९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती. परंतु हार न मानता १६१९ च्या सप्टेंबरमध्ये त्याने हडसनच्या उपसागरात प्रवेश केला! अर्थात थंडीत पुढे मजल मारणं शक्यं नसल्याने त्यांनी चर्चील नदीच्या मुखाशी मुक्काम ठोकला!

दुर्दैवाने मंकच्या मोहीमेला स्कर्व्हीने घेरलं. त्याच्या जोडीला थंडीचा तडाखा आणि अन्नसामग्री संपल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली! २० सप्टेंबर १९२० ला मंक नॉर्वेला परतला तेव्हा त्याच्याबरोबर केवळ दोन खलाशी शिल्लक होते! केवळ तिघांनी अटलांटीक ओलांडून नॉर्वेचा किनारा कसा गाठला असेल हे तेच जाणे!

१६८० मध्ये फ्रेंच संशोधक ला सेल याने अमेरीकेतील ग्रेट लेकस् परिसरातून नॉर्थ वेस्ट पॅसेजची मोहीम उघडली. त्याचं जहाज परतीच्या प्रवासात तो साध्या बोटीवर असताना अनेक खलाशांसह गडप झालं! १६८२ च्या वसंत ऋतूत ला सेलने मिसिसीपी नदीतून मेक्सिकोचं आखात गाठलं!

नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचे बहुतांश प्रयत्नं युरोपातून पश्चिमेच्या दिशेने करण्यात आले, तरी यात पश्चिमेकडील रशियनही मागे नव्हते.

१६४८ मध्ये सेम्यॉर डेझन्यॉव्ह या रशियन संशोधकाने रशियाच्या उत्तरेकडील भागातून पूर्वेकडील टोकाला वळसा घातला होता. आशिया आणि अमेरीकेला विभागणार्‍या सामुद्रधुनीतून त्याने प्रवास केला होता. आशिया आणि अमेरीका खंड हे सलग भूभाग नसून महासागराने विभागलेले आहेत हे त्याने सिद्ध केलं. परंतु डेझन्यॉव्हच्या काहीशा वादग्रस्तं व्यक्तिमत्वामुळे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही!

१७२८ मध्ये रशियन नौदलात अधिकारी असलेला आणि मूळचा डेन्मार्कचा असलेला एक अधिकारी पूर्व आशियाच्या मोहीमेवर होता...

व्हायटस बेरींग!

रशियाच्या दक्षिण किनार्‍याने पूर्वेकडे सरकायचं आणि जमिन पश्चिमेकडे वळल्यावर उत्तर किनार्‍यावरुन पुन्हा मॉस्कोच्या दिशेने परतायची त्याची योजना होती. आशिया आणि अमेरीका खंड यांना विभागणारा सागरी मार्ग अस्तित्वात आहे या गृहीतकावर ही मोहीम आधारलेली होती.

रशियाच्या द्क्षिण किनार्‍यावरुन निघाल्यावर अपेक्षेप्रमाणे आपण उत्तरेला जात नसून उत्तर-पूर्व दिशेने जात आहोत हे त्याच्या ध्यानात आलं. या मार्गाने जाताना त्यांची स्थानिक रशियन आदिवासींशी गाठ पडली, परंतु भाषेच्या अडचणीमुळे आपण ज्या मार्गाने आलो तो मार्ग त्याला विषद करता येईना!

१३ ऑगस्ट १७२८ या दिवशी आपल्या सहकार्‍यांसह हा बेरींग रशियाच्या पूर्व टोकाला पोहोचला. उत्तरेकडे गेल्यावर जमिन पुन्हा पश्चिम दिशेने वळल्याचं त्यांना आढळून आलं. अमेरीकेचं पश्चिम टोक असलेल्या अलास्काची खूणही कोठे दिसत नव्हती!

आशिया आणि अमेरीका खंड महासागराच्या सामुद्रधुनीने विभागलेले आहेत हे या मोहीमेने निर्विवाद सिद्धं झालं!

बेरींगची सामुद्रधुनी!

प्रकरण दुसरे

१७४१ मध्ये बेरींग पुन्हा पूर्वेच्या मोहीमेवर निघाला. रशियाच्या पूर्वेकडील टोकावरुन परत न फिरता पुढे जाऊन अलास्का गाठण्याची त्याची योजना होती. बेरींगच्या बरोबर १७२८ च्या मोहीमेतील त्याचा विश्वासू साथीदार अ‍ॅलेक्सी चिरीकॉवही होता.

