‘घे हो, आज. ये. आणि तुला सर्कशीला नेणार आहे. आधी मी पाहून आलो खेळ कसा काय आहे तो. चांगली आहे सर्कस.’
‘दादा!’
‘काय?’
‘मी तुझा ना?’
‘होय हो.’
‘चहा घेऊ.’
‘घे.’
चहा पिऊन कृष्णनाथने कपबशी विसळायला नेली.
‘अरे, राहू दे. ही विसळील.’
कृष्णनाथाने कृतज्ञतेने वैनीकडे पाहिले. कृष्णनाथाचे डोळे भरुन आले होते. हा सहानभूतिचा होणारा वर्षाव त्याला सहन होईना. गुदमरुन जाऊ लागला. बरेच दिवस उपाशी राहिलेल्याला एकदम आग्रह करुन खाऊ घातले तर त्याला का ते अन्न झेपेल?
रघुनाथ नीट कपडे करुन सर्कशीच्या मॅनेजराकडे गेला.
कालचा तुमचा खेळ फारच छान झाला. अशी सर्कस किती तरी वर्षांत इकडे आली नव्हती. देवल, छत्रे, पटवर्धन यांच्या सर्कशीची नावे सारे घेतात. तुम्हीही त्यांच्या तोलाचे आहात. मुद्दाम तुमचे अभिनंदन करायला मी आलो आहे. आणि आज तिसरे प्रहरी आमच्याकडे चहाला या.
‘आपण येथेच राहणारे वाटते?’
‘हो. येथेच बंगला आहे. शेतीवाडी, मळे, मोठीबाग-सारे येथे आहे.’
‘आपले नाव?’
‘रघुनाथराव. मग ठरले हं. मी किती वाजता बोलवायला येऊ?’
‘चार वाजता या.’