महाराष्ट्रभर सेवादल वाढू लागले. भाई एस. एम. जोशी. उत्साहमूर्ती भाऊ सर्वत्र  सेवादलाचा संदेश देत घुमत होते. आणि राष्ट्रांतही निराळेच तेजस्वी वारे वाहू लागले होते. सरकारशी समेट झाला नाही. महात्माजींनी आपल्या तेजस्वी लेखणीने सारे राष्ट्र स्वातंत्र्यासाठी उभे केले. त्यांच्या लेखात नुसती आग होती. अपार सामर्थ्याचा साक्षात्कार त्यांच्या लेखांतून होई. सेवादलाची शिबिरे ठायी ठायी निघू लागली आणि पुण्यातले शिबीर तर गाजले. ते प्रसिध्द समाजवादी पुढारी मेहरअल्ली पुण्यात आले होते. त्यांनी सा-या पुणे शहराला हलविले. त्यांची स्फूर्तिदायक व्याख्याने सर्वत्र झाली, मेहरअल्ली म्हणजे मूर्तिमंत स्फूर्ती! त्यांचा स्वभाव किती दिलदार व थोर! आपल्या लहानसहान मित्रांनाही त्यांच्या वाढदिवशी ते पुस्तकांची भेट पाठवायचे. जेलमध्ये असले शेकडो पुस्तके मागावून घेतील. सर्वांना बौध्दिक खाद्य पुरवतील. औषधे मागवून घेऊन राजबंदींच्या शरीरांची काळजी घेतील. विरोधी पक्षांतील लोकांविषयीही त्यांना आदर. तात्यासाहेब केळकरांनाही वाढदिवशी अभिनंदनपर तार करतील! पांढ-या शुभ्र खादीच्या पोशाखांतली त्याची ती नयनमनोहर मूर्ती पाहिली की येथे काही उदारता आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही.  संस्कृतीसंपन्न असे त्यांचे जीवन आहे.

कृष्णनाथाच्या मनावर त्या व्याख्यानांचा फार परिणाम झाला. सेवादलाच्या शिबिरांतील व्याख्याने, तेथील चर्चा, ती प्रश्नोत्तरे तो विसरु शकत नव्हता. देशभर का प्रचंड स्वातंत्र्यसंग्राम सुरु होणार?

जून, जुलै महिने हा हा म्हणता गेले. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात नव्हते. पुढा-यांचे दौरे, त्यांची भाषणे, माहत्माजींच्या मुलाखती हे सारे वाचण्यात व त्यांची चर्चा करण्यात दिवस पटपट जाई. कृष्णनाथ सेवादलात जायचाच. सेवादलातील सैनिकांनी उद्या काय करायचे?

अमर ऑगस्ट महिना आला. मुंबईकडे सर्वांचे डोळे होते. ऑगस्टची आठ तारीख आली आणि स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला आणि तेथील ती संजीवनी देणारी भाषणे, महात्माजींचे रात्रीचे अडीच तास झालेले ऐतिहासिक भाषण! ‘उद्यापासून तुम्ही स्वतंत्र आहात!’  हे शब्द राष्ट्राच्या थोर पित्याने उच्चारले आणि एक प्रकारची वीज सर्वांच्या हृदयांना स्पर्श करुन गेली.

पुण्याच्या विद्यार्थ्यांनी महात्माजींना पुण्याला बोलाविले होते. त्यांनी कबूलही केले होते; परंतु एकाएकी सरकारने घाव घातला! सारे पुढारी नेण्यात आले आणि ९ ऑगस्टला सारे राष्ट्र उघड व अहिंसक असा स्वातंत्र्यसंग्राम करायला उभे राहिले.
कृष्णनाथचे अनेक मित्र गावोगाव गेले. कोठले कॉलेज नि काय? सर्वत्र हरताळ, गोळीबार, लाठीमार! कृष्णनाथ सचिंत होता. आपले कर्तव्य काय, या विचारात तो होता. एक मन म्हणे, ‘तुझ्या आश्रयदात्याला आधी विचारुन ये!’

एके दिवशी कृष्णनाथ सारे सामान घेऊन अकस्मात इंद्रपूरला आला.  माधवरावांना हायसे वाटले. पुण्यातील नाना वार्ता कानावर येत होत्या. कृष्णनाथविषयी त्यांना चिंता वाटत होती.

‘तू आलास, बरे झाले. हे वादळ जाऊ दे. मग जा पुन्हा कॉलेजात.’

‘बाबा, आता कॉलेजात जाववत नाही. या संग्रामात शिरायला मला परवानगी द्या!’

‘या गोष्टीशिवाय तू काहीही माग.’

‘या गोष्टीशिवाय मला काही नको.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel