''का ग आई? त्यांचे आपले काय नाते? जवळचे का नाते आहे?''
''तू पडून रहा.''
तो पाहुणा नि रंगराव बोलत होते.
''तुम्ही का माझी जाहिरात वाचून आलेत?'' धान्याच्या व्यापारात मला एक नोकर हवा आहे.'' रंगराव म्हणाले.
''मी जाहिरात वाचली नाही. मी परदेशात जात आहे. तुमची जाहिरात वाचून मी आलेला नाही. तुम्हांला वाईट धान्य मिळाले. लोक ओरडत होते. तक्रार करीत होते. वाईट वास येणारे धान्य चांगले कसे करावे त्याची युक्ती मी शोधून काढली आहे. म्हणून ती चिठी तुम्हांला मी लिहिली.''
''पण जे धान्य दळून झाले, ज्याचा आटा झाला. त्याचे काय? त्याला काही आहे का उपाय?''
''प्रयोग करून बघायला हवा. मी तर अमेरिकेत जाईन म्हणतो.''
''इतकं लांब कशाला जाता? तुम्ही येथे का नाही राहत? मला एक चांगल्या माणसाची जरूर आहे. तुम्ही येता माझ्या कामात मदत करायला? आमच्या सारंगगावातच राहा.''
''नको. दूरच मला जाऊ दे.''
''तुम्हाला घरच्या माणसांनी परवानगी दिली?''
''घरचे मला कोणी नाही; मी एकटा आहे.''
“एकटे आहात? अगदी एकटे?''
''हो, अगदी एकटा.''
''माझ्यासारखेच तुम्ही आहात एकूण?''
''तुम्हीही एकटे आहात?''