नोव्हेंबरचा महीना सुरु होता. थँक्सगिव्हींच्या सुटीचा आदला दिवस. अमेरीकेतील पोर्टलँड इथल्या विमानतळावर एक विमान सिएटल इथे जाण्यासाठी निघण्याच्या तयारीत होतं. नॉर्थवेस्ट ओरीएंट एअरलाईन्सच्या बोईंग ७२७-१०० प्रकाराच्या या विमानाला पोर्टलँड इथून सिएटल इथे जाण्यास साधारणतः अर्धा तास लागणार होता. आपल्या वेळेनुसार दुपारी २.५० वाजता पोर्टलँड विमानतळावरुन या विमानाने टेक् ऑफ घेतला. विमानात एकूण ३७ प्रवासी आणि पायलट-कोपायलट सह ६ कर्मचारी होते.

विमानाने टेक् ऑफ घेतल्यावर १८ सी या क्रमांकावरील प्रवाशाने सिगारेट पेटवली (त्यावेळी विमानात धूम्रपानास मनाई नव्हती). एअरहोस्टेसकडे त्याने बॉरबॉन आणि सोड्याची मागणी केली. चाळीशीच्या आसपासचा हा प्रवासी सुमारे ६ फूट उंच होता. काळ्या रंगाचा सूट, पांढरा शुभ्र शर्ट आणि वर रेनकोट, काळ्या रंगाचा टाय असा पोशाख त्याने परिधान केला होता. टायला विशिष्ट शिंपल्यापासून तयार केलेली टायपिन लावलेली होती. पायात काळे बूट होते.

एअर होस्टेस फ्लॉरेन्स शॉफनरने त्याला बॉरबॉन आणि सोडा आणून दिला. काही घोट घेतल्यावर त्याने आपल्याजवळची एक चिठ्ठी तिच्या हातात सरकवली. शॉफनरला ह्यात विशेष असं काही वाटलं नाही. एखादा एकटा बिझनेसमन डेट साठी आपला फोन नंबर चिठ्ठीवर लिहून देत असल्याचा तिला पूर्वानुभव होता! स्वतःशीच हसत तिने ती चिठी उघडून न पाहता आपल्या पर्समध्ये टाकून दिली. तो प्रवासी हलकेच पुढे झुकला आणि उद्गारला,

"ती चिठ्ठी उघडून पाहीलीस तर फार बरं होईल! माझ्या ब्रिफकेसमध्ये बाँब आहे!"

अमेरीकेच्या इतिहासातील अत्यंत गाजलेल्या आणि गूढ विमान अपहरण नाट्याची ही सुरवात होती. त्या दिवशी तारीख होती २४ नोव्हेंबर १९७१!

सिएटल विमानतळावर विमानात चढण्यापूर्वी तिकीट विकत घेताना त्याने आपलं नाव दिलं होतं

डॅन कूपर!

हादरलेल्या शॉफनरने चिठ्ठी उघडून पाहीली. चिठ्ठीत लिहीलं होतं,
"माझ्याजव़ळच्या ब्रिफकेसमध्ये बाँब आहे. गरज पडल्यास मी त्याचा वापर करेन! माझ्या शेजारी येऊन बस! यू आर् बिइंग हायजॅक्ड्!"

शॉफनर शांतपणे कूपरशेजारी येऊन बसली. कूपरने आपली ब्रिफकेस थोडीशी उघडली. आतमध्ये लाल रंगाचे आठ सिलेंडर एकावर एक चार-चार असे ठेवलेले होते! हे सिलेंडर्स लाल रंगाच्या वायरने एका मोठ्या बॅटरीला जोडले होते. ब्रिफकेस बंद करुन कूपरने आपल्या मागण्या पायलटला कळवण्याची शॉफनरला सूचना केली.

"मला दोन लाख अमेरीकन डॉलर्स हवेत. ते देखील वापरलेल्या नोटांच्या स्वरुपात. तसंच चार पॅराशूट्सही हवीत. सिएटल विमानतळावर विमानात पुन्हा इंधन भरण्यासाठी एक ट्रकही तयार ठेवा!"

शॉफनरने कॉकपीटमध्ये जाऊन विमानाचा पायलट विल्यम स्कॉट याला या सर्व प्रकाराची कल्पना दिली. ती परत कूपरपाशी आली तेव्हा तो काळ्या काचांचा मोठा गॉगल लावून बसला होता!

कॅप्टन स्कॉटने ताबडतोब सिएटल विमानतळाशी संपर्क साधला. ताबडतोब ही बातमी पोलीसांना आणि एफ. बी. आय्. ला कळवण्यात आली. विमानातील प्रवाशांचा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे सिएटल इथे पोहोचण्यास उशीर होतील असं कळवण्यात आलं. दरम्यानच्या काळात ही बातमी नॉर्थवेस्ट ओरीएंट एअरलाईन्सचा अध्यक्ष डोनाल्ड न्य्रॉप याला कळवण्यात आली. कूपरच्या मागणीनुसार पैशांची व्यवस्था करण्यास त्याने ताबडतोब होकार दिला. विमानातील सर्व कर्मचार्‍यांना कूपरला सहकार्य करण्याची त्याने सूचना केली. दोन लाख डॉलर्सपेक्षा विमानातील उरलेल्या ३६ प्रवाशांचे आणि ६ कर्मचार्‍यांचे प्राण जास्त मौल्यवान होते.

सिएटल पोलीस आणि एफ. बी. आय. यांनी कूपरच्या मागणीनुसार पैसे आणि पॅराशूटची व्यवस्था करेपर्यंत दोन तास विमान प्युजो साऊंड या खाडीवर घिरट्या घालत होतं!

एफ. बी. आय. च्या एजंटनी वीस डॉलरच्या दहा हजार नोटा जमवून त्यांचं एक बंडल तयार केलं. त्यापूर्वी या सर्व नोटांचे सिरीयल नंबर मायक्रोफिल्मवर टिपून ठेवण्यात आलेले होते. यापैकी बर्‍याच नोटा या एल या अक्षराने सुरु होणार्‍या आणि १९६९-सी या मालिकेतील होत्या. या नोटा फेडरल रिझर्व बँकेच्या सॅन फ्रान्सिस्को बँकेतून आणण्यात आल्या होत्या. सर्व व्यवस्था झाल्यावर पायलट स्कॉटने ही माहीती कूपरला दिली. परंतु मिलीटरीसाठी बनवण्यात आलेली पॅराशूट्स स्वीकारण्यास कूपरने नकार दिला आणि साध्या नागरी पॅराशूट्सची मागणी केली. या पॅराशूट्सना हाताने ओढण्याची रिपकॉर्ड असावी अशी त्याची अट होती.

(रिपकॉर्ड ही पॅराशूट उघडण्यासाठी वापरली जाते. विमान अथवा हेलीकॉप्टरमधून हवेत उडी मारल्यावर रिपकॉर्ड ओढली जात नाही तो पर्यंत पॅराशूट उघडत नाही!)

