पृथ्वीवरील सर्वात मोठा समुद्र म्हणजे पॅसिफीक महासागर! उत्तरेला आर्क्टीक महासागर, पश्चिमेला आशिया आणि ऑस्ट्रेलिया, पूर्वेला अमेरीका आणि दक्षिणेला अंटार्क्टीक महासागराच्या दरम्यान पसरलेला अफाट सागर म्हणजे पॅसिफीक! पृत्थ्वीवरील सर्व भूभागांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही जास्त विस्तार असलेला पॅसिफीक महासागर म्हणजे अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टींचा अवाढव्य खजिना आहे! पृथ्वीवरील सर्वात खोल असलेली मरियाना ट्रेंच (गर्ता) ही पॅसिफीकमध्येच आढळून येते. (समुद्रपृष्ठभागापासून १०.९५ किमी खोल!)

रोलँड वेस्ट या हॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकासाठी कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिस इथल्या विल्मींग्टन बोट वर्कस या कंपनीने १९३१ मध्ये २१ मी (६९ फूट) लांबीचं एक याच बांधलं. याचचा मुख्य सांगाडा दोन इंच जाडीच्या उत्कृष्ट प्रतीच्या ओक लाकडांपासून बनवण्यात आला होता. या बोटीला दोन डिझेल इंजिने होती. रोलँड वेस्टने आपल्या गर्लफ्रेंडचं - ज्युवेल कार्मेनचं नाव या बोटीला दिलं..

जोयिता!

जोयिताचा अर्थ छोटे रत्न अथवा माणिक. १९३६ मध्ये मिल्टन बेकनच्या नावाने हे याच नोंदवण्यात आलं.

याच ताब्यात घेतल्यावर वर्षाभरातच वेस्ट आणि कारमेनचं फाटलं! रोलँड वेस्टनेच मग हे याच भाड्याने देण्यास सुरवात केली. मेरी पिकफोर्ड, डग्लस फेअरबँक्स, हंफ्रे बोगार्ट यासारख्या सुपरस्टार मंडळींनी हे जहाज वापरलं. या काळात जहाजाने मेक्सीकोच्या अनेक वार्‍या केल्या. चेस्टर मिल्स हा जहाजाचा कॅप्टन होता. हंफ्रे बोगार्टला हे जहाज विकत घेण्याची इच्छा झाली होती, परंतु या जहाजावरुन सफरीवर गेलेला एक पाहुणा अचानक गायब झाल्यावर त्याचा विचार बदलला.

दुसर्‍या महायुध्दाला सुरवात होताच अमेरीकन सरकारने हे जहाज ताब्यात घेतलं आणि गस्तं घालण्यासाठी त्याचा वापर करण्यास सुरवात केली. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यातून हे जहाज थोडक्यात बचावलं होतं.

दुसर्‍या महायुध्दानंतर लुईस बंधूंनी हे जहाज विकत घेतलं. जहाजाच्या सांगाड्यावर बुरशी धरण्यापासून बचावासाठी रोगणाचा लेप देण्यात आला. त्याचप्रमाणे समुद्रात पकडलेले मासे टिकवून ठेवण्याची लाकडी यंत्रणा (रेफ्रीजरेशन) जहाजावर उभारण्यात आली. मूळच्या दोन डिझेल इंजिनांच्या जोडीला जनरेटर्ससाठी आणखीन दोन इंजिने जहाजावर बसवण्यात आली. १९५२ मध्ये हवाई युनिवर्सिटीच्या कॅथरीन ल्युमेला हिच्याकडे जहाजाची मालकी आल्यावर तिने ते सामोआ बेटावर वास्तव्यास असणारा ब्रिटीश कॅप्टन थॉमस 'डस्टी' मिलर याला चालवण्यास दिलं.

.... आणि जोयिताने आपले रंग दाखवण्यास सुरवात केली!

दुसर्‍या महायुध्दात जनरल डग्लस मॅकआर्थरच्या नेतृत्वाखाली लढलेल्या दोस्त राष्ट्रांच्या नौसेनेत डस्टी मिलरचा समावेश होता. महायुध्द संपल्यावर दक्षिण पॅसिफीक महासागरातील पॉलीनेशियन बेटांपैकी सामोआ बेटाची राजधानी आपिया इथे तो वास्तव्यास होता. जोयिताचा कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यावर त्याने आपिया ते टोकेलू बेटांच्या दरम्यान वाहतुकीसाठी आणि मासेमारीसाठी फेर्‍या मारण्यास सुरवात केली.

