''मग तुम्ही नाही का देणार नोकरी? मी उपाशी आहे. आज महिना होऊन गेला. महिना का? दोन महिने झाले. मी पुष्कळ खटपट केली. कोठेही नोकरी मिळत नाही. तुमच्या भरवशावर मी आलो. तुम्ही फशी पाडलेत?
''परंतु माझा काय इलाज? तुम्ही येण्याच्या आधी ते आले. ते हुशार आहेत. मला ते आवडले. मी त्यांना ठेवून घेतले. त्यानंतर तुम्ही आलेत.'' रंगराव म्हणाले.
''मी तुमची जाहिरात वाचून तुम्हांला लिहिले. तुम्ही भेटीला बोलावलेत म्हणून ना मी आलो? माझी भेट होण्यापूर्वी त्या गृहस्थांना तुम्ही ठेवलेत कसे? तुमची ही चूक नाही का?''
''परंतु मी तुम्हांला भेटीला बोलावले याचा अर्थ तुम्हांला नोकरी दिली असा होत
नाही. भेट घेऊनही तुम्ही मला नको, असे नसते का मला सांगता आले? तुम्ही उगीच पुन्हा पुन्हा येता. जग का ओस पडले आहे? तुमच्यासारखाच मी दरिद्री होतो. गवत कापीत असे. लाकडे फोडीत असे. परंतु उद्योगाने मी वैभव मिळविले. जा. कोठेही प्रामाणिक उद्योग करा.''
''तुमचा उपदेश मला नको आहे.''
''मग चालते व्हा.''
सोमा निघून गेला. हेमंतला ठेवले त्याच्या दुसर्या दिवशीच तो आला होता. रंगरावांनी दिलेली एक जाहिरात त्याने वाचली होती. त्याने अर्ज केला होता. रंगरावांनीच त्याला मुलाखतीस बोलावले होते. परंतु एकाएकी हेमंतचा उदय झाला. आपण दुसर्या एका माणसाला भेटीस बोलावले आहे, ही गोष्ट ते विसरून गेले. त्यांनी हेमंतला नोकरीस ठेवले. केवळ नोकर म्हणून नव्हे; तर अकस्मात् मिळालेला मित्र म्हणून ठेवले. रंगरावांनी सोमाची निदान मुलाखत तरी घ्यायची होती. परंतु त्याला त्यांनी एकदम उडवून लाविले होते. बिचारा निराश होऊन नि रागावून निघून गेला. दोन महिने सारंगगावात तो हिंडत होता, परंतु अद्याप त्याला कोठे नोकरी मिळाली नव्हती. कोणी धान्य-व्यापारी त्याला ठेवू शकत नव्हता. आज तो पुन्हा रंगरावांकडे आला होता; परंतु वरीलप्रमाणे प्रश्नोत्तरे होऊन शेवटी रागावून नि निराश होऊन तो निघून गेला.