रंगराव आज कचेरीत लवकर आले होते. हेमंत अजून आला नव्हता. का बरे? आजारी नाही ना? हे पहा, कोणी शेतकरी येत आहेत. त्यांना कोण हवे आहे?''
''हेमंतदादा कुठे आहेत?'' एकाने विचारले.
''काय आहे काम?'' रंगरावांनी विचारले.
''त्यांच्यापाशीच काम होते.'' ते म्हणाले.
''परंतु मी आहे ना? मला का तुमचे काम करता येणार नाही? हेमंत काल आला. मी आज किती वर्षे आहे! बोला, कोणते आहे काम? सांगा.''
''आम्हांला हेमंतदादाच हवेत.''
इतक्यात तिकडून गाणे गुणगुणत हेमंत आला. शेतकर्यांनी त्याला भक्तिप्रेमाने रामराम केला. त्यानेही हसतमुखाने त्याचे स्वागत केले.
''इतक्या लवकर उजाडतसे आलेत? तिसरे प्रहरी ना येणार होतेत?'' हेमंतने विचारले.
''लवकरच आलो. एक बैलगाडी येत होती. तिच्यातून आलो. आमचा तंटा तुम्हीच तोडा.'' एकजण म्हणाला.
''तुमच्या गावाला नको का यायला? तेथल्या मंडळींनाही हकीगत विचारली पाहिजे. गावच्या पंचांना.''
'परंतु आम्ही आमची हकीगत आज तुम्हांला सांगू. मग तुम्ही या आमच्या गावाला. तेथे मोकळेपणाने तुम्हांला सारे सांगता येईल.'