१९५३ मध्ये जोयिता आपियाहून टोकेलू बेटाच्या मार्गावर होतं. आपिया सोडल्याला काही तास उलटून गेले होते. पहाटेची वेळ असल्यामुळे समुद्रावर सर्वत्र धुक्याचं आवरण पसरलेलं होतं. दृष्यमानता जेमतेम काहीशे फूटांपर्यंतच होती. सागरात दुसर्‍या कोणत्याही जहाजाशी टक्कर होऊ नये म्हणून जोयितावरील खलाशी चौफेर लक्षं ठेवून होते.

जहाजाच्या मागील भागात असलेल्या खलाशाला एक मोठा आकार आपल्या जहाजामागून सरकत असल्याचं दृष्टीस पडलं! धुक्याचा पडदा असल्याने नेमका काय प्रकार असावा हे त्याला कळेना. दहा-पंधरा मिनीटे काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण केल्यावर त्याने ही गोष्ट मिलरच्या निदर्शनास आणली. जहजामागून येणारा तो आकार नेमका कसला असावा याचा मिलर विचार करत असतानाच धुक्याचा पडदा विरळ झाला आणि....

,,,, एखाद्या भुताप्रमाणे एक मोठं जहाज त्यांच्यासमोर उभं ठाकलं!

कॅप्टन मिलरसह सर्वजण ते जहाज पाहून आश्चर्याने थक्कं झाले!

१६ व्या किंवा १७ व्या शतकातील जहाजाप्रमाणे त्या जहाजाची बांधणी केलेली दिसत होती! स्पॅनिश अथवा पोर्तुगीजांची खजिना वाहून नेणारी जहाजं असत त्याच पठडीतील हे जहाज होतं! जहाजावर मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाची कोणतीही खूण दिसत नव्हती, परंतु जहाज आपल्या गतीने जोयिताच्या मागोमाग येतच होतं.

आपल्या मागोमाग येणारं हे जहाज पाहून कॅप्टन मिलर अस्वस्थं झाला. त्या जहाजाला पाठवण्यात आलेल्या रेडीओ संदेशांना कोणतंही प्रत्युत्तर मिळत नव्हतं. स्वतः मिलरने सुकाणू हातात घेतलं आणि त्या जहाजाच्या मार्गातून जोयिता बा़जूला घेण्यास सुरवात केली....

... आणि जोयिताने दिशा बदलताच मागून येणार्‍या त्या जुन्या जहाजानेही दिशा बदलली!

ते जहाज आपल्या मागोमाग येत असलेलं पाहिल्यावर मिलरने त्याच्या मार्गातून बाजूला होण्याचा विचार बदलला आणि शक्यं तितक्या वेगाने जोयिता पळवण्यास सुरवात केली! मात्रं मागच्या जहाजावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ज्या वेगाने जोयिता जात होतं, त्याच वेगाने ठराविक अंतरावरुन ते जहाज मागोमाग येत होतं!

पाठशिवणीचा हा खेळ सुमारे तासभर सुरु राहीला!

हळूहळू विरळ होत धुकं पूर्णपणे नाहीसं झालं. मोकळ्या हवेत पोहोचल्यावर त्या जहाजाचं नीट निरीक्षण करण्याच्या दृष्टीने कॅप्टन मिलरने जोयिताचा वेग कमी केला आणि मागे नजर टाकताच त्याला दुसरा धक्का बसला.

जेमतेम पाव मैल अंतरावरुन जोयितापाठोपाठ येणार्‍या त्या जहाजाचा कुठेही मागमूस नव्हता!
दुर्बिणीतून पाहील्यावर दूर क्षितीजापर्यंत त्या जहाजाच्या अस्तित्वाची कोणतीही खूण आढळून आली नाही!

टोकेलू बेटावर पोहोचल्यावर मिलरने आपल्या सर्व खलाशांना एकत्रं केलं आणि त्यांना विचारलं,

"जुन्या काळातली.. खजिना वाहून नेणारी जहाजं कशी दिसत होती याची तुम्हांला कल्पना आहे काय? आपल्यामागे लागलेलं ते जहाज त्या काळातल्या जहाजांप्रमाणेच दिसत होतं!"

मिलरच्या प्रश्नाला सर्वांनी नकारार्थी उत्तर दिलं. जोयितावरील कोणालाही जुन्या जहाजांविषयी फारशी माहीती नव्हती.

टोकेलूवरुन परतीच्या वाटेवर असताना मात्रं पुन्हा ते जहाज कोणाच्या दृष्टीस पडलं नाही!

आपल्या डायरीत मिलरने नोंद केली,
"जुन्या काळातल्या स्पॅनिश किंवा पोर्तुगीज जहाजांप्रमाणे दिसणारं ते जहाज आमच्या मागे का आलं होतं याची काहीच कल्पना करता येत नाही. आमच्यापैकी प्रत्येकाने ते जहाज पाहीलं होतं. मात्रं विचार करूनही नंतर अचानक ते कुठे गडप झालं याचा कोणालाच उलगडा झाला नाही!"

मिलर पुढे म्हणतो,
"हे प्राचीन काळातलं जहाज दिसणं जरी विस्मयकारक असलं तरी जोयितावर आलेले इतर अनुभव पाहता फारसं नवलाचं नव्हतं! माझ्या केबिनमध्ये बंकरवर झोपलेलो असताना माझ्याबाजूला सतत कोणीतरी वावरत असल्याचा मला भास होतो. कधी कधी आमच्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाला एका स्त्रीच्या हसण्याचा स्पष्ट आवाज ऐकू येतो! भर उन्हाळ्यातल्या रात्री येणारी थंड हवेची अनैसर्गीक झुळूक आसपास कोणाच्यातरी अस्तित्वाची चुणूक दाखवून देत असते!"

३ ऑक्टोबर १९५५ ला पहाटे ५.०० वाजता जोयिताने आपिया बंदर सोडलं आणि टोकेलू बेटाची वाट पकडली. कॅप्टन डस्टी मिलर आणि फर्स्ट मेट चार्ल्स सिंप्सनसह सोळा खलाशी आणि नऊ प्रवासी अशी एकूण २५ माणसं जहाजावर होती. प्रवाशांमध्ये दुसर्‍या महायुध्दात लष्करात काम केलेला डॉक्टर आल्फ्रेड पार्सन्स याचा समावेश होता. जहाजावर टोकेलू बेटावर नेण्यात येत असलेली अन्नसामग्री आणि औषधं अशी एकूण २० टन सामग्री भरलेली होती. त्याखेरीज प्रत्येकी ४५ गॅलन (२०० लीटर) क्षमतेचे ८० रिकामे ड्रम जहाजावर होते. विल्यम्स या प्रवाशाजवळ ५० पौंड चांदी होती. परतीच्या वाटेवर जोयिता नारळ भरुन येणार होतं.

आपिया बंदरातून निघण्यापूर्वी जहाजाच्या एका इंजिनाचा क्लच नादुरुस्तं झाला होता. मात्रं आपियाहून निघण्यास उशीर करण्याऐवजी टोकेलूच्या मार्गाला लागल्यावर समुद्रावर असताना क्लच दुरुस्तं करण्याचा कॅप्टन मिलरने निर्णय घेतला. एका इंजिनासाह त्याने आपिया बंदर सोडलं. टोकेलू पर्यंतच्या प्रवासाला ४२ ते ४८ तास लागू शकत होते. ५ ऑक्टोबरपर्यंत जोयिता टोकेलूतील फाक्फो बंदरावर पोहोचेल अशी अपेक्षा होती.

६ ऑक्टोबरला फक्फो इथून संदेश आला. जोयिता अद्याप टोकेलू बेटावर पोहोचलं नसल्याचं संदेशात म्हटलं होतं. जहाजावरुन कोणताही धोक्याचा संदेश आलेला नव्हता.

जोयिता टोकेलू इथे पोहोचलं नाही हे स्पष्ट झाल्यावर एकच गोंधळ उडाला. जहाजाचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली. अनेक वेगवेगळ्या जहाजांनी आणि रॉयल न्यूझीलंड एअरफोर्सच्या विमानांनी १२ ऑक्टोबरपर्यंत सुमारे १ लाख चौरस मैलांच्या प्रदेशात कसून शोध घेतला. परंतु जोयिता किंवा एकाही माणसाची कोणतीही खूण अथवा अवशेष आढळून आले नाहीत. अखेर काही अज्ञात कारणाने जहाज बुडालं असावं असा निष्कर्ष काढण्यात आला.

१० नोव्हेंबरला तुवालू हे जहाज फिजी बेटांतील सुवा इथून निघालं होतं. कॅप्टन जेराल्ड डग्लस या जहाजाचा कॅप्टन होता. पॅसिफीकमध्ये पसरलेल्या बेटांवरील मालवाहतूकीवर तुवालूची नेमणूक झाली होती. सुवा इथून निघाल्यावर व्हानुआ लेऊ बेटाच्या उत्तरेला दूर अंतरावर पाण्यात अर्धवट बुडालेलं एक जहाज कॅप्टन डग्लसच्या दृष्टीस पडलं. जवळ जाऊन पाहील्यावर तुवालूवरील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला...

जोयिता!

पाण्यात अर्धवट बुडालेलं जोयिता

आपल्या मूळ मार्गापासून सुमारे ६०० मैल (१००० किमी.) भरकटलेलं जोयिता पाहताच तुवालूवरील सर्वजण चकीत झाले. जोयिता डाव्या बाजूने पाण्यात कलंडलेलं होतं. जहाजाच्या अर्ध्या भागात पाणी शिरलं होतं. परंतु तरीही ते बुडालेलं नव्हतं!

कॅप्टन जेराल्ड डग्लस आणि तुवालूवरील काही खलाशी जोयितावर चढले. जहाजावर पूर्ण फेरी मारल्यावर ते संपूर्ण रिकामं आहे असं त्यांना आढळून आलं.

जहाजावरील २५ माणसांपैकी एकाचंही नामोनिशाण दिसून येत नव्हतं!

जोयिताची डावी बाजू पूर्णपणे पाण्यात होती. खेकड्यासारख्या जलचरांच्या अस्तित्वावरुन जहाजाचा तो भाग बराच काळ पाण्याखाली असावा असा निष्कर्ष काढता येत होता. जहाजाच्या वरच्या भागाचं बरंचसं नुकसान झालेलं होतं. डेकवरील केबिनची काच फुटली होती. केबिनच्या वर कॅनव्हासचं आच्छादन घातलेलं दिसून येत होतं. जहाजाच्या पुढील भागातलं इंजिन दोन गाद्यांनी झाकून टाकण्यात आलेलं होतं! मागील बाजूच्या इंजिनाचा क्लच अद्यापही नादुरुस्तंच होता. एका फळीवर पाणी उपसणारा पंप ठेवण्यात आलेला होता. परंतु तो चालू नव्हता.

जहाजावरील रेडीओ २१८२ किलो हर्ट्झला ट्यून केलेला आढळला. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार जहाज संकटात सापडल्याचा संदेश देण्यासाठी ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते. परंतु रेडीओचं बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्वाची वायर तुटली असल्याचं निदर्शनास आलं! ही वायर तुटल्याचं लपवण्यासाठी त्यावर रंग फासण्यात आला होता! त्यामुळे रेडीओची रेंज जेमतेम दोन मैल एवढीच उरली होती!

जहाजावरील घड्याळ १० वाजून २५ मिनीटे झाल्याचं दर्शवत होतं. जहाजावरील सर्व दिव्यांची बटणं चालू अवस्थेत आढळली होती. त्यावरुन जे काही झालं ते रात्री झालं असावं असा निष्कर्ष काढता येत होता. जहाजावरील लॉगबुक, सेक्स्टंट, क्रोनोमीटर आणि इतर सर्व दिशादर्शक सामग्री नाहीशी झालेली दिसून येत होती. त्याखेरीज कॅप्टन डस्टी मिलरची बंदूकही दिसून येत नव्हती!

डेकवर डॉक्टरची एक बॅग आढळून आली! या बॅगेत स्टेथोस्कोप, एक स्काल्पेल आणि रक्ताने भरलेली चार मोठी बँडेजेस आढळली!

जोयिताच्या इंधनांच्या टाक्यांमध्ये अद्याप डिझेल शिल्लक होतं. वापरल्या गेलेल्या डिझेलवरुन जहाजाने सुमारे २४३ मैल (३९१ किमी) प्रवास केल्याचं दिसून येत होतं. जोयिताने पूर्वनियोजित मार्गाने प्रवास केला असल्यास टोकेलू बेटापासून सुमारे ५० मैल अंतरावर असताना इंजिन बंद झालं होतं!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel