एके दिवशी सायंकाळी उरल्यासुरल्या गाई घेऊन सूर्य लगबगीने जात होता. आज जरा लवकरच तो परत निघाला होता. वृत्र येण्याच्या आत जाऊ पाहत होता. इतक्यात समोर वृत्र दिसला. सूर्य काळवंडला.
“अरे, मला चुकवून कोठे चाललास ? मरण चुकवता येत नाही. माझ्या पोटात जा. तेथे तुझ्या गाई आहेत. माझ्या पोटाच्या दरीत नांदा. रहा उभा !” वृत्र म्हणाला.
“अजून तूझी भूक शमली नाही का ? या चार गाईतरी राख. इतके तरी प्रकाशाचे दूध मला जगाला देऊ दे. जग जगेल. कोण आहेस तू ? का हा संहार आरंभिला आहेस ? मी नसेन, माझ्या या गाई नसतील, तर चराचराच्या नाड्या आखडतील. सारे संपुष्टात येईल. असे करू नकोस ! ईश्वराची सुंदर सृष्टी मोडू नकोस. ऐक माझे. मी तुझ्या पाया पडतो. या सृष्टीसाठी पाया पडतो. माझ्या प्राणासाठी नव्हे.”
“ईश्वरानेच मला पाठविले आहे. मी विश्व मो़डू पाहत आहे. या जगात जर कोणी खरा धर्मात्मा, खरा महात्मा असेल, तर तोच या संकटापासून विश्वाचे रक्षण करू शकेल. असा कोणी आहे का यज्ञस्वरूपी मानव, तेच तर मला पाहावयाचे आहे. मला फारसे बोलायला आवडत नाही. उभा रहा ! माझ्या पोटात जाऊन रहा !”
वृत्राने जबडा पसरला. गाई धावू लागल्या. परंतु जबडा वाढत त्यांच्याकडे आला. गडप! एकदम सूर्य गाईंसह गिळला गेला. सूर्य वृत्राच्या पोटात सर्व शक्तीने तळपू लागला. परंतु वृत्राच्या पोटात अशी काही उक्ती होती की, तो सारा ताप ते पोट सहज सहन करी. आपला पालनकर्ता आपल्याबरोबर आहे, हे पाहून त्या धेनूंना त्या संकटातही धीर आला. सूर्याचे अंग प्रेमाने त्यांनी चाटले. धेनूंच्या डोळ्यांत पाणी आले.
“भगवान, पृथ्वीवरील सारी आमच्या प्रकाशमय पान्ह्याची वाट पाहत असतील. भुकेले असेल विश्व. आमच्या कासा तटतटा फुगल्या आहेत, कोठे सांडू हे दूध. कळा लागल्या स्तनांना.” गायी म्हणाल्या.
“धीर धरा. जातील हे दिवस. विश्वाची परीक्षा विश्वंभर घेत आहे. पुन्हा आपण बाहेर पडू व चराचराला प्रकाशमय दूध देई. डोळ्यांत पाणी आणू नका.” सूर्य म्हणाला.
पृथ्वीवर हळुहळू प्रकाश कमी होत होता. लोकांचे लक्ष त्या गोष्टीकडे गेले होते, परंतु एके दिवशी प्रकाश आलाच नाही. आदल्या दिवशी सूर्य गेला तो गेला. आकाशातील तारे चमकत होते. कोठे गेला सूर्य ? तो का मेला, तो का विझला ? लोक कितीतरी वेळ अंथरुणातच होते. सूर्य आता येईल, थोड्या वेळाने येईल, अशी आशा करीत होते, परंतु सूर्याचा पत्ता नाही. अंथरुणात कंटाळा आला. पाखरे घरट्यातून जागी झाली. मुले अंथरुणात जागी झाली. परंतु पाखरे बाहेर पडत ना. मुले बाहेर जात ना. बाहेर रात्र होती. न संपणारी रात्र. अनंत रात्र. हळूच कोणी बाहेर डोकावत, पुन्हा अंथरुणावर येऊन पडत.