अनेक महिन्यांच्या वाटचालीनंतर बेरींगची तुकडी रशियाच्या पेट्रोपाव्ह्लोव्स बंदरात पोहोचली. इथूनच बेरींगने अमेरीकेच्या शोधात पूर्वेचा मार्ग पत्करला. पॅसिफीकमधून वाट काढत पूर्वेला जात असतानाच बेरींगला ज्वालामुखीचं एक शिखर दृष्टीस पडलं!

माऊंट सेंट एलिस!

अलास्का आणि कॅनडाच्या युकॉन प्रांताच्या हद्दीवर असलेलं माऊंट सेंट एलिस दृष्टीस पडतास बेरींगने समाधानाचा नि:श्वास सोडला. अखेरीस अमेरीकेला पोहोचण्यात तो यशस्वी झाला होता!

१६ जुलै १७४१!

माऊंट सेंट एलिसच्या भूमीवर बेरींग उतरला. रशियाच्या पूर्व किनार्‍यावरुन अमेरीकेचा पश्चिम किनारा गाठणारा तो पहिला दर्यावर्दी ठरला होता!

परतीच्या वाटेवर बेरींग आणि चिरीकॉव यांची वादळामुळे ताटातूट झाली. चिरीकॉवला अमेरीकेच्या उत्तर-पश्चिम किनार्‍याचा आणि अ‍ॅल्युटीयन द्वीपसमुहातील अनेक बेटांचा शोध लागला. स्कर्व्हीने ग्रासलेल्या बेरींगला कमांडर बेटांतील सर्वात मोठ्या बेटावर आपल्या इतर २८ सहकार्‍यांसह मृत्यू आला. या बेटाला पुढे बेरींगचं नाव देऊन गौरवण्यात आलं.

१७७१ मध्ये हडसन बे कंपनीचा अधिकारी असलेला सॅम्युएल हर्न याने हडसनच्या उपसागराच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या चर्चिल इथून स्थानिक आदीवासींच्या मदतीने कॉपरमाईन नदीच्या काठाने कॅनडाच्या उत्तरेला असलेला आर्क्टीक समुद्राचा किनारा गाठला! जमिनीवरुन जाणार्‍या मार्गाने आर्क्टीकच्या किनार्‍यावर पोहोचलेला तो पहिला युरोपियन अधिकारी होता!

हर्नचा या मोहीमेमुळे उत्तर अमेरीका खंडाच्या अंतर्भागातून नॉर्थवेस्ट पॅसेज जात नाही हे सप्रमाण सिद्धं झालं.

११ ऑगस्ट १७७५...

व्हेल्सच्या शिकारीवर आलेलं हेराल्ड हे जहाज ग्रीनलंड आणि एल्स्मेअर बेटाच्या उत्तरेला बॅफीनच्या उपसागराच्या उत्तरेच्या टोकाला होतं. आर्क्टीक सर्कलमध्ये वारा साफ पडला होता. हेराल्ड वरील सर्वजण वार्‍यासाठी प्रार्थना करत होते. लवकरात लवकर डेव्हीसची सामुद्रधुनी न गाठल्यास आर्क्टीक सर्कलमध्येच गोठलेल्या बर्फात अडकून पडण्याची त्यांना भीती वाटत होती.

सुदैवाने दुपारी वार्‍याचा जोर वाढला. अर्धवट उभारलेल्या एकमेव शिडाच्या जोरावरही हेराल्डची दक्षिणेकडे बर्‍यापैकी वेगाने वाटचाल सुरु होती. १३ तारखेच्या सकाळी ते ग्रीनलंडच्या नैऋत्य किनार्‍याजवळ होते. तेव्हा जहाजावरील टेहळ्याने समोर दिसणारा एक मोठा हिम़खंड टिपला.

दूर क्षितीजावर गोठलेल्या हिमखंडांचं साम्राज्यं पसरलं होतं. या हिमखंडांना वळसा घातल्याशिवाय किंवा त्यातूनच वाट काढण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. हेराल्डचा कॅप्टन वॉरेन याने हिमखंडाला वळसा घालून दक्षिणेच्या दिशेने जाण्यासाठी एखादा मार्ग आढळतो का हे पाहण्यास सुरवात केली. त्याचवेळी...

"जहाज! जहाज दिसतं आहे!"

कॅप्टन वॉरेनने दुर्बिणीतून समोरच्या हिमखंडाचं निरीक्षण केलं. खरोखरच हिमखंडावर एक जहाज अडकलेलं दिसत होतं. एका उंचवट्यामागून जहाजाची तीन शिडं आणि डोलकाठीचा भाग डोकावत होता.

सुमारे तासाभराने हेराल्ड त्या जहाजाजवळ आलं. ते जहाज बर्फात पूर्णपणे अडकलेलं होतं. हेराल्डच्या डेकवरुन कॅप्टन वॉरेन आणि इतरांनी दुसर्‍या जहाजावरील लोकांना अनेक आवाज दिले..

....पण त्यांच्या एकाही हाकेला प्रत्युत्तर मिळालं नाही!

कॅप्टन वॉरेन आणि चार खलाशी एका लहानशा होडीतून त्या जहाजाजवळ गेले. त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर बर्फाचे थर साठलेले त्याला आढळून आले. जहाजाचा सांगाडा जवळपास पूर्ण गोठलेल्या अवस्थेत पाण्याच्या पातळीला टेकला होता. एका वल्ह्याच्या सहाय्याने वॉरेनने जहाजाच्या बाहेरील भागावरील बर्फ खरवडला आणि जहाजाचं नाव वाचलं...

ऑक्टेव्हीयस!

आपल्या चार सहकार्‍यांसह कॅप्टन वॉरेन जहाजावर चढला. जहाजाच्या डेकवर बर्फाचे थर साठलेले होते. कित्येक दिवसात तिथे कोणी पायही ठेवला नसावा. जहाजाच्या पुढील भागात असलेल्या जिन्यावरुन उतरुन ते डेकखालच्या भागात आले आणि...

ते संपूर्ण जहाज एक मोठी तरंगती कॉफीन आहे असं त्यांच्या ध्यानात आलं!

एकाशेजारी एक असे एकूण अठ्ठावीस खलाशी ब्लँकेटमध्ये लपेटलेल्या अवस्थेत आपापल्या बंकरमध्ये मृतावस्थेत पडलेले होते! निद्रावस्थेत असतानाच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला असावा! एकेकाळी उब देणार्‍या स्टोव्हमधील निखारे आता गोठले होते. थंडीमुळे प्रत्येक मृतदेह आपोआपच उत्तम अवस्थेत जतन झाला होता!

डेकखाली असलेली परिस्थिती परवडली अशी कॅप्टनच्या केबिनमध्ये शिरल्यावर वॉरेन आणि त्याच्या सहकार्‍यांची अवस्था झाली.

कॅप्टन आपल्या टेबलावर झुकलेल्या अवस्थेत खुर्चीतच गोठला होता!
त्याच्या झोपण्याच्या जागेवर एक स्त्री ब्लँकेट लपेटून पडली होती! तिचे डोळे टक्क उघडे होते... नजर अनंतात लागलेली होती!
एक खलाशी आग पेटवण्याच्या पवित्र्यात असतानाच गोठला होता! मृत्यूपासून वाचण्यापूर्वीच त्याच्यावर झडप पडली होती.
त्याच्या शेजारीच असलेल्या एका कोटाखाली एका लहानशा मुलाचा मृतदेह होता!

हा भयंकर प्रकार पाहून कॅप्टन वॉरेनच्या सहकार्‍यांनी केबिनमधून बाहेर धूम ठो़कली होती. कॅप्टन वॉरेनलाही ते असह्यंच झालं होतं, परंतु डोकं शांत ठेवून त्याने कॅप्टनच्या हातातलं लॉगबुक सोडवून घेतलं आणि तो केबिनमधून बाहेर पडला.

कॅप्टन वॉरेनने डेकवर येऊन आजुबाजूला नजर टाकली. त्याला आणखीन तपासणी करण्याचा मोह होत होता, परंतु त्याचवेळी बर्फातून जहाज जाण्याइतपत वाट मोकळी झाल्याचं त्याच्या नजरेस पडलं. तिथून बाहेर पडणं हे अर्थातच अधिक महत्वाचं होतं, अन्यथा त्यांचीही गत ऑक्टेव्हियस सारखीच झाली असती!

हेराल्डवर पोहोचल्यावर कॅप्टन वॉरेनने ऑक्टेव्हीयसचं लॉगबुक बघण्यास मागीतलं, परंतु लॉगबुकचं पुठ्ठ्याचं कव्हर आणि जेमतेम चार पानं शिल्लक असल्याचं त्याला आढळलं! ऑक्टेव्हीयसवरुन आपल्या बोटीत उतरताना आधीच खिळखिळ्या झालेल्या लॉगबुकची इतर पानं समुद्रार्पण झाली होती!

हिमखंडांच्या प्रदेशातून सुरक्षीत बाहेर पडल्यावर कॅप्टन वॉरेनने ऑक्टेव्हीयसच्या लॉगबुकमधील नोंदी पाहण्यास सुरवात केली.

१० सप्टेंबर १७६१ ला ऑक्टेव्हीयस इंग्लंडहून पूर्वेकडील प्रदेशांशी व्यापार करण्यासाठी निघाले होते. जहाजाचा प्रवास उत्तम सुरु होता. हवामान पूर्णपणे अनुकूल होतं. १९ सप्टेंबरला जहाज कॅनरी बेटांच्या परिसरात होतं. लॉगबुकची पुढील सर्व पानं गळालेली होती.

शेवटच्या पानावरील नोंद होती ती जहाज बर्फात अडकल्याची! ७५ अंश उत्तर अक्षवृत्त आणि १६० अंश पश्चिम रेखावृत्तावर जहाज बर्फात अडकल्याची कॅप्टनने नोंद केली होती. त्यानंतर काही कारणारे जहाजाच्या फर्स्ट मेटने लॉगबुक लिहीण्याचं काम पत्करलं होतं. कॅप्टनच्या मुलाचा मृत्यू, त्याच्या पत्नीचं शरीर गोठत असल्यामुळे एकेक संवेदना नाहीशी होणं या हालअपेष्टांचं त्यात वर्णन केलं होतं. आपल्याला उब निर्माण करण्यासाठी आग पेटवताना येत असलेल्या अडचणींचाही त्यात उल्लेख केलेला होता. त्यानंतर कॅप्टनने पुन्हा लॉगबुक ताब्यात घेतलं होतं, परंतु काही लिहीण्यास तो असमर्थ ठरला असावा.

"भयंकर यातना आणि वेदनांचंच इथे साम्राज्यं पसरलेलं आहे! यातून आमची सुटका होण्याची शक्यता वाटत नाही!" लॉगबुकच्या शेवटच्या नोंदीत फर्स्ट मेटने नमूद केलं होतं!

लॉगबुक मधील शेवटची तारीख होती ११ नोव्हेंबर १७६२!

कॅप्टन वॉरेनने ऑक्टेव्हीयसच्या नकाशावरील नोंद नीट तपासली. त्या नोंदीवरून ते अलास्काच्या उत्तरेला ६०० मैलांवर बर्फात अडकलं होतं असं त्याला आढळून आलं.

एकच शक्यता होती..

केप हॉर्नला वळसा घालून लांबलचक मार्गाने इंग्लंडला परतण्याऐवजी अमेरीकेच्या उत्तरेकडून नॉर्थवेस्ट पॅसेज मार्गे अटलांटीक गाठण्याचा विचार ऑक्टेव्हीयसच्या कॅप्टनने केला असावा! मात्रं आपल्या सर्व सहकार्‍यांसह त्याला प्राणाला मुकावं लागलं होतं!

पॉईंट बॅरोपासून ते ग्रीनलंडपर्यंतचा नॉर्थवेस्ट पॅसेज ऑक्टेव्हीयसने यशस्वीपणे पार केला होता, परंतु सर्व खलाशांना मृतावस्थेत घेऊन... तब्बल १३ वर्षांनी!

१७७५ आणि १७७९ मध्ये दक्षिण अमेरीकेतील स्पॅनिश वसाहतींतून जुआन फ्रान्सिस्को दे ला बोदेगा उत्तर अमेरीकेच्या मोहीमेवर गेला होता. अलास्काच्या पश्चिमेहून स्पेनकडे जाणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधणं हे त्याचं मुख्य उद्दीष्टं होतं, परंतु ५८ अंश उत्तर अक्षवृत्तावरुन त्याला माघार घ्यावी लागली. या मोहीमेचा साद्यंत वृत्तांत ब्रिटीशांच्या हातात पडला. स्पॅनिश दर्यावर्दींच्या या माहीतीचा उपयोग करुन घेण्यायोग्य चाणाक्ष ब्रिटीश दर्यावर्दी तेव्हा इंग्लंडमध्ये हजर होता.

कॅप्टन जेम्स कूक!

कूकने बेरींगच्या १७२८ आणि १७४१ मधील दोन्ही सफरींचा तपशीलवार अभ्यास केला होता. नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या ब्रिटीश सरकारच्या वीस हजार पौंडाच्या बक्षिसाचंही आमिष होतंच!

१७७८ च्या मार्चमध्ये कॅप्टन कूक व्हँकूअर बेटातील नुटका साऊंड या खाडीत पोहोचला. तिथून निघाल्यावर तो बेरींगच्या सामुद्रधुनीच्या मार्गावर निघाला, परंतु ६५ अंश उत्तर अक्षवृत्तावर पोहोचल्यावरही दक्षिणेच्या दिशेने जाणारी जमिन पाहून कूक त्रासला होता. मात्रं तरीही माघार न घेता अखेर त्याने अलास्काच्या आखातातील कूक खाडीमधून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करुन पाहीला. परंतु कूक खाडी बरीच अरुंद असल्याचं त्याच्या निदर्शनाला आलं. अ‍ॅल्युटीयन द्विपसमुहातील बेटांना भेटी देत कूक ७० अंश उत्तर अक्षवृत्तावर पोहोचला, परंतु अखेर गोठलेल्या बर्फापुढे त्याला माघार पत्करावी लागली!

१७८९ मध्ये अलेक्झांडर मॅकेंझीने स्थानिक आदिवासींच्या मदतीने अ‍ॅथबॅस्का तलावातून डेचो नदीतून नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शोधार्थ कूच केलं. स्थानिक आदिवासींच्या मते या प्रदेशातील सर्व नद्या उत्तर-पश्चिम दिशेला वाहत असल्याने नदीमार्गाने गेल्यास आपण पॅसिफीक समुद्र गाठू अशी मॅकेंझीची कल्पना होती.

१४ जुलैला मॅकेंझी डेचो नदीच्या मुखातून महासागरात बाहेर पडला खरा, परंतु तो पॅसिफीक महासागरात न पोहोचता आर्क्टीक मध्ये पोहोचला होता!

अलास्कातील कूकच्या खाडीत न पोहोचता आपण आर्क्टीक मध्ये पोहोचल्याचं ध्यानात आल्यावर मॅकेंझीने त्या नदीचं डिसअपॉईंटमेंट रिव्हर - निराशेची नदी - असं नामकरण केलं. या नदीला पुढे मॅकेंझीचं नाव देण्यात आलं!

१७९०-९१ मध्ये स्पॅनिश दर्यावर्दी फ्रान्सिस्को डी एलिझा याने व्हँकुअर बेट आणि ब्रिटीश कोलंबिया यांच्यादरम्यान असलेल्या जॉर्जियाच्या सामुद्रधुनीचा शोध लावला. ही सामुद्रधुनी तोपर्यंत युरोपियन दर्यावर्दींना अज्ञातच होती. १७९२ मधील फ्रेंच दर्यावर्दी डियॉन्सिओ गॅलीयानोची मोहीमही नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यास अपयशीच ठरली.

१७९२ ते १७९४ च्या दरम्यान ब्रिटीश दर्यावर्दी जॉर्ज व्हँकुअर नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर आला. १७९२ च्या मार्चमध्ये तो हवाई बेटांवर पोहोचला. कॅप्टन जेम्स कूकच्या १७७९ च्या मोहीमेत व्हँकुअर मिडशिपमन होता. (१७७९ च्या मोहीमेत हवाई बेटावरील संघर्षात कॅप्टन कूक हवाईयल लोकांकडून मारला गेला).

१७९२ मध्ये अमेरीकेच्या पश्चिम किनार्‍याजवळ असताना व्हँकुअर आणि गॅलॉयानो यांची भेट झाली. आपापली माहीती दोघांनी परस्परांना दिली. ब्रिटीश कोलंबिया आणि शेजारी असलेल्या बेटाला विभागणार्‍या जॉर्जियाच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत त्यांनी बेटाची प्रदक्षिणा पूर्ण केली. कॅनडातील या बेटाचं पुढे व्हँकुअर आयलंड म्हणून नामकरण झालं. कॅनडाच्या ज्या प्रदेशात तो पोहोचला त्या शहरालाही व्हँकुअरचं नाव देण्यात आलं. हिवाळा सुरू झाल्यावर व्हँकुअर हवाईला परतला.

१७९३ आणि १७९४ मध्ये व्हँकुअरने कॅनडाच्या किनार्‍यावरील अनेक खाड्यांचं सर्वेक्षण केलं, परंतु ५७ अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे मजल मारण्यात त्याला अपयशच आलं.

आपल्या मोहीमेतील अनुभवांवरुन व्हँकुअरने एक निष्कर्ष काढला तो म्हणजे नॉर्थवेस्ट पॅसेज अस्तित्वात असलाच तर तो बेरींग सामुद्रधुनीच्या दक्षिणेला असणं शक्यंच नव्हतं! १७९३ मधील आपल्या मोहीमेनंतर अ‍ॅलेक्झांडर मॅकेंझीने व्हँकुअरच्या या मताला दुजोरा दिला.

प्रकरण दुसरे
व्हॅंकुअर बेट

ब्रिटीश दर्यावर्दी जॉन रॉस १८१८ मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. विल्यम एडवर्ड पेरी, एडवर्ड सॅबीन यांचा त्याच्या मोहीमेत समावेश होता. अमेरीकेच्या पूर्व किनार्‍यावरुन उत्तरेकडे कूच करुन नॉर्थवेस्ट पॅसेजमधून बेरींग सामुद्रधुनी गाठण्याची त्याची योजना होती.

एप्रिलमध्ये इसाबेला आणि अलेक्झांडर या दोन जहाजांतून रॉसने इंग्लंड सोडलं. इंग्लंड सोडल्यावर रॉसची तुकडी बॅफीनच्या उपसागरात पोहोचली. बॅफीन बेटाला घड्याळाच्या विरुद्ध बाजूने प्रदक्षिणा घालत ते बेटाच्या उत्तरेला असलेल्या लँकेस्टर साऊंड खाडीत पोहोचले.

प्रकरण दुसरे
बॅफीनचा उपसागर

बॅफीन बेटाच्या पश्चिमेला त्यांनी बरीच मजल मारली. परंतु रॉसला दूर क्षितिजावर पर्वतांची एक रांग दिसून आली! ही पर्वतरांग ते जात असलेल्या चिंचोळ्या सामुद्रधुनीच्या टोकाला असल्याचा रॉसचा समज झाला. या मार्गाने पुढे न जाता त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला! विल्यम पेरी आणि एडवर्ड सॅबीन यांनी परत फिरण्यापूर्वी त्या पर्वतरांगेचं जवळून निरीक्षण करण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु रॉसने त्याला ठाम नकार दिला!

वास्तविक रॉसला दिसून आलेली पर्वतरांग हे केवळ मृगजळ होतं. पर्वतरांगेचा त्याला नुसता भास झाला होता! पेरी - सॅबीन यांचा सल्ला धुडकावून लावल्यामुळे इंग्लंडला परतल्यावर रॉसवर बरीच टीका झाली.

प्रकरण दुसरे
लँकेस्टर साऊंड

लँकेस्टर साऊंड हे नॉर्थवेस्ट पॅसेजचं पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे हे पुढे सिद्ध झालं.

१८१९ मध्ये जॉन फ्रँकलीनच्या नेतृत्वात कॉपरमाईन नदीच्या मुखापासून कॅनडाच्या पूर्वेकडील किनार्‍यापर्यंत संशोधनाची मोहीम आखण्यात आली. या मोहीमेत अनेक स्थानिक जमातीच्या लोकांचा समावेश होता. जॉन रिचर्डसन, जॉर्ज बेक, जॉन हेपबर्न आणि रॉबर्ट हूड यांचा या मोहीमेत समावेश होता. विल्यम पेरीच्या मोहीमेशी जमल्यास हातमिळवणी करण्याची त्यांची योजना होती.

फ्रँकलीनची ही मोहीम अत्यंत वादग्रस्तं ठरली. त्याच्या २० पैकी ११ जणांचा मोहीमेत मृत्यू झाला. मोहीमेदरम्यान खुनाचे आणि नरमांसभक्षणाचे प्रसंग घडल्याचेही आरोप झाले. पेरीच्या मोहीमेशी त्याची गाठ
पडलीच नाही. १८२२ मध्ये फ्रँकलीन, रिचर्ड्सन आणि बेक इंग्लंडला परतले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel