भुताळी जहाज ही लेखमालिका आज संपली.

मानवाने ज्या दिवसापासून सागरावर संचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून सागराशी त्याचं एक अतूट नातं आहे. सागराची अनेक रुपं मानवाने अनुभवलेली आहेत. शांत धीरगंभीर तत्ववेत्त्याप्रमाणे वाटणारा, अवखळ बालकाप्रमाणे धिंगामस्ती करणारा, जहाजांना आपल्या देहावरुन वागवत जगाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचवणारा.. त्याच्या काठावर असलेल्या लाखो-करोडो लोकांचा तो अन्नदाता आहे. आपल्या पोटातील हजारो जलचरांचा पोशिंदा आहे. आणि कधी रौद्ररुप धारण करुन एका क्षणात जहाजांचा आणि लोकांचा ग्रास घेणारा मृत्यूदाताही आहे. तो एक पूर्णरुप आहे!

पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या सर्व सागरांतील सर्वात गूढ आणि अद्भुतरम्य असा महासागर कोणता हे निर्वीवादपणे निश्चीत करणं हे निव्वळ अशक्यं आहे. प्रत्येक महासागराची आणि समुद्राचीही आपली वैशिष्ट्यं आहेत आणि तितकीच रहस्यंही. आपल्या पोटात कोणत्या महासागराने काय दडवून ठेवलं आहे आणि तो कोणत्या क्षणी कोणतं गुपीत बाहेर काढेल याचा अंदाज करणं हे अशक्यंच आहे! त्यातच कधीकधी एखादी अशी गोष्ट समोर येते की माणसाचं डोकं साक्षात चक्रावून जातं!

१९३८ साली दक्षिण आफ्रीकेतील इस्ट लंडन इथल्या हेन्ड्रीक गुसेन या कोळ्याला आपल्या जाळ्यात एक निराळाच मासा सापडलेला आढळून आला. तो मासा नेमका कोणता असावा याची त्याला कोणतीच कल्पना नव्हती. शास्त्रीय जगतात त्यामुळे किती खळबळ उडणार आहे याची तर त्याला कल्पनाही येणं अशक्यं होतं.

गुसेनने तो चकाकणारा पाच फूटी मासा स्थानिक म्युझियममध्ये नेला. म्युझियमचा अधिकारी कॉर्टनी-लॅटिमरलाही तो कोणता मासा असावा ध्यानात येईना! बर्याच विचारमंथनानंतर आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर तो मासा 'कोईल्कॅन्थ' जातीचा मासा असल्याचं निष्पन्न झालं. या जातीचे मासे पृथ्वीवरुन ६६ दशलक्ष वर्षांपूर्वीच नाहीसे झालेले होते!

सागराच्या उदरात आणखीन काय गुपितं दडलेली आहेत?

बार्बाडोस, फ्लोरीडा आणि प्युर्टो रिकोच्या दरम्यान असलेला अटलांटीक महासागराचा भाग हा बर्म्युडा ट्रँगल म्हणून कुप्रसिध्द आहे. पार कोलंबसच्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत अनेक जहाजं, विमानं आणि माणसं कोणताही मागमूस न ठेवता तिथे गायब झालेली आहेत. परंतु हे जहाजं आणि विमानं गायब होण्याचे प्रकार फक्त बर्म्युडा ट्रँगलमध्येच होतात असं नाही. जगभरातील सर्वच सागरातील काही भागांत कमी-अधिक प्रमाणात अशा घटना घडलेल्या आहेत.

बर्म्युडा ट्रँगलच्या तोडीस तोड ठरावा असा भाग म्हणजे जपानजवळचा डेव्हील्स ट्रँगल! आयोवा जिमा आणि मार्क्स आयलंड यांच्या दरम्यानचा पॅसिफीक महासागराचा भागही तितकाच गूढ आणि अनाकलनीय आहे. अनेक जपानी जहाजं, विमानं इथे नाहीशी झालेली आहेत.

१८ सप्टेंबर १९५२ या दिवशी मियोजीन मारु या मासेमारी करणार्या जहाजावरील खलाशांना टो़कीयोच्या दक्षिणेला साडेतीनशे मैलांवर एक संपूर्ण बेट समुद्रातून बाहेर येताना दृष्टीस पडले! या खलाशांनी सांगितलेल्या घटनेची खातरजमा करण्यासाठी म्हणून तीन जपानी जहाजे त्या भागात पाठवण्यात आली. यापैकी शिमियो मारु आणि शिकिने मारू ही दोन जहाजं यथावकाश बेटाचं निरीक्षण करुन परतली. परंतु काइयो मारु या जहाजाचा मात्रं पत्ताच लागला नाही! समुद्रातून वर आलेलं बेट हा ज्वालामुखीचा एक भाग होता. पाण्याखालील या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची नोंद शिमियो मारुतील यंत्रावर झाली होती. याच ज्वालामुखीच्या उद्रेकात काईयो मारु सापडलं असावं असा अंदाज बांधण्यात आला.

१९५२ ते १९५५ या तीन वर्षांच्या कालावधीत या भागात एकूण नऊ जहाजांचा बळी गेला असल्याचं जपान सरकारच्या ध्यानात आलं. याचा नक्की छडा लावण्यासाठी एक संशोधन मोहीम आखण्यात आली. काईयो मारु नं ५ हे जहाज अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधकांसह या भागात शिरलं. या संशोधनाची अखेरही अत्यंत विस्मयकारक ठरली. सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांसह हे जहाजही गायब झालं! त्यानंतर मात्रं जपान सरकारने हा भाग सागरीमार्गातून टाळण्याच्या सूचना जारी केल्या!

कोणताही मागमूस न ठेवता गायब झालेल्या जहाजांविषयी नोंद करताना युध्दकाळात गायब झालेल्या जहाजांचा त्यात समावेश न करणे अनेकदा श्रेयस्कर ठरते. एखादे जहाज शत्रूच्या पाणबुडीने अथवा दुसर्या जहाजाने बुडवल्यास आणि ती बातमी देण्यापूर्वी ती पाणबुडी अथवा जहाजही नष्ट झाल्यास ते जहाज समुद्रावर नाहीसे झाले अशी चुकीची नोंद केली जाऊ शकते.

१९४२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बेनलोमॉन्ड हे जहाज केपटाऊन इथून न्यूयॉर्कच्या वाटेवर होतं. २३ नोव्हेंबरला यू-१७२ या जर्मन पाणबुडीने मारलेले दोन टॉर्पेडो जहाजाच्या इंजिनरुममध्येच फुटले आणि काही वेळातच ते बुडालं. जहाजावरील मूळचा चिनी असलेला पुन लिम हा जाडसर बांध्याचा स्ट्युअर्ड वगळता कोणीच वाचलं नाही. ८ फूट लांब आणि ८ फूट रुंदीचा एक तराफा त्याच्या हाती लागला. तराफ्यावर साठवलेलं अन्नं संपल्यावर त्याने मासे आणि सी-गल्स पकडून खाण्यास सुरवात केली. पावसाचं पाणी कॅनव्हासच्या जॅकेटमध्ये साठवूण तो ते पित होता! एकदा तर पाणी संपल्यावर गळाला लागलेल्या लहान शार्क माशाच्या पोटातील रक्तावर त्याला तहान भागवावी लागली होती! दोनवेळा मोठी जहाजं त्याच्या तराफ्यापासून काही अंतरावरुन गेली, परंतु त्यांचं लक्षं वेधून घेण्यात त्याला यश आलं नाही.

४ एप्रिल १९४३ या दिवशी पुन लिम ब्राझीलच्या किनार्याला लागला! १३३ दिवस खुल्या समुद्रात उघड्या तराफ्यावर काढल्यावर ब्राझीलियन कोळ्यांनी त्याला वाचवलं! केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तो तगून राहीला होता. परंतु तो जिवंत सापडला नसता तर?

बेनलोमॉन्ड जहाज अज्ञात कारणांनी नाहीसं झालं असतं अशीच नोंद झाली असती!

समुद्रप्रवासाच्या तंत्राविषयी जगात सर्वोत्कृष्ट समजले जातात ते डेन्मार्कचे खलाशी. सागरावर वावरण्याचं तंत्र त्यांनी जितकं आत्मसात केलं आहे, तेवढं कोणालाही जमलेलं नाही. डॅनिश लोक आजच्या आधुनिक काळातही नौकानयनाचे सर्व प्राथमिक धडे जुन्या पध्दतीच्या लाकडी जहाजांवर गिरवतात. या प्राथमिक धड्यांनंतरच आधुनिक साधन-सामग्रीची ओळख करुन घेतली जाते!

कोबेनहॅवन हे असंच एक नेव्हल कॅडेट्सना ट्रेनिंग देणारं एक जहाज. डॅनिश इस्ट एशियाटीक कंपनीच्या मालकीचं जहाज १९२८ च्या डिसेंबर मध्ये अर्जेंटीनातील ब्युनॉस आयर्स इथून ऑस्ट्रेलियास जाण्यास निघालं. जहाजावर २६ खलाशी आणि ४५ कॅडेट्स होते. दक्षिण अमेरीकेचं शेवटचं टोक असलेल्या केप हॉर्नला वळसा घालून ऑस्ट्रेलेशीयातून (पॅसिफीक समुद्राचा दक्षिण भाग) ऑस्ट्रेलिया गाठणं हा खरेतर जवळचा मार्ग. परंतु केप हॉर्नच्या आसपासचा समुद्र नेहमीच खवळलेला असल्याने कॅप्टन हॅन्स अँडरसनने केप ऑफ गुड होपमार्गे हिंदी महासागरातून ऑस्ट्रेलिया गाठण्याचा निर्णय घेतला.

१४ डिसेंबरला ब्युनॉस आयर्स सोडल्यावर २२ डिसेंबरला विल्यम ब्लूमर या नॉर्वेजियन जहाजाच्या दृष्टीस कोबेनहॅवन पडलं. विल्यम ब्लूमरला 'सर्व काही ठीक' असल्याचा संदेश देऊन कोबेनहॅवन आपल्या मार्गाला निघून गेलं.

कोबेनहॅवनकडून पुन्हा कोणताही संदेश आला नाही! ते कधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचलं नाही. बहुधा दक्षिणेकडून येणार्‍या हिमनगाला धडकून ते बुडालं असावं असा सर्वांनी निष्कर्ष काढला.

१९३५ मध्ये आफ्रिकेच्या नैऋत्य किनार्‍यावर वाळूत पुरलेली एक लाईफबोट आणि शेजारी काही मानवी सांगाडे सापडले. बोटीवरील वाळू स्वच्छ केल्यावर त्यावर नाव दिसून आलं - कोबेनहॅवन!

या लाईफबोटीवर कोबेनहॅवन वरुन निघालेली माणसं होती! आफ्रीकेच्या किनार्‍यावर पोहोचण्यापूर्वीच सर्वांना मृत्यूने गाठलं असावं!

१९१२ च्या एप्रिलमध्ये इंग्लंडमधील साऊथएम्टन बंदरातून एक जहाज न्यूयॉर्कच्या दिशेने निघालं. आपल्या काळातील सर्वात उत्तम आणि मोठं प्रवासी जहाज असा त्याचा लौकीक होता. जहाजावर प्रवासी आणि नोकरवर्ग मिळून २२०० पेक्षा जास्तं लोकं उपस्थित होते. कॅप्टन फ्रँक स्मिथ या जहाजाचा कॅप्टन होता. अनेक उच्चभ्रू आणि तत्कालिन प्रसिध्द व्यक्ती या जहाजावर होत्या. कधीही बुडू शकणार नाही अशी या श्रीमंत जहाजाची जाहीरात केली गेली होती.

१४ एप्रिल १९१२ या दिवशी - इंग्लंड सोडल्यापासून चार दिवसांनी - आर्क्टीकवरुन येणार्‍या एका मोठ्या हिमनगाला जहाजाने धडक दिली! पुढचा इतिहास कोणाला माहीत नाही?

ग्रेटेस्ट मेरीटाईम डिझास्टर असं ज्या जहाजाचं वर्णन केलं जातं तेच हे ... टायटॅनिक!

अमेरीकन व्यापारी जहाजांवर फर्स्ट मेट असलेल्या मॉर्गन रॉबर्टसन एक लहानशी कादंबरी लिहीली होती. या कादंबरीत त्याने एका प्रचंड मोठ्या ब्रिटीश प्रवासी बोटीला झालेल्या अपघाताचं वर्णन केलं होतं. युरोप आणि अमेरीका खंडातील प्रसिध्द व्यक्तींना घेऊन प्रवास करणार्‍या आणि कधीही बुडू न शकणारी असं वर्णन केलेली ही बोट हिमनगाला धडकून अटलांटीकच्या तळाशी जाते अशी कादंबरीची कथा होती. रॉबर्ट्सनच्या या कादंबरीतील बोटीचं नाव होतं 'टिटॅन'!

खरी टायटॅनिक आणि रॉबर्टसनची टिटॅन यांच्या अपघाताची तुलना केली तर अनेक विस्मयकारक साम्यं आढळतात :-

दोन्ही बोटी आकाराने साधारणतः सारख्या होत्या.
दोन्ही बोटींना तीन-तीन प्रॉपेलर होते.
दोन्ही बोटींवर सर्व प्रवाशांना पुरेशा लाईफबोटी उपलब्ध नव्हत्या. (टायटॅनिक - १६, टिटॅन - २४)
दोन्ही बोटींच्या मालकांनी लवकरात लवकर अटलांटीक पार करण्याचा कॅप्टनला बजावून सांगितलं होतं.
दोन्ही बोटींचे अपघात एप्रिल महिन्यातच घडले.
दोन्ही बोटींचे अपघात इंग्लंडपासून सुमारे ४०० सागरी मैलांवरच घडले!
दोन्ही बोटींचा वेगही साधारण सारखाच होता (टायटॅनिक - २२ १/२ नॉट, टिटॅन - २५ नॉट)
दोन्ही बोटी पुढच्या बाजूनेच हिमनगाला धडकली.
दोन्ही बोटींवरील साधारणपणे १/३ लोकंच वाचले.
दोन्ही बोटींचे प्रॉपेलर्स हिमनगाला धडकल्यावर संरक्षक बेल्टमधून निसटल्याचा आवाज आला होता!

टायटॅनिकचा अपघात १९१२ साली झाला होता.
मॉर्गन रॉबर्टसनची 'द रेक ऑफ टिटॅन' ही कादंबरी १८९८ मध्ये प्रसिध्द झाली होती!

टायटॅनिकची संकल्पना कागदावर उतरवण्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या कादंबरीतील तपशील खर्‍या टायटॅनिकच्या अपघाताशी इतके हुबेहुब कसे जुळत होते?

पृत्थ्वीवरील सर्वच महासागरात गूढ आणि चमत्कारीक गोष्टी आढळून येतात. सर्वात गूढ आणि चमत्कारीक महासागर कोणता हे कसं ठरवायचं हा प्रश्नच आहे!

अटलांटीकचा एक भाग असलेला बर्म्युडा ट्रँगल सर्वात गूढ का पॅसिफीकमधला जपानजवळचा डेव्हील्स ट्रँगल?
मृतावस्थेतील खलाशी असलेली जहाजं घेऊन फिरणारा हिंदी महासागर का आर्क्टीक महासागर?
मानवाने सर्वप्रथम चाल केलेला भूमध्य समुद्र का ऑस्ट्रेलेशिया आणि अंटार्क्टीकाचा सागरही?

********

बर्म्युडा ट्रँगल आणि एकूणच जगभरातील सागरांत कोणताही मागमूस न ठेवता गडप होणार्‍या जहाजांच्या मागे नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत असाव्यात याविषयी अनेक सिध्दांत मांडले गेले आहेत -

मानवी चूक

सर्वात पहिला सिद्धांत म्हणजे नाहीशा झालेल्या जहाजांमागे मानवी चुका कारणीभूत आहेत! जहाजाचे कॅप्टन्स अथवा विमानाचे पायलट हे कितीही झालं तरी शेवटी माणसेच आहेत. त्यांच्याहातून शेवटच्या क्षणी झालेल्या चुकाच ही जहाजे अथवा विमाने नष्ट होण्यास कारणीभूत आहेत. मात्रं या दृष्टीने विचार केल्यास कोणताच पुरावा अथवा अवशेष शिल्लक का राहत नाहीत याचं उत्तर मात्रं मिळत नाही.

इलेक्ट्रोमॅग्नेटी़क क्षेत्र

काही शास्त्रज्ञांच्या मते अनेक ठिकाणी असलेलं वेगवेगळ्या क्षमतेचं विद्युत-चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटीक) क्षेत्रं हे जहाजं आणि विमानं नाहीसं होण्यामागचं प्रमुख कारण असावं. पृथ्वीचा आस हा कललेला असल्याने उत्तर आणि दक्षिण धृव आणि उत्तर आणि दक्षिण चुंबकीय धृव यात बर्‍याच अंतराचा फरक आहे. तसंच पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्रं स्थिर नसल्याने अचूक दिशादर्शनाच्या दृष्टीने जहाज अथवा विमान निघण्यापूर्वी कंपास योग्य दिशेला अ‍ॅडजेस्ट करणं हे अत्यंत महत्वाचं असतं.

गायब होण्यापूर्वी अनेक जहाजं आणि विमानं यांचे कंपास काम करत नसल्याचं तसंच भोवताली सर्वत्रं पांढर्‍या अथवा राखाडी रंगाचं वातावरण पसरल्याचे संदेश आलेले आहेत. हा इलेक्ट्रोमॅग्नेटीक क्षेत्रात अचानक पणे पडलेल्या फरकाचा परिणाम असावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हा फरक सहन करण्याची क्षमता नसलेली जहाजं अथवा विमानं लहान-लहान तुकडे होऊन नष्ट होतात असं हा सिध्दांत सांगतो. परंतु कोणतेही अवशेष का आढळून येत नाहीत हा प्रश्न उरतोच!

हवामानातील बदल

कोणतीही पूर्वसूचना न मिळता हवामानात आकस्मिकरीतीने झालेला बदल हे जहाजं आणि विमानं नष्ट होण्याचं प्रमुख कारण असावं असा एक सिद्धांत मांडला जातो. सागराच्या पोटात सतत हालचाली सुरू असतात. अनेक जागृत ज्वालामुखी समुद्रात अद्याप कार्यरत आहेत. या हालचालींमुळे समुद्रतळाशी अनेकदा भूकंप होत असतात. या भूकंपांमुळे प्रचंड मोठ्या उंचीच्या लाटा अचानकपणे उसळतात (२००४ मध्ये भारताच्या पूर्व किनार्‍यावर आलेली सुनामी हे अलीकडचं उदाहरण). या लाटांच्या तडाख्यात सापडलेली जहाजं काही क्षणात सागरतळाशी जातात. हवामानात अचानक घडणार्‍या बदलांमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादळांमुळे विमानांचाही नाश होतो असं हा सिद्धांत सांगतो.

पाण्याखालील प्रवाह

बर्म्युडा ट्रँगलच्या भागात सागरपृष्ठाखालून वाहणारा गल्फ स्ट्रीम हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. हा प्रवाह म्हणजे सागरपॄष्ठाखालून वाहणारी एक नदीच आहे जणू. असेच जलांतर्गत प्रवाह सर्वच महासागरात आढळून येतात. बंद पडलेली जहाजं या प्रवाहात सापडल्यास दूर अंतरापर्यंत वाहून जाऊ शकतात. अशा परिस्थितीत शेवटचा संदेश आलेल्या ठिकाणी कोणतेही अवशेष न सापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सागरपृष्ठाखालील शक्तीमान स्फटीक

एका सिद्धांतानुसार अत्यंत शक्तीमान असे स्फटीक समुद्राच्या तळाशी आहेत. सूर्यकिरणांमुळे प्रभारित होणारे हे स्फटीक उर्ध्वदिशेने अत्यंत तीव्र दाबाचे चुंबकीय क्षेत्र प्रक्षेपित करत असतात. या चुंबकीय क्षेत्राच आलेलं कोणतंही जहाज अथवा विमान सागरतळाच्या दिशेने खेचलं जातं. या सिद्धांतातील एक मोठी त्रुटी म्हणजे सागरतळाशी असलेल्या स्फटीकांपर्यंत सूर्यकिरण कसे पोहोचतात?

अंतराळातील चुंबकक्षेत्र

सागरपृष्ठावरील स्फटीकांच्या विरोधी सिद्धांत म्हणजे हरवलेली जहाजं आणि विमानं ही अवकाशात खेचली जाऊन नष्ट होतात! चुंबकीय क्षेत्रात झालेल्या अचानक फरकामुळे आणि त्याचवेळी बिघडलेल्या हवामानाचा संयुक्त परिणाम म्हणून ही जहाजं आणि विमानं हवेत खेचली जातात आणि काही कालावधीनंतर दूर अंतरावर जाऊन कोसळतात असं हा सिध्दांत सांगतो. कृष्णविवरांच्या जवळ जाणारा हा सिद्धांत आहे. मात्रं यानंतरही जिथे ही विमानं किंवा जहाजं कोसळतात तिथे त्यांचे अवशेष का आढळत नाहीत हा प्रश्न अनुत्तारीतच राहतो.

मिथेन वायूचे उत्सर्जन

एका सिद्धांतानुसार मिथेन वायुच्या प्रचंड मोठ्या प्रमाणातील बुडबुड्यांमुळे अनेक जहाजं आणि विमानं नाहीशी झाली आहेत. सागरतळावरील मिथेनच्या होणार्‍या अचानक उत्सर्जनामुळे पाण्याची घनता अचानक कमी होते. पाण्याच्या घनतेतील या बदलामुळे जहाजं पाण्यावर न तरंगता सागरतळाशी खेचली जातात. मिथेनच्या या उत्सर्जनाचा परिणाम विमानांवरही होऊन विमानं सागरतळाशी खेचली जातात.

मिथेनच्या उत्सर्जनामुळे लहानशी लाकडी होडी पाण्यात बुडू शकते हे प्रयोगशाळेत सिध्द झालं आहे. परंतु मोठ्या आकाराची वजनदार जहाजं बुडण्यामागे मिथेनचं उत्सर्जन प्रचंड प्रमाणात होणं आवश्यक आहे. पृत्थ्वीवरील सर्व महासागरांच्या तळाशी द्रवरुप मिथेन सापडत असला, तरी गेल्या काहीशे वर्षात मिथेनचं उत्सर्जन झाल्याची कोणतीही नोंद नाही. प्रयोगांअंती बर्म्युडा ट्रँगलमध्ये गेल्या १५००० वर्षांत मिथेन उत्सर्जन झालेलं नसल्याचं निष्पन्न झालं आहे.

उडत्या तबकड्या आणि एलियन्स

जहाजं आणि विमानं नाहीशी होण्यासंदर्भात उडत्या तबकड्यांचा विषय निघणं हे अपरिहार्य आहे. गेल्या सुमारे १०० वर्षांपासून जगभरात अनेकांना त्यांचं दर्शन झालं आहे. क्वचितप्रसंगी त्यांनी विमानं नष्ट केली आहेत. युध्दकाळात प्रत्येक पक्षाला ते प्रतिपक्षाचं अस्त्रं वाटत असलं तरी युध्दसमाप्तीनंतर प्रत्यक्षात हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचं समोर आलं आहे. या तबकड्यांचं अस्तित्वच कधी कधी नाकारलं जात असलं तरीही त्या अद्यापही दृष्टीस पडतात हे सत्य आहे.

अनेक शास्त्रज्ञांच्या सिद्धांतानुसार या उडत्या तबकड्या या आपल्याला अज्ञात असलेल्या अंतराळातील संस्कृतीची आपल्यावर टेहळणी करण्यासाठी पाठवलेली यानं आहेत. मानवी प्रगतीवर बारीक लक्षं ठेवणार्‍या अंतराळातील संस्कृती आपली प्रगती जाणून घेण्यासाठी अधून-मधून जहाजं अथवा विमानं गायब करत असतात.

काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवरच पण सागरतळाशी अत्यंत पुढारलेल्या संस्कृती अस्तित्वात आहेत. या संस्कृती आपल्यावर नजर ठेवून आहेत. ही नुसतीच कल्पना आहे का यात सत्यांश आहे? फ्लोरीडाजवळ समुद्रात एका संपूर्ण शहराचे अवशेष आढळून आले आहेत. बिमिनी जवळ सागरात आढळून आलेले व्यवस्थित बांधलेले रस्ते आणि घरं हे कशाचं निदर्शक आहे?

चतुर्थ मिती

आपल्याला माहीत असलेल्या त्रिमीती म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची. आपल्याला ज्ञात असलेल्या सर्व गोष्टी या त्रिमितीत बसतात. एका सिध्दांतानुसार या तीन मितींहूनही एक वेगळी अशी चौथी मिती अस्तित्वात आहे. अचानक गायब झालेली जहाजं आणि विमानं आणि त्यावरील माणसं ही या चतुर्थ मितीत गेली आहेत. त्यामुळे ती डोळ्यांना दिसू शकत नाहीत! एकदा या चतुर्थ मितीत प्रवेश केल्यावर परतीचा मार्ग न सापडल्याने पुन्हा दृष्य स्वरुपात येणं अशक्यं होतं. हा केवळ एक सिद्धांत असला तरी ही शक्यता नाकारता येत नाही.

अटलांटीस

शास्त्रज्ञांच्या मते प्राचीन काळी युरोप आणि अमेरीकेच्या मध्ये, अटलांटीक महासागरात आणखीन एक खंड अस्तित्वात होता. ऑस्ट्रेलियाप्रमाणे चारी बाजूने सागराने वेढलेला हा खंड अथवा भूभाग म्हणजेच अटलांटीस! अटलांटीसचा उल्लेख प्लेटोच्या लिखाणातही आढळतो. प्लेटोच्या नोंदीनुसार इसवी सनपूर्व ९६०० च्या सुमारास अटलांटीसची संस्कृती तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन ग्रीक संस्कृतीपेक्षाही पुढारलेली होती. काही कालावधीनंतर अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात अटलांटीसचा भूभाग सागरतळाशी गेला तरी ही संस्कृती नष्ट झाली नसावी, कारण पाण्यात अतिउच्च दाबाखाली टिकून राहण्याचं तंत्रज्ञान अटलांटीसच्य रहिवाश्यांनी विकसीत केलं होतं!

सोनार यंत्रणेद्वारा अटलांटीक महासागरात शोध घेतला असता अटलांटीकच्या मध्यावर आढळणार्‍या पर्वतराजीचा अपवाद वगळता कोणतंही बांधकाम आढळून येत नाही. परंतु अटलांटीसची संस्कृती पाण्याखाली टिकून राहण्याइतकी प्रगत असेल तर सोनार यंत्रणेपासून स्वतःचा बचाव करण्याचं तंत्रज्ञात विकसीत करणं त्यांना अशक्यं होतं का? अर्थात अटलांटीसच्या ऐतिहासीक अस्तित्वाचा निर्विवाद पुराव समोर येईपर्यंत हा केवळ एक सिद्धांतच आहे.

या सर्व सिद्धांतांचा तौलानिक विचार केला तर एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे आपल्याला अज्ञात संस्कृती कुठेतरी निश्चीतच अस्तित्वात आहेत आणि त्या आपल्यावर लक्षं ठेवून आहेत!

संदर्भ :-

Bermuda Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
Atlantis - चार्ल्स बार्लीत्झ
Devils Triangle - रिचर्ड वायनर
From Devils Triangle to Devils Jaw - रिचर्ड वायनर
Ghost Ships - रिचर्ड वायनर
Without Trace: the Last Voyages of Eight Ships - जॉन हॅरीस
Invisible Horizons - व्हिन्सेंट गॅडीस
Strangest of All - फ्रँक एडवर्डस
The Case For the UFO - मॉरीस जेसप

इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवरील अमुल्य माहीती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel