''आम्ही वाटसरू आहोत. जेवण मिळेल का? रात्री निजायला जागा मिळेल का?'' मायाने विचारले.
''येथे दर अधिक आहे. आणि आता उशीरही झाला आहे. एकेक रुपया पडेल जेवण्याचा नि राहण्याचा.''
''आमच्याजवळ दीडच रुपया आहे. मी थोडे काम करीन. भांडी घाशीन किंवा कोणी अद्याप जेवायला यायचे असतील तर त्यांना वाढीन, त्याची मजुरी द्या. म्हणजे सारे भागेल. करा एवढी कृपा.'' हेमा म्हणाली.
''या दोघी आत.''
त्या दोघी आत गेल्या. त्या जेवल्या. त्यांना एक लहानशी खोली दाखविण्यात आली. वरच्या मजल्यावर ती होती. माया जेवून अंथरुणावर पडली. हेमा काम करीत होती. गडीमाणसे काम करीत होती. त्यांच्यात तीही मिसळली.
इतक्यात आणखी एक गृहस्थ जेवणासाठी आला.
''जागा आहे? जेवायला नि झोपायला?'' त्याने प्रश्न केला.
''पाच रुपये पडतील. इतक्या उशीरा आलात. पुन्हा स्वयंपाक केला पाहिजे.''
''दहा घ्या. परंतु चांगले जेवायला वाढा.''
''चला वरती. तेथेच ताट आणण्यात येईल.''
तो गृहस्थ वरती गेला. एका स्वच्छ खोलीत बसला. हेमाला त्याचे ताट तयार करण्यास सांगण्यात आले.
''जा लवकर वर घेऊन.'' मालक म्हणाला.