिहितात, “गेली चाळीस वर्षे मी क्रांतीचा उद्योग केला. आपला देश इतर राष्ट्रांप्रमाणे स्वतंत्र व समृद्ध व्हावा याच एका इच्छेने मी धडपडलो. चाळीस वर्षांच्या धडपडीचे सार म्हणून मी सांगतो की, माझी इच्छा तेव्हाच पूर्ण होईल की, जेव्हा सारे राष्ट्र जागे होईल. जेव्हा शोषितांच्या बाजूने तुम्ही सारे उभे राहाल. परदेशी राष्ट्रांनी चीनची वंचना करणारे तह केले आहेत. ते नष्ट करा. पूर्वीच्या सरकारने केलेले करार बंधनकारक मानू नका. परकी राष्ट्रांनी जबरदस्तीने आमचे रक्तशोषण करावे, हे आम्ही सहन करता कामा नये. माझी ही हार्दिक प्रेरणा आहे!”