कूपरच्या मागणीनुसार एका स्कायडायव्हींगचं प्रशिक्षण देणार्‍या संस्थेतून नागरी वापरातील पॅराशूट्सची व्यवस्था करण्यात आली. सर्व तयारी झाल्यानंतर संध्याकाळी ५.२५ मिनीटांनी सिएटल इथे विमान उतरवण्यास कूपरने परवानगी दिली. ५.४० मिनीटांनी पायलट स्कॉटने विमान रनवे वर उतरवलं.

विमान रनवेवर उतरताच कूपरने विमान रनवेच्या एका टोकाला झगझगीत प्रकाशाने उजळलेल्या भागाकडे नेण्याची सूचना केली.

"विमानातील सर्व लाईट्स बंद कर!" कूपरने स्कॉटला बजावलं, "दबा धरुन बसलेल्या एखाद्या पोलीस स्नायपरच्या गोळीला बळी पडण्याची माझी इच्छा नाही!"

नॉर्थवेस्ट ओरीएंटचा सिएटल इथला अधिकारी अ‍ॅल ली याने कूपरच्या सूचनेनुसार पैसे असलेली बॅग आणि पॅराशूट्स विमानाच्या मागच्या भागात असलेल्या शिडीवरुन एअर होस्टेस टीना मॅक्लॉव हिच्या ताब्यात दिली. पैसे आणि पॅराशूट्स ताब्यात येताच कूपरने सर्व प्रवासी, शॉफनर आणि फ्लाईट अटेंडंट अ‍ॅलीस हॅन्कॉक यांना विमानातून उतरण्यास परवानगी दिली.

Seattle
सिएटल विमानतळावरील नॉर्थवेस्टचे विमान

विमानातील सर्व प्रवासी आणि शॉफनर-हेन्कॉक सुखरुपपणे उतरुन गेले. विमानात इंधन भरण्याचं काम सुरु असताना ट्रकच्या पंपमध्ये इंधनाची वाफ अडकल्यामुळे विमानात इंधन भरलं जाईना! कूपरला या प्रकरणात काही काळंबेरं असल्याचा संशय आला, परंतु त्याने दुसरा ट्रक आणण्यास परवानगी दिली. तो ट्रक रिकामा झाल्यावर तिसर्‍या ट्रकमधलं इंधनही विमानात भरण्यात आलं.

विमानात इंधन भरुन होताच कूपरने आपली पुढली योजना पायलट स्कॉट आणि कोपायलट विल्यम रत्झॅक यांच्यापुढे मांडली.

"ईशान्य दिशेला मेक्सिको सीटीच्या दिशेने विमान आकाशात बंद पडणार नाही इतक्या कमीत कमी वेगाने जास्तीत जास्त १०००० फूट उंचीवरुन उड्डाण करा. विमानाचा लँडींग गिअर (विमान उतरण्याची यंत्रणा) टेक ऑफ घेतल्यानंतरही सुरु ठेवा. विमानाच्या पंखांचे फ्लॅप्स १५ अंशाच्या कोनात असूदेत. सर्वात महत्वाचं, विमानात हवेचा दाब ठेवू नका!"

(विमान हवेत उंचावर गेल्यावर हवा विरळ होत असल्याने विमानात हवेचा दाब वाढवण्यात येतो जेणेकरुन ऑक्सीजनचं प्रमाण योग्य रहावं).

"परंतु, या उंचीवरुन आणि इतक्या कमी वेगाने - सुमारे १२० मैलाच्या वेगाने गेलो तर विमान फक्तं हजार मैलच जाऊ शकेल!" कोपायलट रत्झॅक म्हणाला, "मेक्सिको सीटीला पोहोचण्यापूर्वी आपल्याला पुन्हा इंधन भरुन घ्यावं लागेल!"
"ठीक आहे! आपण नेवाडात रेनो इथे पुन्हा इंधन भरुन घेऊ!" कूपरने उत्तर दिलं, "पण विमान टेक् ऑफ घेण्यापूर्वी विमानाच्या मागचं दार उघडं ठेवा आणि शिडी खाली सोडून ठेवा!"
"असं करता येणार नाही! हे टेक् ऑफसाठी धोकादायक आहे!"
"यात कोणताही धोका नाही!" कूपर ठामपणे म्हणाला, "पण एनी वे, मी ते करेन योग्य वेळी!"

७.४० ला विमानाने पुन्हा टेक् ऑफ घेतला आणि मेक्सिको सीटीच्या दिशेने प्रयाण केलं. पायलट आणि कोपायलट व्यतिरिक्त विमानाचा इंजिनियर अँडरसन आणि एअर होस्टेस टीना मॅक्लॉव विमानात होते. विमानाने टेक् ऑफ घेताच कूपरने मॅक्लॉवला कॉकपीट मध्ये जाऊन बसण्याची आणि दार बंद करुन घेण्याची सूचना केली. कॉकपीटमध्ये शिरुन दार लावून घेण्यापूर्वी मॅक्लॉवने सहज मागे नजर टाकली तेव्हा कूपर आपल्या कंबरेभोवती काहीतरी गुंडाळत असल्याचं तिच्या नजरेस पडलं!

मॅक्लॉवला कूपरचं झालेलं हे शेवटचं दर्शन!

मॅक्कॉर्ड एअरफोर्स बेसवरून दोन एफ-१०६ जातीची फायटर विमानं या विमानापाठोपाठ उडाली होती. कूपरच्या दृष्टीस पडणार नाही अशा बेताने विमानाच्या वरुन एक आणि खालून एक असा त्यांचा पाठलाग सुरु होता. लॉकहीड टी-३३ जातीचं आणखीन एक विमानही त्यांच्या जोडीला होतं, परंतु अपुर्‍या इंधनामुळे त्याला परत फिरावं लागलं होतं.

८ वाजण्याच्या सुमारास मागची शिडी खाली सरकवण्यात येत असल्याचं दर्शवणारा लाईट कॉकपीटमध्ये लागला. इंटरकॉमवरुन मदत करण्याच्या केलेल्या विनंतीला कूपरने ठाम नकार दिला. काही वेळातच विमानातील हवेचा दाब कमी झाल्याचं कॉकपीटमधील सर्वांच्या ध्यानात आलं. याच अर्थ सरळ होता..

विमानाचं मागचं दार उघडलं होतं!

८ वाजून १३ मिनीटांनी विमानाला पाठीमागच्या बाजूने एकदम जोरदार गचका बसला. अचानक बसलेल्या या हादर्‍यामुळे मागची बाजू एकदम वर उचलली गेली. विमानाचा बिघडलेला तोल सावरण्यासाठी स्कॉट आणि रत्झॅक यांना चांगलीच कसरत करावी लागली.

१०.१५ ला स्कॉट आणि रत्झॅक यांनी नेवाडातील रेनो विमानतळावर विमान उतरवलं. उतरवण्यापूर्वी स्कॉटने इंटरकॉमवरुन कूपरला रेनो इथे उतरत असल्याची सूचना दिली होती. परंतु कूपरचं काहीच उत्तर आलं नव्हतं!

रेनो इथे विमान उतरताच एफ. बी. आय. चे एजंट, नेवाडा स्टेट ट्रूपर्स, शेरीफ ऑफीसमधील डेप्युटी आणि रेनो पोलिसांच्या अधिकार्यांनी विमानाला वेढा घातला. कूपर अद्यापही विमानात असावा असा त्यांचा कयास होता. सावधपणे विमानाजवळ सरकत सर्वप्रथम स्कॉट, रत्झॅक, अँडरसन आणि मॅक्लॉव्ह यांना कॉकपीटमधून बाहेर काढण्यात आलं. विमानाची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आल्यावर सर्वजण चकीत झाले.

कूपरचा पत्ता नव्हता!

एफ. बी. आय. एजंटनी विमानाची कसून तपासणी केली. पैशांनी भरलेली हूकने अडकवण्याची बॅग आणि दोन पॅराशूट्स गायब होती. उरलेल्या दोन पॅराशूट्सपैकी एकाच्या दोर्या मोकळ्या करण्यात आलेल्या होत्या. विमानात वेगवेगळे ६६ हाताचे ठसे मिळून आले. कूपरचा काळ्या रंगाचा टाय आणि त्याची टाय-पिनही विमानात आढळून आली!

एफ. बी. आय. ने पोर्टलँड आणि रेनो इथे ज्यांचा कूपरशी प्रत्यक्ष संबंध आला होता त्यांच्याकडे तपशीलवार चौकशी केली. त्यावेळी अमेरीकन राजवटीला विरोध असलेल्या काही कम्युनिस्टांनी विमान अपहरणाचे प्रयत्न केलेले होते. हे कम्युनिस्ट बहुतेक वेळा विमान क्युबाला नेण्याचा हुकूम सोडत असंत. कधीकधी निर्ढावलेले गुन्हेगारही विमान अपहरणाचा प्रयत्न करत असत. परंतु शॉफनरच्या मते कूपर या सर्वांहून वेगळा होता. तो अत्यंत शांत आणि सुस्वभावी वाटत होता. बॉरबॉन आणि सोडा मागवल्यावर दोन्ही वेळा त्याने आठवणीने त्याचे पैसे दिले आणि वर शॉफनरला टीपही! इतकंच नव्हे तर सिएटल इथे विमान इंधन भरण्यासाठी थांबलेलं असताना सर्वांसाठी स्वतःच्या खर्चाने जेवण मागवण्याचीही त्याने तयारी दर्शवली होती!

"तो खूप शांत होता!" टीना मॅक्लॉव्ह म्हणते, "कोणताही आक्रस्तळेपणा त्याने केला नाही. अतिशय नम्रपणे आपल्या सगळ्या मागण्या त्याने मांडल्या होत्या! एक क्षणही तो अस्वस्थं किंवा नर्व्हस नव्हता!"

कूपरला सिएटल - टाकोमा परीसराची चांगली माहीती असावी असा शॉफनरचा तर्क होता. प्युजो साऊंड खाडीवर घिरट्या घालत असताना त्याने टाकोमा शहर अचूक ओळखलं होतं. तसंच अमेरीकन एअरफोर्सचा मॅक्कॉर्ड बेस हा सिएटल विमानतळापासून गाडीने वीस मिनीटावर आहे असंही त्याने शॉफनरला वर्णन केलं होतं! सिएटलहून रेनो इथे जाण्यासाठीचा मार्ग त्याने काळजीपूर्वक स्पष्ट केला होता!

रेनो इथे विमान उतरण्यापूर्वीच कूपर अदृष्य झाल्याच्या बातमीने एकच गोंधळ उडाला होता. या बातमीचं वृत पाठवताना वायरलेस ऑपरेटर क्लाईड जॅबीन याचा कूपरच्या नावासंदर्भात थोडासा घोटाळा झाला. आपल्या बातमीत त्याने कूपरचं नाव डॅन कूपर असं न पाठवता 'डी. बी. कूपर' असं पाठवलं. हे नाव तसंच प्रसिध्द झालं आणि इतर वृत्तसंस्थांनीही आपल्या बातमीपत्रात ते डी, बी. कूपर म्हणूनच वापरलं! जॅबीनच्या नजरचुकीमुळे डी. बी. कूपर जनमानसात इतकं पक्कं रुजलं की आजही हेच नाव प्रचलित आहे!

कूपरचं डॅन कूपर हे नाव बहुधा बेल्जीयन कॉमिक्समधून आलं असावं! या कॉमिक्समध्ये डॅन कूपर हा रॉयल कॅनेडीयन एअरफोर्सचा पायलट हिरो होता. अनेक प्रसंगात तो पॅराशूटने उडी मारतो असं चित्रीकरण करण्यात आलेलं होतं. ही कॉमिक्स इंग्रजीत भाषांतरीत झाली नव्हती, तसेच अमेरीकेत कधीही प्रदर्शित झाली नव्हती. कूपर युरोपच्या ट्रीपवर असताना त्याने हे कॉमिक्स वाचून त्यातलं नाव घेतलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला. एका तर्कानुसार कूपर मुळचा कॅनेडाचा असावा. कारण सर्वसामान्य अमेरीकन नागरीक कधीच 'प्रचलीत अमेरीकन चलन' (निगोशिएबल अमेरीकन करन्सी) असा स्पष्ट उल्लेख कधीच करत नाहीत!

Comix
कूपर कॉमिक्स

एफ. बी. आय. ने कूपरचा शोध घेण्याच्या दृष्टीने मोहीम आखण्यास सुरवात केली. कूपरने विमानातून नेमकी कधी आणि कुठे उडी मारली हा शोध घेणं सर्वप्रथम अत्यावश्यक होतं. ज्या मार्गाने सिएटलहून रेनोला विमान आलं होतं, त्या मार्गाचा विचार करता विमानाचा वेग आणि त्यावेळचं हवामान याचा अंदाज बांधण्यात जराशी चूक झाली असती, तरी सहजच शंभर-दीडशे मैलांचा फरक पडू शकत होता.

दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की कूपरने विमानातून उडी मारल्यावर पॅराशूट उघडेपर्यंत किती वेळ गेला होता?

विमानातून बाहेर पडल्यावर काही काळ सरळ खाली आल्यावर त्याने पॅराशूट उघडलं असतं तर तो ज्या भागात उतरला असता तो भाग बाहेर पडल्या-पडल्या पॅराशूट उघडल्यास उतरलेल्या भागापासून दूर असण्याची शक्यता होती. कूपरच्या विमानाच्या वर आणि खाली उडत असलेल्या फायटर विमानाच्या पायलट्सना हवेत पॅराशूट दिसल्याची कोणतीच नोंद नव्हती. त्यांना रडारवरही काही दिसून आलं नव्हतं. अर्थात रात्रं अंधारी होती, दृष्यमानता अगदीच मर्यादीत होती, आणि ढगांआड आवरणामुळे जमिनीवरील कोणताही लाईट दिसून येत नव्हता. अशा परिस्थितीत नखशिखांत काळा पोशाख घातलेला कूपर त्यांना दिसण्याची शक्यता फार कमी होती. या दोन्ही विमानांच्या पायलट्सनी कॅप्टन स्कॉटशी कोणत्याही रेडीओ कॉन्टॅक्ट प्रस्थापित केला नव्हता, त्यामुळे कूपर नेमका विमानातून कधी बाह्रेर पडला याची त्यांना माहीती असण्याची शक्यताच नव्हती.

एफ. बी. आय. ने कूपरशी ज्यांचा संबध आला होता त्यांच्या मदतीने त्याचं रेखाचित्रं बनवलं. शॉफनर आणि मॅक्लॉव्ह दोघींच्या अनुमानानुसार तो सहा फुटाच्या आसपास उंच होता. तसंच तो चाळीशीच्या आसपास असावा आणि त्याचं वजन सुमारे ७५ ते ८० किलोच्या दरम्यान असावं असा त्यांचा अंदाज होता. त्याचे डोळे गदत तपकीरी रंगाचे होतं असंही त्यांनी सांगितलं!

Cooper
एफ. बी. आय. ने बनवलेलं कूपरचं रेखाचित्र

एफ. बी. आय. ने एक प्रयोग करुन कूपरने विमानातून उडी मारल्याची नेमकी जागा निश्चीत करण्याचा प्रयत्न केला. दुसर्या एका ७२७-१०० विमानातून स्कॉटच्या सिएटल ते रेनो या उड्डाणमार्गावर सुमारे ९० किलो वजनाचं एक धूड मागच्या दरवाजातून हवेत फेकण्यात आलं. हे वजन बाहेर टाकताच स्कॉटच्या विमानाला बसलेला तसाच हादरा बसला आणि मागची बाजूही वर उचलली गेली. कूपरने बरोबर ८.१३ ला उडी मारली असा यातून निष्कर्ष काढण्यात आला. या वेळी विमान वॉशिंग्टनच्या नैऋत्य भागातून लुईस नदीच्या परिसरात भर वादळातून जात होतं.

सेंट हेलेन्स पर्वतराजीच्या दक्षिणेच्या टोकाला लुईस नदीवर असलेल्या धरणामुळे तयार झालेल्या मर्विन लेकच्या परीसरात कूपर उतरला असावा असा कयास होता. वॉशिंग्टनमधल्या एरियल शहराच्या ईशान्येला असलेल्या या प्रदेशात एफ. बी. आय. आणि क्लार्क आणि कॉवित्झ काऊंटीच्या शेरीफनी या परीसरात कसून शोध घेण्यास सुरवात केली. या प्रदेशातील पर्वतराजी आणि जंगलातील बर्‍याच विस्तृत प्रदेशात पायी आणि हेलीकॉप्टरच्या सहाय्याने तपाससत्र सुरु झालं. या परीसरातील प्रत्येक घरातही चौकशी करण्यात आली. मर्विन लेकला लागून असलेल्या येल लेकच्या परीसरातही कूपरचा शोध सुरु झाला.

एफ. बी. आय. ने विमानं आणि हेलीकॉप्टर्सनी ओरेगॉन नॅशनल गार्डच्या मदतीने विमानाच्या संपूर्ण मार्गावर कूपरचा शोध घेण्यास सुरवात केली. अनेक मोडलेल्या झाडांचे शेंडे आणि प्लास्टीकचे तुकडे - थोडक्यात पॅराशूटच्या छत्रीप्रमाणे दिसणारा प्रत्येक आकार तपासून पाहण्यात आला.

कूपरच्या शोधाचं सत्रं १९७२ मध्येही सुरु राहीलं. एफ. बी. आय. आणि दोनशे सैनिक, एअरफोर्सचे अधिकारी, नॅशनल गार्ड, क्लार्क आणि कॉवित्झ काऊंटीचे शेरीफ डेप्युटीज आणि स्वयंसेवी नागरीक यांनी मार्च आणि एप्रिल मध्ये मिळून ३६ दिवस क्लार्क आणि कॉवित्झ काऊंटीचा प्रदेश चाळून काढला. मर्विन लेकच्या तळाशी पाणबुडीतूनही शोध घेण्यात आला! हे शोधकार्य सुरू असतानाच एक हाडांचा सापळा आढळला, परंतु तो काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या एका तरुणीचा असल्याचं निष्पन्न झालं!

या प्रचंड शोधसत्रातून काहीही निष्पन्नं झालं नाही!

कूपर, त्याचं पॅराशूट अथवा दोन लाख डॉलर्सपैकी एक छदामही दृष्टीस पडला नाही!

कूपर ज्या भागात पॅराशूटने उतरला असाव असं गृहीत धरुन तपास करण्यात आला तो साफ चुकीचा होता असं नंतर ध्यानात आलं! कूपरने विमान फक्त १०००० फूट उंचीवरुन नेण्याची सूचना केलेली असल्यामुळे कॅप्टन स्कॉटला विमान ऑटो-पायलटवर ठेवता आलं नव्हतं. आपल्या विमानाचा मार्ग प्रत्यक्षात बराच पूर्वेकडून असल्याचं स्कॉटच्या ध्यानात आलं. कॉन्टीनेंटलचा पायलट टॉम बोहॅन कूपरच्या विमानापाठोपाठ पाच मिनीटांच्या अंतराने येत होता. त्याच्या मतानुसार वार्‍याची दिशा ध्यानात घेता कूपर जिथे उतरला असण्याची शक्यता होती ती जागा शोध घेतलेल्या जागेच्या ईशान्य दिशेच्या आसपास किमान ८० अंशाच्या कोनात असावी!
वॉशगल नदीच्या प्रवाहाच्या परीसरात कूपर पोहोचला असावा असा बोहॅनचा कयास होता.

पुन्हा एकदा या नवीन प्रदेशात शोधसत्रं सुरु झालं! परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. कूपर हवेत विरुन गेल्यासारखा अदृष्य झाला होता!

१९७१ च्या डिसेंबर महिन्यातच एफ. बी. आय. ने कूपरला देण्यात आलेल्या पैशांचे नंबर प्रमुख बँका, कॅसीनो, रेस ट्रॅक्स आणि रोख पैशात व्यवहार करणार्या सर्व व्यवस्थापनांना आणि देशोदेशीच्या पोलीस आणि गुप्तहेर खात्यांना कळवले होते. नॉर्थवेस्ट ओरीएंट कंपनीने परत मिळालेल्या पैशातील १५% पैसे बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली! १९७२ साली नोटांचे नंबर जनतेसाठी खुले करण्यात आले. या नंबरांचा वापर करुन दोन ठगांनी वीस डॉलरची एक नकली नोट बनवली! ही नोट दाखवून त्या दोघांनी न्यूजवीक चा रिपोर्टर कार्ल फ्लेमींग याला विमान अपहरण करणार्‍याशी भेट करुन देण्याच्या मिषाने तीस हजार डॉलर्सचा चुना लावण्याचा प्रयत्न केला, परंतु फ्लेमींगने थेट एफ. बी. आय. ला कळवल्याने ही योजना त्यांच्यावरच उलटली.

पोर्टलँड इथल्या कोर्टाने भविष्यात कधीही कूपर पकडला गेल्यास त्याच्यावर खटला चालवण्यात यावा असा आदेश दिला!

कूपरचा कुठेही तपास लागला नाही! त्याला देण्यात आलेले दोन लाख डॉलर्स आणि पॅराशूट्स यांच्यासह तो जणू हवेत विरुन गेला होता!

सात वर्षांनंतर....

१९७८ मध्ये हरिणांच्या शिकारीसाठी गेलेल्या एका शिकार्याला ७२७ विमानाचं मागचं दार उघडून शिडी खाली सरकवण्यासंबंधी सूचना देणारं एक कार्ड सापडलं! एका कँपजवळ हे कार्ड सापडलं होतं! कार्ड सापडलेली जागा मर्विन लेकच्या उत्तरेला कॅसल रॉकपासून सुमारे १३ मैलांवर होती. कूपरने जिथे उडी मारली असावी अस अंदाज होता त्याच्या बर्याच उत्तरेच्या दिशेला हे कार्ड सापडलं असलं तरी ते विमानाच्या मूळ मार्गात होतं!

१९८० च्या फेब्रुवारीत एका प्रायव्हेट बीचवर एक कुटुंब सुटीसाठी कँप उभारण्यात मग्नं होतं. हा प्रायव्हेट बीच कोलंबिया नदीवर वॉशींग्टनमधील व्हॅन्कूव्हर इथून नऊ मैलांवर होता. डोंगराच्या पायथ्याच्या दिशेने वाहणार्या नदीच्या प्रवाहाच्या काठावर असलेला हा लहानसा बीच अल्बर्ट आणि रिचर्ड फॅझीओ यांच्या मालकीचा होता. या कुटुंबाला कँपींगसाठी त्यांनी परवानगी दिली होती.

या कुटुंबातील ब्रायन इन्ग्रॅम हा आठ वर्षांचा मुलगा कँपफायरसाठी नदीच्या काठी खड्डा खणण्यात मग्न होता. खड्डा खणत असताना सापडलेल्या एका गोष्टीने त्याचं लक्षं वेधून घेतलं. वाळूत पुरली गेलेली तीन पॅकेट्स तिथे पडलेली होती. इन्ग्रॅम कुटुंबियांनी ही पॅकेट्स उघडून पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

वीस डॉलर्सच्या नोटांची बंडलं!

हा अकल्पित प्रकार पाहून थक्कं झालेल्या इन्ग्रॅम कुटुंबाने ताबडतोब ही बातमी एफ. बी. आय. ला कळवली. एफ. बी. आय. च्या एजंटांनी ताबडतोब तपासाला सुरवात केली. फॅझीओ बंधूंना या प्रकाराची गंधवार्ताही नव्हती! त्यांनी एफ. बी. आय. ला पूर्ण सहकार्य दिलं सगळ्या बीचवरची वाळू खोल उकरुन पाहण्यात आली परंतु त्या तीन पॅकेट्स व्यतिरीक्त काही आढळून आलं नाही.

एफ. बी. आय. ने ती बंडलं काळजीपूर्वक तपासली. तीन बंडलांपैकी दोन बंडलांमध्ये १००-१०० नोटा तर तिसर्‍या बंडलात ९० नोटा असे एकूण ५८०० डॉलर्स मिळून आले. नोटांचे नंबर पडताळून पाहिल्यावर एफ. बी. आय. ला आलेला संशय खरा ठरला.

हे पैसे कूपरला देण्यात आलेल्या पैशांपैकी होते!

CooperMoney
ब्रायन इन्ग्रॅमला सापडलेल्या नोटा

१९८१ मध्ये आणखीन पुराव्याचा शोध सुरु असताना कोलंबिया नदीच्या पात्रातून एक कवटी सापडली! परंतु ही कवटी एका स्त्रीची असल्याचं निष्पन्न झालं. १९८८ मध्ये जिथे कवटी सापडली होती त्याच भागातून एका पॅराशूटचे अवशेष मिळाले, परंतु हे कूपरला देण्यात आलेल्या पॅराशूट्सपैकी नव्हतं. २००८ मध्ये अॅम्बॉयजवळ आणखी एक पॅराशूट सापडलं, परंतु हे पॅराशूट दुसर्या महायुध्दातील असल्याचं निष्पन्न झालं.

२००७ मध्ये एफ. बी. आय. कूपरच्या टाय-पिनवरुन डी. एन. ए. सँपल मिळवण्यात यशस्वी झाले. त्याचवेळी डॅन कूपर या नावाने विकत घेण्यात आलेलं पोर्टलँड ते सिएटल हे २० डॉलर्सचं तिकीटही सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलं. कूपरने वापरलेल्या दोन पैकी जुनं पॅराशूट उडी मारण्यासाठी वापरलं असंही एफ. बी. आय. ने स्पष्ट केलं. कूपरला देण्यात आलेल्या चार पॅराशूट्सपैकी एका पॅराशूटच्या दोर्‍यांचा उपयोग त्याने पैशाची बॅग आपल्या पाठीशी बांधण्यास केला असावा असा एफ. बी. आय. चा अंदाज होता. (टीना मॅक्लॉव्हने कूपरला आपल्या कंबरेभोवती काहीतरी गुंडाळताना पाहीलं होतं).

डॅन कूपरने विमानातून उडी टाकल्यावर त्याचं नेमकं काय झालं आणि डॅन कूपर नेमका कोण होता यावर अनेक तर्क-वितर्क मांडण्यात आले.

एफ. बी. आय. च्या अधिकार्‍यांचा कूपर पूर्वी एअरफोर्समध्ये पायलट अथवा पॅराट्रूपर असावा असा कयास होता. अमेरीकन एअरफोर्सचा मॅक्कॉर्ड बेस हा सिएटल विमानतळापासून गाडीने वीस मिनीटावर आहे असं त्याने शॉफनरला सांगितलं होतं. सामान्य नागरीकांना ही माहीती असण्याची शक्यता फारच कमी होती. कूपरला ७२७-१०० विमानाच्या रचनेची संपूर्ण कल्पना होती. विमानाची इंजिनं पुढच्या भागात आणि खाली असल्यामुळे बाहेर पडताना इंजिनातून हवेचा जोरदार झोत आपल्यावर फेकला जाणार नाही हे त्याला ठाऊक होतं. विमान कमी उंचीवरुन संथ गतीने मार्ग काढू शकेल आणि कॉकपीटमध्ये न जाता विमानाची उंची आणि वेगावर नियंत्रण ठेवता येतं याची त्याला कल्पना होती. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला असलेली शिडी विमान हवेत असतानाही केवळ एका स्विचचा वापर करुन खाली सोडता येते ही गोष्ट त्याला ठाऊक होती! कोणत्याही युध्दात भाग घेतलेल्या पायलटशिवाय अथवा पॅराट्रूपरशिवाय दुसर्या कोणाला हे माहीत असण्याची शक्यता नव्हती! सी.आय.ए. ने व्हिएतनाम युध्दात पॅराट्रूपर्सना उतरवण्यासाठी या तंत्राचा आणि विमानाचा वापर केला होता.

काही एफ.बी.आय. अधिकार्‍यांच्या मते कूपर पायलट अथवा पॅराट्र्पर नसून विमानात सामान चढवणारा कर्मचारी (कार्गो लोडर) किंवा मेकॅनिक होता. सामान चढवणार्‍या कर्मचार्यांना विमानातून उडी मारण्यासाठी इमर्जन्सी पॅराशूट वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येत असे,

कूपरने मुद्दामच चार पॅराशूट्स मागवली होती असा एफ. बी. आय. अधिकार्‍यांचा तर्क होता. 'आपल्याबरोबर ओलीस ठेवलेल्या एखाद्या कर्मचार्‍याला पॅराशूटने उडी मारण्यास भाग पाडण्याचा त्याचा इरादा आहे' अशी एफ. बी. आय. ची समजूत व्हावी असा त्याचा हेतू होता. हि समजूत झाल्यामुळे एफ. बी. आय. आपल्याला सुस्थितीतली पॅराशूट्स देतील असा त्याचा कयास होता. हा कयास अचूक असला तरी चारपैकी एक पॅराशूट न वापरता येण्यासारखं होतं!

कूपरला ७२७-१०० विमानाची चांगली माहीती होती याबद्दल एफ. बी. आय. ला कोणतीही शंका नव्हती, परंतु तो पॅराट्रूपर नसावा असं ठाम प्रतिपादन लॅरी कारने केलं होतं. ज्या वेळेस कूपर विमानाबाहेर पडला होता तेव्हा जोरदार पाऊस आणि वादळ सुरु होतं. कारच्या मते कोणत्याही अनुभवी पॅराट्रूपरने उडी मारण्यासाठी ही वेळ निवडली नसती! १०००० फूट उंचीवर २०० मैलांच्या वेगाने वारे वाहत असताना गडद अंधारात पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणं हा निव्वळ आत्मघात होता. त्यातच कूपरच्या पॅराशूटची रिझर्व रिपकॉर्ड ट्रेनिंगसाठी असल्याने वापरता येणं शक्यं नव्हतं. कूपरचा कोट आणि पायातले साधे बूट थंडीपासून बचावासाठी निव्वळ अपुरे होते. मात्रं कूपरने दोन पॅराशूट्स वापरली होती याकडे कारने काणाडोळा केला होता.

एफ. बी. आय. च्या अधिकार्‍यांनी कूपरने विमानाबाहेर उडी मारल्यावर त्यातच त्याचा मृत्यू झाला असं ठाम प्रतिपादन केलं! कदाचित कूपर वाचला असलाच तरीही तो जंगलाच्या इतक्या ओसाड भागात उतरला असावा, की तिथून एकट्याने सुरक्षित बचावून पैशांच्या थैलीसह मुक्कामाला पोहोचणं निव्वळ अशक्यं होतं. कूपरचा एखादा साथीदार त्याची वाट पाहत असण्याची शक्यता होती, परंतु अशा परिस्थितीत नेमक्या जागी विमानातून उडी मारणं आवश्यंक होतं. मात्रं आपण नेमक्या कोणत्या प्रदेशात आहोत हे पायलटकडून जाणून घेण्याचा कूपरने कोणताही प्रयत्न केला नव्हता. या सर्व शक्यतांचा विचार करता कूपर वाचणं शक्यंच नाही असं एफ. बी. आय. चं मत पडलं!

डॅन कूपरचं नक्की काय झालं होतं?

कूपर पॅराशूटने उडी मारण्यात यशस्वी झाला होता असा एक तर्क मांडला जातो. वॉशिंग्टनमधील जंगलात उतरल्यावर कोलंबिया नदीच्या काठाने वाट काढताना त्याच्याजवळील नोटांची तीन बंडलं निसटून पडली आणि पुढे ती ब्रायन इन्ग्रॅमच्या हाताला लागली असा तर्क मांडला जातो. उरलेल्या सर्व रकमेह कूपर अज्ञात स्थळी नाव-गाव बदलून राहत होता आणि अद्याप तो जिवंत असण्याची शक्यता आहे असंही या तर्कानुसार सांगितलं जातं!

जा दिवशी कूपरने विमानातून उडी मारली त्याच दिवशी रात्री मर्विन लेकच्या परिसरातील एरियल इथल्या लहानशा बारमध्ये अनेकजण दारु पित बसले होते. बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता. जीवघेणी थंडी पडलेली होती. एरियलच्या आसपास शेतं पसरलेली होती. मधूनच टेकड्या डोकावत होत्या. या टेकड्यांच्या मागेच पर्वतरांग उभी होती. या प्रदेशातून जाणारा एकमेव हायवे तेव्हा सुनसानच होता.

बारमध्ये बसलेल्या लोकांना एक अनपेक्षीत दृष्य नजरेस पडलं...

मर्विन लेकच्या परीसरातून येणार्‍या रस्त्यावरुन त्या तशा पावसात एक व्यक्ती चालत येत होती! सावकाशपणे चालत येणार्‍या त्या व्यक्तीच्या पाठीवर एक बॅग लटकावलेली होती. बारकडे संपूर्ण दुर्लक्षं करुन तो आपल्या वाटेने निघून गेला!

तो माणूस डॅन कूपर होता का?

१९८० मध्ये ब्रायन इन्ग्रॅमला मिळालेल्या नोटांच्या बंडलांमुळे कूपरच्या शोधाला पुन्हा चालना मिळाली. कोलंबिया नदीच्या एखाद्या उपनदीतून वाहत ती बंडलं वाहत आली असावी असा अनेकांनी तर्क मांडला. या तर्कानुसार पॅराशूटने उतरल्यावर कूपरचा मृत्यू झाला असावा आणि नोटांची बंडलं वाहत आली असावी असाही तर्क पुढे आला. आर्मी कॉर्प्सच्या हायड्रॉलॉजिस्टच्या मते नोटांची ही बंडलं नदीच्या प्रवाहातून वाहत आल्यानेच नोटा गोलाकार आकारात झिजल्या होत्या. हा तर्क योग्य असला तर कूपर मर्विन लेकच्या परीसरात न उतरता वॉशगल नदीच्या परीसरात उतरला असण्याची शक्यता होती!

अर्थात नोटा नदीच्या पाण्यातून वाहत आलेल्या तर्कातही अनेक त्रुटी होत्या. तिसर्‍या बंडलातील दहा नोटा कशा गायब झाल्या याचं कोणतंही स्पष्टीकरण मिळत नव्हतं. नदीच्या पाण्यातून वाहत आलेल्या नोटा जास्तीत जास्त दोन वर्षात वाहत आल्या नसत्या तर त्यांना बांधलेलं रबर सुटून त्या सर्वत्र विखुरल्या असत्या! या तर्कानुसार नोव्हेंबर १९७३ पर्यंत या नोटा टीना बारच्या किनार्‍यावर पोहोचल्या असत्या. १९७४ मध्ये कोलंबिया नदीच्या पात्रात उत्खननाचं काम चालू होतं. या उत्खननातून निघालेली वाळू टीना बारच्या किनार्‍यावर टाकण्यात आलेली होती. पोर्टलँड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना इन्ग्रॅमला सापडलेल्या नोटांवर १९७४ च्या उत्खननात सापडलेल्या मातीचे अंश आढळून आले होते. याचाच अर्थ या नोटा १९७४ नंतर त्या परीसरात आल्या होत्या.

एका तर्कानुसार नोटांची बंडलं दुसरीकडून टीना बारच्या किनार्‍यावर आणून पुरण्यात आली होती. कदाचित हे काम एखाद्या जनावराचंही असावं असा एक तर्क मांडण्यात आला. नदीवर उत्खनन होण्यापूर्वीच नोटा कोणाला तरी सापडल्या असाव्या आणि उत्खनन केलेल्या मातीत त्या गाडून ठेवण्यात आल्या होत्या असंही मत मांडण्यात आलं. कॉवित्झ काऊंटीच्या शेरीफने निराळाच तर्क मांडला. त्याच्या तर्कानुसार कूपरने विमानातून उडी मारण्यापूर्वी काही बंडलं बॅगेतून निसटून शिडीवर पडली असावी. कूपरने उडी मारल्यावर ही बंडलं उघड्या दारातून खाली पडली असावीत! कूपर उरलेल्या पैशासह कोलंबिया नदीत बुडाला असावा! एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाच्या मते आपण हा पैसा कधीही वापरू शकणार नाही याची कल्पना आल्याने स्वतः कूपरनेच हे पैसे पुरुन टाकले होते! अर्थात हे सर्व तर्कच होते आणि यापैकी एकाही तर्काच्या जवळपास जाणारा कोणताही पुरावा सापडलेला नाही!

एफ. बी. आय. ने पॅराशूटने उडी मारताना कूपरचा मृत्यू झाला असं ठामपणे प्रतिपादन केलं असलं, तरी कूपरचा माग कधीच सोडला नव्हता!

सुमारे १००० संशयितांची एफ. बी. आय. ने कसून तपासणी केली. सर्व प्रकारच्या लोकांचा त्यात समावेश होता. अनेकांवर डॅन कूपर असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

२००३ मध्ये मिनीसोटा इथल्या लिल क्रिश्चनसेनला कूपरवरील एक डॉक्युमेंट्री पाहील्यावर आपला भाऊ केनेथ हाच कूपर असल्याची खात्री पटली! केनेथने १९४४ मध्ये तो लष्करात भरती झाला. तो पॅराट्रूपर होता! महायुध्द संपल्यावरही तो अनेकदा पॅराशूटने उड्या मारण्याचा सराव करत असे! १९५४ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यावर त्याने नॉर्थवेस्ट ओरीएंटमध्ये मेकॅनिक म्हणून नोकरी पत्करली! काही वर्षांनी तो फ्लाईट अटेंडंटही झाला! कूपरप्रमाणेच तोही बॉरबॉनचा शौकीन होता. कूपरप्रमाणेच तो डावखुरा होता. शॉफनरने इतर कोणापेक्षाही त्याचा चेहरा कूपरशी मिळताजुळता आहे असं स्पष्टं केलं होतं!

१९७१ च्या त्या घटनेनंतर लगेचच केनेथने रोख पैसे भरुन घर घेतलं होतं. पैशाची तंगी असलेल्या आपल्या भावाकडे अचानक इतका पैसा आला कुठून याचं लिलला नवल वाटलं होतं. १९९४ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबियांना त्याच्याजवळ असलेली सोन्याची नाणी आणि दुर्मिळ स्टँप्सचा शोध लागला! त्याच्या बँकेत दोन लाख डॉलर्सपेक्षा जास्तं रक्कम जमा होती! त्याच्या संग्रहात नॉर्थवेस्टच्या हायजॅकींग पूर्वीपर्यंतच्या अनेक बातम्यांची कात्रणं होती. परंतु एवढ्या महत्वाच्या घटनेचं किंवा १९७१ नंतरच्या नॉर्थवेस्ट संबंधीत एकाही घटनेचं कात्रण त्याच्यापाशी नव्हतं! १९७१ नंतरही तो अनेक वर्ष नॉर्थवेस्ट ओरीएंटसाठी पार्ट टाईम काम करत होता!

एफ. बी. आय. ने केनेथ क्रिश्चनसेन हा डॅन कूपर असण्याची शक्यता फेटाळून लावली. कूपरपेक्षा क्रिश्चनसेन बराच बारीक होता, तसेच उंचीलाही कमी होता. कूपरला पॅराशूटींगचं विशेष ज्ञान नव्हतं, परंतु क्रिश्चनसेन उत्तम पॅराट्रूपर होता. या सर्वाचा विचार करता क्रिश्चनसेन कूपर नसावा असा एफ. बी. आय. ने निष्कर्ष काढला.

मरीन कॉर्प्स आणि लष्करात असलेला विल्यम गॉसेट व्हिएतनाम युध्दात लढला होता. लष्करातून निवृत्त झाल्यावर तो युताह राज्यात प्राध्यापक म्हणून काम करू लागला. गॉसेट कूपरच्या अपहरणाच्या केसने झपाटलेला होता. कूपरसंबंधीत अनेक बातम्यांचे त्याच्यापाशी संग्रह होते. १९७१ मध्ये काढलेल्या त्याच्या फोटोत आणि कूपरच्या रेखाचित्रात कमालीचं साम्य आढळून येतं!

गॉसेटचा मुलगा ग्रेग याने आपल्या वडीलांनी १९७१ मध्ये ख्रिसमसच्या आधी आपल्याना नोटांची बंडलं दाखवली होती असं सांगतो! एकदा त्याने कॅनडातील व्हँकूअर इथल्या बँकेच्या सेफ डिपॉझीट बॉक्सची किल्ली ग्रेगला दाखवली. त्या बॉक्समध्ये बाकीची रक्कम सुरक्षीत आहे असा त्याचा दावा होता!

एफ. बी. आय. ने गॉसेट कूपर असल्याचा दावा खोडून काढला. विमान अपहरणाच्या वेळी गॉसेट पोर्टलँड भागात नव्हताच असं त्यांनी स्पष्ट केलं. गॉसेटच्या स्वतःच्या दाव्याव्यतिरीक्त तो स्वतः कूपर आहे हे सिध्द करणारा कोणताही पुरावा आढळला नाही!

कूपर असल्याचा आणखीन एक संशयित होता तो म्हणजे रिचर्ड फ्लॉईड मॅक्कॉय ज्युनियर! मॅक्कॉय व्हिएतनाम युध्दात हेलीकॉप्टर पायलट म्हणून लढला होता. लष्करातून निवृत्त झाल्यावर तो युताह नॅशनल गार्डमध्ये कान करु लागला. त्याला स्काय डायव्हींगचं प्रचंड वेड होतं.

कूपरच्या हायजॅकींग नंतर मॅक्कॉयने त्याचाच कित्ता गिरवत ७ एप्रिल १९७२ ला डेन्वरला जाणार्‍या विमानाचं अपहरण केलं! सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर पॅराशूट्स आणि पाच लाख डॉलर्स ताब्यात घेतल्यावर मॅक्कॉयने युताह मधील प्रोव्हो इथे विमानातून उडी ठोकली! तो सुरक्षीत उतरण्यात यशस्वी झाला तरी दोनच दिवसांनी, ९ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली! ४५ वर्षांच्या आपल्या शिक्षेपैकी २ वर्षांची शिक्षा भोगल्यावर लुईसबर्ग तुरूंगातून त्याने पलायन केलं! तीन महिन्यांनी व्हर्जिनिया बीच इथे एफ. बी. आय. एजंटबरोबर झालेल्या गोळीबारात तो मरण पावला.

एफ. बी. आय. ने मॅक्कॉय कूपर असण्याची शक्यता फेटाळून लावली. मॅक्कॉय २९ वर्षांचा होता. तसेच त्याला पॅराशूटींगचा अनुभव होता. त्याचा चेहराही कूपरशी मिळताजुळता नव्हता!

डुअ‍ॅन वेबर, जॉन लिस्ट, टेड मेफिल्ड यांच्यावरही ते कूपर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, रॉबर्ट डेटनने १९६९ मध्ये लिंगपरिवर्तन करुन घेतलं आणि तो बार्बरा डेटन झाला. पुढे आपण डॅन कूपर असल्याचा डेटनने दावा केला, परंतु आपल्याला अटक होऊ शकते हे कळल्यावर मागेही घेतला! २००३ मध्ये डेटनचं निधन होईपर्यंत एफ. बी. आय. ने डेटनवर कोणतंही मतप्रदर्शन केलं नाही. मात्रं वेबर, लिस्ट आणि मेफील्ड हे कूपर असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

२०११ मध्ये मार्ला कूपर हिने आपला काका लिन डॉयल कूपर हाच डॅन कूपर असावा असा संशय व्यक्तं केला. लिन कोरीयन युध्दात लढलेला होता. तो व्यवसायाने चर्मकार होता. मार्लाच्या म्हणण्याप्रमाणे लिन आणि दुसरा एक काका अत्यंत महागड्या अशा वॉकी-टॉकीवरुन ओरेगॉन मधील सिस्टर्स या गावी काहीतरी मोठा कट आखत होते. १९७१ मध्ये विमान अपहरणाच्या आदल्या दिवशी ते टर्कीच्या शिकारीसाठी म्हणून जंगलात गेले होते. अपहरणाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी जखमी अवस्थेतील लिन कूपर घरी आला. आपण मोटार अपघातात जखमी झाल्याचं त्याने सांगितलं असलं तरी मार्लाचा त्यावर कधीच विश्वास बसला नाही!

LD
लिन डॉयल कूपर

आपण आपले वडील आणि दोन्ही काकांना पैशाबद्दल बोलतानाही ऐकल्याचा मार्लाने दावा केला. विमानातून खाली आल्यावर जमिनीवर उतरण्यापूर्वी लिनच्या पाठीवरील पैशाची बॅग उडून बाजूला पडली होती असं नंतर त्यांच्या ध्यानात आलं. तिच्या दोन्ही काकांची पैसे शोधण्यास जाण्याची इच्छा होती, परंतु एव्हाना एफ. बी. आय, च्या त्या प्रदेशातील वावर वाढल्यामुळे आपल्या वडीलांनी त्याला नकार दिला असं मार्लाने स्पष्टं केलं.

मार्लाने लिन कूपरचा फोटो आणि त्याने बनवलेली गिटार अडकवण्याची दोरी एफ. बी. आय. ला दिली. या दोरीवरुन हाताचे ठसे मिळवण्यात अपयश आलं. लिनचा डि. एन. ए. कूपरच्या टायवरील डी. एन. ए. शी जुळत नव्हता. अर्थात टायवरचा डी. एन. ए. कूपरचाच आहे हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही असं एफ. बी. आय. ने स्पष्टं केलं.

डॅन कूपरने केलेल्या हायजॅकींगनंतर याचं पेवच फुटलं. १९७२ मध्ये विमान अपहरणाचे १५ अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रकरणांतील आरोपी पकडले गेले. कूपरचा मात्रं पत्ता लागला नाही!

या सर्व अपहरणांचा परिणाम म्हणून विमानतळावर सुरक्षा तपासणीविना प्रवाशांना विमानात जाऊ देण्यावर कडक निर्बंध आले! व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होत असल्याची आरडा-ओरड अनेकांनी केली, परंतु सुरक्षिततेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्यात आली नाही!

कूपर आणि इतर अपहरणांनंतर विमानांतही महत्वाचे बदल करण्यात आले. ७२७-१०० विमानाची पाठची शिडी विमान हवेत असताना खाली सोडता येणार नाही यासाठी खास तंत्राची व्यवस्था करण्यात आली. या तंत्राला चक्कं कूपरचंच नाव देण्यात आलं. काही विमान कंपन्यांनी ही शिडी काढूनच टाकली! त्याच्या जोडीला विमानातील प्रवाशांच्या हालचाली टिपण्यासाठी कॉकपीटच्या दाराला आय बॉल्स बसवण्यात आले!

१९७१ पासून ४३ वर्षांनंतरही डॅन कूपर नेमका कोण होता आणि विमानातून उडी मारल्यावर त्याचं नेमकं काय झालं हा प्रश्न अनुत्तारीतच आहे! एफ. बी. आय. ने या केसची फाईल आजही बंद केलेली नाही!

कूपर विमानातून उडी मारल्यावर खरंच मरण पावला का?
कूपर मरण पावला असेल तर तो नक्की कुठे खाली आला होता?
कूपरला देण्यात आलेल्या पैशांपैकी २९० नोटा (५८०० डॉलर्स) इन्ग्रॅमला मिळाले. उरलेल्या ९७१० नोटा (१९४२०० डॉलर्स!) कुठे गेले?
कूपर सुरक्षितपणे खाली उतरला का?
एरियल इथे दृष्टीस पडलेला माणूस कूपर होता का आणखीन कोणी?
कूपरकडील पैसे टीना बारच्या बीचवर कुठून आले?
डॅन कूपर अद्याप नेमका कोण होता?

आणि

डॅन कूपर अद्याप जिवंत आहे का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel