मी भरभर जात नव्हतो. म्हाता-यांबरोबर चालायला मी लाजत नव्हतो. मी त्यांच्याबरोबर, त्यांच्या चालीने, बोलत-बोलत, सावकाश जात होतो. गावची सीमा लवकर येऊ नये, असे मला वाटत होते. बाजार संपला. गावातली शेवटची घरे आली. गावाबाहेरचा रस्ता लागला.
''श्याम, आता पुरे. जा माघारा. किती दूरवर येशील?'' आजीबाई म्हणाली.
मी उत्तर दिले नाही. मी मुकाटयाने चाललो होतो. मी बोलणार तरी काय? त्या प्रेमगंगेला मी काय उत्तर देऊ? त्या माउलीला मी काय देऊ?
''श्याम, थांबतोस की नाही?'' असे म्हणून म्हातारबाय माझ्या पाठीमागे पळू लागली.
परंतु मी का तिला सांपडणार? मी हरणासारखा उडया मारीत दूर गेलो व हसून पाठीमागे पाहू लागलो. शेवटी गावाबाहेरचा एक मैलाचा दगड आला. तेथे झाडाखाली मी थांबलो. भावनांनी मी ओथंबालो होतो. ती दोघे हळूहळू आली.
''श्याम, किती रे दूर यायचं?'' म्हातारी म्हणाली. ''तुमच्याबरोबर येणं म्हणजे मायबापांबरोबर येणं.'' मी म्हटले. '' जा आता, प्रकृतीला जप. दिवाळीची सुट्टी झाली; म्हणजे विटयाला ये. मग कार्तिकीला आपण पंढरीला जाऊ. तू आमचा मिठू पाहा. त्याला तुझं नाव शिववीन, श्याम श्याम! अशी तो हाक मारील. ये बरं का?'' म्हातारी म्हणाली?
मी तिच्या पायांवर डोके ठेवले. म्हातारबांबाच्याही पाया पडलो. त्यांनी माझ्या पाठीवरुन हात फिरवले. आजीबाईने गाठोडे डोक्यावर घेतले.
''येतो बरं, श्याम. सांभाळ. तुकारामला भेटत जा,'' म्हातारी म्हणाली.
ती दोघे चालू लागली. थोर, प्रेमळ, साधे सरळ असे ते जीवनाचे दोन यात्रेकरु जाऊ लागले. मी त्यांच्याकडे पाहात उभा राहिलो. म्हातारीने मागे वळून पाहिले. ''जा आता,'' ती म्हणाली. तरी मी तेथे उभाच. पुन्हा तिने माघारे वळून पाहिले. तिने हाताने 'जा' अशी खूण केली, कारण तिचा आवाज आता ऐकू येता ना.
वळली दोघेजणे. मला ती दिसेनाशी झाली. बाहेरच्या डोळयांना दिसेनाशी झाली. आतील डोळयांना त्यांच्या त्या सुरकुतलेल्या सौम्य स्निग्ध मूर्ती सदेव दिसतच आहेत. मी तेथे झाडाखाली बसलो. मी क्षणभनर सारे विसरलो. तेथे हिरव्या गवतावर मी आडवा झालो. माझा तेथे डोळा लागला.
मी तेथे स्वप्न पाहिले. स्वप्नात आई पाहिली; परंतु आई अहश्य होऊन, म्हातारबाय दिसू लागली. ''जा आता श्याम,'' असे म्हातारबाय पाठीमागे वळून सांगत आहे, असे स्वप्नात ऐकले. झाडाची एक काटकी डोळयांवर पडली. मी जागा झालो. मी उठलो. गावाकडे माझी पावले वळली.
हळूहळू मी चालत होतो. विचारांच्या तंद्रीत मी होतो. गतस्मृतींच्या साम्राज्यात होतो. शाळा आली. दोन तास झाले होते. छोटी सुट्टी झाली होती. मी लगबगा घरी गेलो. पुस्तके, वह्या घेऊन शाळेत आलो. पुन्हा शाळा सुरु झाली. मी माझ्या वहीवर,'गेली, आजीबाई गेली चिमणुलीबाय दूर उडून गेली,' असे लिहीत होतो, माझे कशातही लक्ष नव्हते.