सूर्याजवळ धगधगीत प्रकाश दिसे. अल्पही मालिन्य त्याच्याजवळ दिसत नसे. आपल्या बुद्धीतही किल्मिष नसावे, मालिन्य नसावे, असे मननशील मानवाला वाटे. तो सूर्याला म्हणे, “हे सूर्य! तुझ्या तेजोमय प्रकाशधारा पिऊन आमची बुद्धी निर्मळ होवो. आमची बुद्धी स्वतंत्र असो, जागृत असो. मालिन्याचा लवलेशही आमच्या बुद्धीजवळ नसो.” अशी प्रार्थना करून कृतज्ञतेने मनवप्राणी सूर्याला अर्ध्य देत. त्याला सुंदर फुले देत. कोणी त्याचा जप करीत, कोणी त्याचे सतत स्तवन करीत.
वृत्र या गोष्टी पाहत होता. चराचराचे जीवन मुख्यत्वेकरून हा सूर्य व याच्या तेजःप्रसवा गाई यांच्यावर अवलंबून आहे, ही गोष्ट प्रखर प्रज्ञेच्या वृत्राच्या ध्यानात आली. चराचराच्या जीवनाचा सूर्य हा प्राण आहे, आधार आहे. या सूर्याला त्याच्या गाईंसह आपण गिळून टाकिले तर? असा एक विचार वृत्राच्या मनात आला. सूर्य व त्याच्या गाई नसतील तर सारे विश्वयंत्र बंद पडेल. सर्वत्र अंधार पसरेल. उष्णता नाहीशी होईल. वारे वाहणार नाहीत, मेघ बनणार नाहीत, पाऊस पडणार नाही, वृक्षवनस्पती वाढणार नाहीत, मानव जगणार नाहीत. सर्वत्र प्रेतकळा ओढवेल. या विश्वाचे मग कोण रक्षण करील? कोणता देव वा मानव उभा राहील? प्रभू म्हणाला की, यज्ञधर्म जिवंत असेल तरच त्याचे रक्षण होईल. पाहू या. हीच परीक्षा होईल, गंमत होईल.
वृत्र हसला. भेसूर हसणे, मरणरूप हसणे. ते हसणे म्हणजे चराचराचे मरण होते. गिळू का गाईंसह हा सूर्य? त्याने स्वतःला प्रश्न विचारला. या सूर्याला गाईंसह गिळण्याची आहे का आपली शक्ती, या गोष्टींचा तो विचार करू लागला. पुन्हा तो हसला व म्हणाला, ‘वेडाच आहे मी. माझ्या स्वरूपाचाच मला विसर पडला. मी वाटेल तेवढा मोठा होऊ शकतो. या ब्रह्माण्डाचा मी एक घास करू शकेन. वाढवू का माझे रूप ? होऊ का विराट वेषधारी ? परंतु माझा नाश तर नाही ना कोणी करणार ? कोण करणार माझा नाश ? महान यज्ञाशिवाय कोणतेही शस्त्र माझ्यावर चालणार नाही. यज्ञधर्म तर मेल्यासारखाच झाला आहे. हे स्वर्गात राहणारे देव तर नाचरंगात दंग झाले आहेत. अमृताचा पेला व अप्सरांच्या ओठांचा पेला हे दोन पेले त्यांना सदैव लागतात. यज्ञाचे त्यांना भानही नाही. परंतु मानवात यज्ञधर्म अद्याप रूढ आहे. मानवांनी यज्ञधर्म परमोच्च मानला आहे. यज्ञोपासना ते वाढवित आहेत, परंतु जाऊन पाहिले पाहिजे. या बाह्य यज्ञोपासनेच्या आत डोकावून पाहिले पाहिजे.’
वृत्राने लघुरूप धारण केले व तो भूतलावर हिंडूफिरू लागला. त्याने नाना देश पाहिले. द्वीपद्वीपांतरे पाहिली, परंतु निर्मळ व सोज्वळ यज्ञोपासना त्याला कोठेही दिसली नाही. हिंडता हिंडता तो खाली भारतभूमीत आला. हिमालयाची सू्र्याला भेटू पाहणारी ती स्वच्छ शिखरे पाहून तो आनंदला. हिमालयाच्या पोटातून वाहणा-या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा वगैरे पवित्र नद्या त्याने पाहिल्या. त्याने खालचा विंध्याद्रीचा हिरवागार कमरपट्टा पाहिला. पूर्वेस व पश्चिमेस उचंबळणारा सहस्त्रावधी लाटांचा सागर त्याने पाहिला. भारताचे भौगोलिक सौंदर्य पाहून वृत्र वेडा झाला. निरभ्र आकाश, प्रसन्न नद्या, उत्तुंग पर्वत, पाताळाला भेटू पाहणा-या खोल द-या, नाना रंगांची व गंधांची फुले, नाना स्वादांची मधुर फळे, नाना प्रकारचे धीरगंभीर वृक्ष, नाचणा-या वेळली, सुंदर मोहक रंगांचे पक्षी व त्यांचे कर्णमधुर आलाप- सारे वातावरण हृदयहारी होते. वृत्राने भारताला प्रणाम केला.