दधीची आश्रमाकडे आले. त्यांनी आश्रमाभोवतालची झाडेमाडे, पशुपक्षी यांना प्रेमाने प्रणाम केला. ते म्हणाले, “हे माझे सखेसोयरे. माझे येथील आधार. यांनी मला रिझविले. वातावरणात प्रसन्न ठेवले. हे तरू तर माझे सद्गुरु !”
दधीची झाडामाडांस प्रणाम करीत होते; परंतु हे कोण त्यांच्या चरणावर डोके ठेवीत आहे ?
“हे कोण ? तू का आलीस ? तुझ्याच पाया पडू दे. तू अनुज्ञा दिलीस म्हणून तुझ्या पतिला हे भाग्य मिळत आहे. तू रडली नाहीस, मला अडवले नाहीस, तुझे थोर उपकार ! तू थोर आहेस. जगाला माझा यज्ञ दिसत आहे; परंतु तुझा होम मला दिसत आहे.” पत्नीला ते म्हणाले.
तिने मुलांना पायांवर घातले. दधीचींनी मुलांच्या मस्तकावर मंगल हात ठेवला. “सुकृती व्हा !” असा आशीर्वाद दिला.
माता व मुले दूर उभी राहिली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी हात जोडले होते. देवांनी हात जोडले. ऋषीमुनींनी होत जोडले. दधीची आसनावर बसले. सारी सृष्टी स्थिर गंभीर होती. महान यज्ञ सुरू झाला. दधीचींनी समाधी लावली. पाखरे रडू लागली. हरणे यज्ञदेवाला प्रदक्षिणा घालू लागले. पशुपक्षी प्रदक्षिणा घालू लागले. ती माता व तिची लेकरे दुरून बघत होती. दधीचींची प्राणज्योत परमज्योतीत मिळून गेली.
“चला बाळांनो !” माता मुलांस म्हणाली.
“आई, बाबा कधी भेटतील, कधी उठतील ?”
“ते नेहमी भेटतील. ते आपल्याजवळ आहेत, सर्वांजवळ आहेत. चला.” ती सद्गदित होऊन म्हणाली. वायुदेवाने त्यांना घरी पोचविले. इकडे तो पवित्र देह आसनावर होता. देहातील अस्थी दिसत होत्या. त्या अस्थींवर जणू झिरझिरीत, लखलखीत, रुपेरी असा त्वचेचा पडदा होता. ती त्वचा कोणी काढायची ? अस्थी कोणी काढायच्या ? कोणी करायचे ते काम ?हलक्या हाताने कोण सोलणार तो देह ? आईशिवाय कोण करील हे काम ? हलक्या हाताने मुलाचा अंगरखा ती काढते. वसिष्ठऋषी म्हणाले, “गोमातांना हे काम सांगावे. या देहाला आपण थोडे मीठ चोळू, म्हणजे शरीराला पाझर सुटेल. गोमाता हे अंग मग चाटतील. हळूहळू प्रेमाने चाटतील. त्वचा झिरपून जाईल. अस्थी जशाच्या तशा मिळतील.”
वसिष्ठांच्या म्हणण्यास अश्विनीदेवांनीही संमती दिली. अश्विनीदेवांनीच मीठ चोळावे असे ठरले. त्यांनी हलक्या हातांनी त्या पुण्यमय देहाला मीठ चोपडले. नंदिनी आदी कामधेनू आल्या व त्यांनी तो झिरपणारा देह चाटला. वरचे झिरझिरीत तनुपटल दूर झाले. आतील स्वच्छ अस्थी मिळाल्या.