कुरुक्षेत्र युद्ध समाप्त झाल्यानंतर युधिष्ठिराला हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आलं. त्याने आपल्या सहकाऱ्यांचे भले व्हावे यासाठी एक यज्ञ आयोजित केला. यज्ञ अतिशय भव्य होता आणि त्यात सर्व सहकाऱ्यांचे अतिशय महागड्या आणि मौल्यवान भेटवस्तू देण्यात आल्या. राज्यात उपस्थित सर्व लोकांना वाटलं की हा सर्वात भव्य असा यज्ञ आहे. जेव्हा लोक यज्ञाची प्रशंसा करत होते तेवढ्यात राजा युधिष्ठिराने एक मुंगूस पहिले. त्याच्या शरीराचा एक भाग सर्व साधारण मुंगुसांप्रमाणे होता, तर दुसरा सोन्यासारखा चमकत होता. ते जमिनीवर पुन्हा पुन्हा उलट सुलट होऊन हे पाहत होतं की आपल्या शरीरात काही बदल घडून येतो आहे की नाही. सर्वांना आश्चर्याचा अक्षरशः धक्का बसला जेव्हा त्या मुंगुसाने युधिष्ठिराला सांगितले की हा यज्ञ बिलकुल प्रभावी नाहीये आणि हा यज्ञ म्हणजे फक्त दिखाऊ आहे, बाकी काही नाही. मुंगुसाची ही वाणी ऐकून युधिष्ठिराला अतिशय दुःख झालं, कारण त्याने यज्ञाच्या सर्व नियमांचे पालन केले होते आणि गरिबांना दान धर्मही केला होता. मुंगुसाने सर्वांना सांगितलं की ते एक कथा सांगेल, त्यानंतरच सर्वांनी निर्णय घ्यावा.
कथा -
एकदा एका गावात एक गरीब माणूस आपली पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होता. खरं म्हणजे ते फारच गरीब होते परंतु तरीही त्यांनी कधीही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही, सहनशीलता, आणि संतुलानाने ते आपले जीवन व्यतीत करीत होते. एक दिवस गावात दुष्काळ पडला. त्या माणसाने बाहेर जाऊन मोठ्या मुश्किलीने काही तांदूळ गोळा करून आणले. त्याच्या पत्नीने आणि सुनेने ते शिजवून ४ भागात वाटले. जसे ते जेवायला बसले तोच दारावर थाप पडली. दार उघडल्यावर त्यांना दिसलं की बाहेर एक अतिशय थकलेला वाटसरू उभा आहे. त्या वाटसरूला आत मध्ये बोलावून त्या गरीब माणसाने आपल्या हिश्श्याच अन्न त्याला खायला दिलं. पण ते खाऊनही त्याचं पोट भरलं नाही तेव्हा मग यजमानाच्या पत्नीने देखील आपल्या वाट्याचे अन्न त्याला दिले. असं करता करता मुलगा आणि सुनेने देखील आपापले हिस्से त्याला खायला देऊन टाकले. मुंगुसाने सांगितले की त्याच वेळी तिथे एक प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून जो देव परीक्षा घ्यायला आला होता तो प्रगट झाला. त्याने त्या कुटुंबाला आशीर्वाद दिले आणि सांगितलं की त्यांनी सर्वात मोठ्या याज्ञाचं आयोजन केले आहे. ते मुंगूस जे त्या वेळी त्या घराजवळून जात होतं, त्याने त्या घरात सांडलेलं थोडं उष्ट अन्न खाल्लं. ज्या नंतर त्याच्या शरीराचा एक भाग सोन्याचा झाला होता. तिथे आणखी अन्न शिल्लक नव्हतं, त्यामुळे ते मुंगूस त्यानंतर सर्व यज्ञांच्या ठिकाणी जाऊन फिरतं जेणे करून त्याला असा यज्ञ मिळेल जो त्याच्या शरीराचा उरलेला भागही सोन्याचा बनवेल. त्यामुळेच त्याने सांगितलं की युधिष्ठिराचा यज्ञ हा त्या गरीब परिवाराच्या यज्ञापेक्षा मोठा असू शकत नाही. असं सांगून ते मुंगूस तिथून गायब झालं. ते मुंगूस म्हणजे प्रत्यक्षात भगवान धर्म होते ज्यांना मागील जन्मात शाप मिळाला होता की ते आपल्या मूळ अवस्थेत तेव्हाच येऊ शकतील जेव्हा ते धर्माच्या कोणा प्रतिनिधीला अपमानित किंवा खजिल करतील.
युधिष्ठिराच्या लक्षात आले की दान म्हणून दिलेली सर्वच्या सर्व दौलत सुद्धा मनाच्या सच्चेपणाची बरोबरी नाही करू शकत. धर्माचे अनुयायी असूनही त्यांना जाणीव झाली की गर्व आणि शक्तीची घमेंड सज्जनातल्या सज्जन पुरुषांचेही अधःपतन करू शकतात.